भासमानतेचे वास्तव!

0
82

अग्रलेख
नको त्या बाबतीत अति संवेदनशील असलेल्या आपल्या समाजाला काही गंभीर बाबींचा साधा संवेदनास्पर्शदेखील होत नाही, ही चिंतेची अन् चिंतनाची बाब आहे. आम्हाला वाटते तेच अंतिम सत्य आहे, असे वाटणार्‍यांच्या टोळ्याच निर्माण झाल्या आहेत आणि त्या विरोधी म्हणजेच त्यांना न पटणार्‍या विचारांवर तुटून पडत असतात. हे एकारलेपण केवळ भारतातच आहे असे नाही, जगभरात ही साथ काविळीसारखी पसरली आहे. त्यामुळे मानवसमाजाला भेडसावणार्‍या नेमक्या समस्यांकडे दुर्लक्ष होते. या समस्या बहुतेक नवतंत्राने आणि आधुनिक जीवनशैलीने निर्माण झालेल्या आहेत. आधुनिक बाजारतंत्राने त्या त्यांच्या लाभासाठी निर्माण केल्या असल्याने त्या समस्यांची जाणीवही निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी एक भूलतंत्राचे जाळेही पसरवून ठेवले आहे. इंटरनेटचे मायाजाल हे त्यापैकीच एक आणि ते स्मार्ट फोनच्या मार्फत अगदी हाता-हातात नेऊन घट्‌ट बसविण्यात आले आहे. पाश्‍चात्त्य जगात आणि चीन, जपान अशा नवतंत्रसमृद्ध देशांमध्ये या विषयाच्या जाणिवा पोहोचल्या आहेत. भारतात मात्र अद्यापही केवळ भासमानतेच्या उपयोगापर्यंत अन् उपभोगापर्यंतच आम्ही पोहोचलेलो आहोत. आपले प्रॉडक्ट विकण्यासाठी आणि कर्तव्य, जबाबदार्‍या टाळण्यासाठीच या साधनांचा जास्त वापर केला जात असतो. या भासमान जगामुळे वेडे होणार्‍यांची संख्याही दिवसेंदिवस वाढते आहे आणि हे वेड आहे, हेदेखील आमच्या गावी नाही. सातत्याने अशा बातम्या येत असतात. परवा अशीच एक बातमी आली. हरयाणातील सहा-सात वर्षांच्या एका मुलाने, त्याच्या वडिलांनी मोबाईल हातून काढून घेतल्याच्या रागावर चक्क हातच कापून घेतला! मग त्याला दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोबाईल आणि इंटरनेट ऍडिक्शनची प्रकरणे अलीकडे वाढू लागली आहेत. नव्या पिढीमध्ये हे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने उत्पादनक्षमता आणि कार्यउत्साह कमी होेतो आहे. ‘खाऊजा’- खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या धोरणांमुळे ज्या विसंगती निर्माण होत आहेत त्यांची शिकार विकासोन्मुख देशच जादा प्रमाणात होत आहेत. हे माध्यमे वापरण्याची पुरेशी प्रगल्भता नसताना बाजाराच्या हितासाठी ही साधने सामान्य बुद्धीच्या आणि अशिक्षित जनतेच्या हाती सोपविण्यात आली आहेत. बदलत्या भौतिक चकचकाटाच्या खर्चीक जीवनशैलीमुळे धनाचे महत्त्व वाढले आहे. कमी श्रमात आणि अल्पकाळात आर्थिक बाबतीत स्थिरस्थावर व्हायचे असते आणि मग मध्यमवर्गासाठी चार हातांनी पैसा कमविणे हा सोयीचा आणि जवळचा मार्ग उरत असतो. हरयाणाच्या या प्रकरणातही हे असेच घडले आहे. या मुलाचे वडील कसलासा उद्योग करतात, आई प्राध्यापिका आहे. त्यामुळे मुलाच्या हाती मोबाईल, संगणक आणि इंटरनेट दिले की आपली जाबबदारी संपली, आपण त्याला आधुनिक जगाच्या बुद्धिमत्तेशी जवळीक साधणार्‍या सर्व सोयी दिल्या, या समाधानात तद्दन मायबाप असतात. तसेच हेही होते आणि मग त्याचे व्हायचे तेच परिणाम झाले. तो मुलगा मोबाईल ऍडिक्ट झाला. मोबाईल हातात नसला तर मुलं जेवत नाही. अगदी शाळेत जाताना रिक्षातही हातात मोबाईल असतो. बाप कारमध्ये सोडून देत असेल, तर त्याच्या बाजूला बसलेला मुलगा कुठल्याशा व्हिडीओ गेममध्ये टॉपचा स्कोअर करण्यात गुंतलेला असतो. साधारण १४ ते ३० या वयोगटात हे प्रमाण मोठे आहे. केईएमच्या डीन डॉ. शुभांगी पारकर यांच्या मते, मुंबईच्या लोकसंख्येच्या १० टक्के लोकांमध्ये मोबाईल-इंटरनेट ऍडिक्शनचा रोग जडलेला आहे. केईएम मध्ये रोज २५ ते ३० जण या तक्रारी घेऊन येतात आणि त्यांच्यापैकी १० ते १२ लोक रुग्ण असतातच. मोबाईल ऍडिक्शन हे शरीर आणि मनावर एकाच वेळी परिणाम करत असते. मान, मणका, कंबर लागून येणे, डोळे जळजळ होणे, चष्म्याचा नंबर अनियमित वाढणे, धूसर दिसू लागणे, चीडचीड होणे, भूक न लागणे, स्वमग्नता, आळस, एकाकीपण आणि मग नैराश्य, तणाव, भासमान जगात रममाण होणे असे सिफोफ्रेनिक होण्याकडे धाव घेणारे त्रास सुरू होतात. अमेरिकेच्या सायकॅट्रिक असोसिएशनने ‘इंटरनेट ऍडिक्ट डिसॉर्डर’ म्हणून या रोगाला आता मान्यताच दिली आहे. चीन आणि अमेरिकेत या संदर्भातली लहान मुलांसाठीची रिहॅबिलिएशन सेंटर्स सुरू करण्यात आली आहेत. ऑस्ट्रेलियात तर आता शाळांमध्येही तसा एक कक्ष सुरू करण्यात आला आहे. आपल्या देशात मात्र अद्याप याच्या पुरेशा जाणिवाच विकसित झालेल्या नाही. मोबाईल आणि इंटरनेट कंपन्यांमधील व्यवसायिक युद्ध आणि सरकारातील त्या संदर्भातील घोटाळे हेच काय ते माध्यमांच्या चर्चेचे विषय असतात. आम्ही जे काय स्वीकारायचे आणि शिकायचे ते पाश्‍चात्त्यांकडूनच शिकत, स्वीकारत असतो. त्यामुळे अमेरिकेच्या माजी अध्यक्षांनी त्यांना त्यांच्या मुलीच्या आखडणार्‍या स्कर्टच्या लांबीवर चिंता व्यक्त केली की, मग आम्हाला आमच्या मुलींच्या पेहरावांकडे काळजीने बघावेसे वाटते. तोवर आम्ही अमेरिकेत सुरू झालेल्या स्त्रियांच्या पेहराव स्वातंत्र्याच्या लढ्याचेच अंधानुकरण करत असतो. मोबाईल आणि इंटरनेट हे हाताळण्याची प्रगल्भता नसली, तर केवळ भासमानतेचे जग आहे. आपण त्या भासांनाच खरे मानायला लागतो. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हॉटस् ऍप यावर जे काय चालते ते खरे नसते. ते सारेच ‘रिअलिटी शो’च असतात. त्यावर होणारे मित्र, त्यांचे संभाषण हे वास्तवाचा आभास असतो. एकटे आणि एकाकी बसून त्या आभासी प्रतिमांशी आम्ही एकरूप होत असतो. कुणीतरी आपल्याला लाईक करतंय, आपल्या पोस्टला प्रतिसाद देतंय, हेच सत्य वाटू लागते. फेसबुक आणि व्हॉटस् ऍपवर मैत्री करणारे प्रत्यक्षात भेटल्यावर फारसे बोलू शकत नाही, हे फार भीषण सत्य नाही, त्यांना एकमेकांशी असे बोलण्याची इच्छाच नसते, हे भीषण आहे. त्यांना त्यांचे आभासी जगातले संभाषणच खरे आणि सकस वाटत असते. अनेक मुलींनी त्यांना फेसबुकवर कमी लाइक्स मिळाल्या म्हणून आत्महत्या केल्याचे दाखले आहेत. मागे एक प्रस्थापित ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकाने दिलेल्या मुलाखतीत सांगितलेला अनुभव विचार करायला लावणारा आहे. त्यांनी हनिमून टूर नेला होता. त्यात २४ जोडपी होती. टूर कंपनीचा नियम हाच होता की, ही मधुचंद्राची सहल असल्याने लॅपटॉप, मोबाईल, नेट यासारखी साधने वापरायची नाहीत. सगळा वेळ एकमेकांनाच द्यायचा. त्यांच्या या अटीमुळे अर्ध्याच्या वर जोडपी सहल सोडून परत गेली. उरलेल्यांनी सहलीत फिरण्यापेक्षा जवळचे नेट कॅफे गाठून रात्री-बेरात्री आपल्या आभासी मित्र-मैत्रिणींशी संपर्क साधण्यातच धन्यता मानली होती. एकुणात त्यांची ही सहल फसली. त्यातील बव्हंशी लोकांचे म्हणणे हेच होते की, रात्री आम्ही जगभरातील आमच्या मित्र-मैत्रिणींशी संपर्क साधायचा नाही, संवादी व्हायचे नाही तर काय करायचे? आता मधुचंद्राच्या सहलीला गेलेल्यांची ही अवस्था असेल, तर माणसं स्वप्नवत वाटणार्‍या त्या भासमान जगात किती अडकली आहेत, याचा अंदाज न बांधलेलाच बरा! मोबाईल ऍडिक्शन जडलेल्या मुलांना समुपदेशन देणे हाच एकमेव उपाय आहे, मात्र त्याहीपेक्षा त्यांच्या आई-वडिलांनाच समुपदेशनाची खरी गरज असते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. प्रत्येक माणूस कमीत कमी ११० वेळा तरी दिवसातून मोबाईल हाताळत असतो. मोबाईल वापरणार्‍या १०० टक्के लोकांना ठरावीक वेळ मोबाईल हाताळला नाही तर मोबाईलची रिंग वाजल्याचे ऐकू येते. वास्तवात ती वाजलेली नसते. या भ्रम आणि भासातूनच पुढे मोबाईल विमनस्कता निर्माण होते. या संदर्भात एक शेर खूप काही सांगून जाणारा-
अब घर की तहजीब गई है टीव्ही है हातों मे, अब कोई भी बच्चा अपने बाप पर नही जाता!