झगमगत्या दुनियेचे कटु सत्य…

0
692

लाईट, कॅमेरा आणि ऍक्शन असे म्हटले की, डोळ्यांसमोर ग्लॅमरस दुनियेचे एक झगमगते चित्र उभे राहते. नेम, फेम देणार्‍या या फिल्मी दुनियेत आपले करीअर करण्यासाठी अनेक तरुण-तरुणींची पावले देशभरातून मुंबईकडे वळतात. कलावंतांना मिळणारी प्रसिद्धी, त्यांच्या अवतीभोवती घुटमळणारे त्यांचे चाहते, बक्कळ पैसा, या सर्वांचे त्यांना आकर्षण वाटत असते. त्यामुळे या स्वप्ननगरीत आपणही पाऊल टाकण्याची स्वप्ने रंगवण्याची उत्सुकता तरुणांमध्ये दिसून येते. परंतु, या महिनाभरात दोन अभिनेत्रींनी स्वतःला मृत्यूला कवटाळून घेण्याच्या घटना घडल्याने, पुन्हा एकदा या झगमगत्या क्षेत्रातील कटु बाजूची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळेच नव्वदच्या दशकातील दिव्या भारतीपासून ते काही दिवसांपूर्वी आत्महत्या केलेल्या अंजली श्रीवास्तवचा चेहरा डोळ्यांसमोर आला आहे.
सिनेसृष्टी, मॉडेलिंगच्या क्षेत्रामध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी मेहनत, कष्ट करण्याची तयारी जरी असली, तरी इथे आपली प्रतिमा तयार करताना अनेक छोट्या-मोठ्या अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. पण, या परिस्थितीला सामोरे न जाता अनेक कलाकार आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात आणि आपली जीवनयात्रा संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतात. गेल्या आठ ते दहा वर्षांमध्ये मॉडेल तसेच नव्या होतकरू अभिनेत्रींच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये झालेली वाढ म्हणूनच चिंतेचा विषय आहे. सिनेसृष्टी, मॉडेलिंगमध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी देशाच्या कानाकोपर्‍यातून अनेक तरुण-तरुणी स्वप्ननगरी, बॉलीवूडचे मेट्रो शहर मुंबई गाठतात. पुढचा हा प्रवास म्हणावा तसा सोपा नसतो. प्रचंड सहनशक्ती, मेहनत, अपयश आले,नकार आला की ती पचवण्याची क्षमता मॉडेल, सिनेकलाकारांनी बाळगणे तसे गरजेचे. पण, हल्ली तसे होताना दिसत नाही. कारण आजच्या नव्या पिढीचा, सगळ्या गोष्टी एका झटक्यातच झाल्या पाहिजे, असा एकूणच अट्‌टहास सर्वच बाबींमध्ये असतो. कोणत्याही क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवायचा असेल, तर तो लगेचच मिळेल, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे आणि हीच बाब नवख्या कलाकारांनी मुळातच समजून घेतली पाहिजे. खरंतर आज विविध माध्यमांमुळे प्रसिद्धी मिळवणे काही कठीण राहिलेले नाही. आज अनेक रिऍलिटी शोच्या माध्यमातून अनेक गायक-गायिका, अभिनेते-अभिनेत्री, नृत्यदिग्दर्शक घडवले जात आहेत. पूर्वी असे नव्हते. अनेक गायक-गायिकांना चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळत होती. तसेच आज अनेक ठिकाणी फॅशन शो, नाटक, चित्रपटासाठी ऑडिशन घेतल्या जातात. खरंतर ऑडिशनमुळेे नवख्या कलाकारांना चांगले व्यासपीठ मिळते. चित्रपट, मॉडेलिंग क्षेत्रामध्ये येताना अनेक आयोजक शोज् आयोजित करत असतात. त्यासाठी ऑडिशन घेतल्या जातात. ऑडिशनमध्ये आपलीच निवड झाली पाहिजे, यासाठी काही वेळेस नको ते मार्ग निवडले जातात. मग त्याचे करीअर सुरू होण्याआधीच संपते.
अनेकदा या ग्लॅमरच्या दुनियेत करीअर करताना कुटुंबाचा पाठिंबा काहींना मिळत नाही आणि जरी तो मिळाला तरी करीअर करण्यासाठी कलाकारांना कुटुंंबापासून लांब राहावे लागते. त्यामुळे भावनिक तसेच मानसिक आधारापासून ते वंचित राहतात. मित्रमंडळींची साथ जरी असली तरी त्यामध्ये स्वार्थ डोकावतो. पैसा आहे तोवर मित्रही असतात, तर काही अगदी शेवटपर्यंत साथ देतात. त्यातच कामाच्या अनिश्‍चित वेळा, वाढत्या कामाचा व्याप तसेच इतर कारणांमुळे कुटुंबासोबत त्यांना वेळ घालवता येत नाही. सतत संवाद होत नसल्यामुळे काही गैरसमज निर्माण होतात आणि त्याचा परिणाम थेट नातेसंबंधांवर होतो. तसेच अभिनेते-अभिनेत्रींची प्रेमप्रकरणे, वैवाहिक जीवनामध्ये निर्माण होणार्‍या वादामुळे वैयक्तिक आयुष्याचा बेरंग होतो आणि त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम करीअरवरही जाणवतो. अनेकदा कामाच्या संधी म्हणाव्या तितक्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने, दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आर्थिक अडचण निर्माण होते. त्यातच या क्षेत्रामध्ये वावरण्यासाठी उच्च जीवनशैली, सगळं कसं हायफाय लागतं. त्यामुळे अर्थातच गरजाही तशाच. त्यामुळे आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी अनेकदा गैरमार्गाने पैसे कमविण्याची खूप मोठी चूक काही मंडळी करून बसतात आणि इथेच त्याच्या करीअरची दिशा बदलते. या सर्वांतून मार्ग काढण्यासाठी अमली पदार्थांचे सेवन करण्याची वाईट सवय लागते. या व्यसनामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो.
पूर्वी या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. परंतु, आता अनेक तरुण-तरुणी या क्षेत्रात करीअर करण्यासाठी उत्सुक असतात व तसा पाठिंबाही त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून दर्शवला जातो. साहजिकच त्यामुळे या क्षेत्रातील स्पर्धा वाढली आहे. अर्थात, स्पर्धा म्हटल्यावर आपल्यासोबतच्या प्रतिस्पर्ध्याला मागे टाकून पुढे जाण्याची कसरत प्रत्येक स्पर्धक करीत असतो. या वाढत्या स्पर्धेमध्ये आपण टिकू की नाही, ही भीती नकळतपणे मनात घर करून असते. या स्पर्धेमध्ये असणारे स्पर्धक एकमेकांचे वैरी बनतात. आपल्यालाच यश मिळाले पाहिजे, यासाठी अनेक गैरमार्गांचा अवलंब केला जातो. वेळप्रसंगी कुणाचा जीवदेखील घेतला जातो! दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे, या क्षेत्रामध्ये मित्रमैत्रिणी निवडताना जरा जपूनच राहावे लागते. मदतीच्या नावाखाली नवख्या कलाकारांची फसवणूक केली जाते. काही नवख्या मॉडेल, अभिनेत्रींकडे शरीरसुखाची मागणी केली जाते. ही बाब बर्‍याचदा उघडकीस आली आहे.
मध्यंतरी एका मराठी अभिनेत्रीने तिचा याबाबतीतला अनुभवदेखील सांगितला होता आणि हेच वास्तव आहे.
आज अनेक तरुणींना चित्रपटसृष्टी, फॅशनजगताचे आमिष दाखवून त्यांच्यावर बलात्कार केले जातात किंवा त्यांना वेश्याव्यवसायात ढकलले जाते. त्यामुळे अनेक तरुणी कोणतीही शहानिशा न करता अनोळखी व्यक्तींवर विश्‍वास टाकतात आणि स्वतःची फसवणूक करून घेतात. अनेकदा सिनेमात काम करण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केली जाते. त्यामुळे या क्षेत्रात येताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणेही तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक घेतला पाहिजे. सिनेसृष्टी तसेच मॉडेलिंगच्या क्षेत्रात काम करताना एका ठरावीक वेळेमध्ये प्रचंड प्रसिद्धी मिळते, कामाच्या नव्या संधी मिळतात, भरपूर पैसाही मिळतो. या प्रसिद्धीचा आनंद घेताना पाय मात्र जमिनीवर ठेवायला हवेत. कारण परिस्थिती ही सतत बदलत असते. कारण आज सिनेमा, मॉडेलिंगच्या क्षेत्राचा विचार केल्यास असे अनेक मॉडेल, अभिनेते-अभिनेत्री आहेत ज्यांना ठरावीक कालावधीत खूप प्रसिद्धी मिळाली होती. परंतु, सद्य:स्थितीत ते खूप हलाखीच्या परिस्थितीत जगत आहेत, असे आढळते.
सिनेकलाकारांचा खून झाला की आत्महत्या, हे मोठे गूढ असते. नैराश्याच्या गर्तेत अडकलेले अनेक कलाकार आत्महत्या करत असले, तरी काही कलाकारांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणे आज आहेत. त्यामध्ये अभिनेत्री दिव्या भारती, अभिनेत्री जिया खान, प्रत्युषा बॅनर्जी, अंजली श्रीवास्तव, मॉडेल कृतिका चौधरी, अभिनेता कुणाल सिंग यांची उदाहरणे आहेत. या कलाकारांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या गुन्हेगारांवर खटलेही सुरू आहेत, परंतु अजूनही त्यांना शिक्षा झालेली नाही. वर्षानुवर्षे त्यांची मित्रमंडळी, कुटुंबीय त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत खरा, परंतु त्याची योग्य ती दखल घेतली जात नाही, ही खरंच दुर्दैवाची बाब आहे.
गेल्या काही वर्षांपासून नवे कलाकार अनेक कारणांमुळे आत्महत्या करत आहेत. मुळातच आत्महत्या करणे, हा कोणत्याही समस्येवर उपाय असू शकत नाही. आपली स्वप्ने, आपल्या इच्छा-आकांक्षा कशा पूर्ण करता येतील, त्याच्यावर भर दिला पाहिजे. या क्षेत्रामध्ये संगत ही खूप महत्त्वाची असते. इथे अनेक वृत्तीचे लोक वावरत असतात. त्यामुळे तुम्ही कोणत्या प्रकारचे मित्रमैत्रिणी निवडता, यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून असतात. या क्षेत्रामध्ये कायमस्वरूपी कामाच्या संधी मिळतील, याची हमी देता येत नाही. त्यामुळे जेव्हा हातामध्ये काही नसेल त्यावेळेस या क्षेत्राशी संबंधित असणारे इतर स्किल शिकून घेतले पाहिजे. आपल्या व्यक्तिमत्त्वाची काळजी घेतली तर त्याचा फायदा निश्‍चिततच होईल.
– अक्षया भिंगार्डे, अभिनेत्री
कोणत्याही क्षेत्रात पदार्पण करताना प्रत्येक व्यक्ती त्या त्या क्षेत्रातील आदर्श व्यक्तींना डोळ्यांसमोर ठेवत असते. ही बाब काही चुकीची नाही, परंतु त्यांना मिळालेले यश तुम्हाला मिळेेल, याची खात्री देता येत नाही. कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करताना चढउतार हे येत असतात. मग अशा वेळी खचून न जाता परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी करायला हवी. तसेच क्षेत्र कोणतेही असो, त्या त्या व्यक्तीच्या वागणुकीमध्ये काही बदल आढळल्यास कुटुंबाने, मित्रपरिवाराने अशा व्यक्तींना बोलतं करण्याचा प्रयत्न करावा. परिस्थिती जास्त गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
– डॉ. विद्याधर वाटवे, मानसोपचारतज्ज्ञ

– सोनाली रासकर/मुंबई