प्राण भिजवा

0
267

कथा
आज रविवार असल्यानं संभवी निवांतपणे झोपली होती. तसेही काल रात्री शूटिंग संपवून घरी परतायला उशीर आणि त्यामुळे झोपायलाही उशीरच झाला होता. अशातच तिचा फोन सतत खणाणत होता. मॅसेजेसही सारखेच येत होते. शेवटी, अकरा वाजता माधवी संभवीला उठवायला आली.‘‘संभवी, अकरा वाजले ’’ असे म्हटल्यावर अखेरीस ती ताड्‌कन उठली, लगेच फ्रेश झाली. चहा घेतला. मोबाईलवर बघते, तर दहा मिस कॉल आणि बरेच मॅसेजेस्!
संभवी मॅसेजेस् पाहात होती. इतक्यात तिला फोन आला. कॉल रिसिव्ह करून ती अगदी स्तब्ध होऊन गेली. क्षणभर काहीच बोलत नव्हती. चेहर्‍यावर खूप आनंद होता. डोळ्यांत यशस्वी भाव होते. ओठ हळूहळू उमलत होते. सहजपणे ती उशीला टेकली. माधवी तिच्याकडे बघत होती. तिला संभवीचे हे भाव कळत नव्हते. माधवीने विचारताच संभवी सहजपणे परंतु आनंदाने उद्गारली, ‘‘अगं, शासनाकडून मिळणारे सुवर्ण कमळ यंदा मी जिंकले आहे, असा दिग्दर्शकाचा फोन होता.’’ माधवी एकदम आनंदाने तिला बिलगली, ‘‘अगं! इतकी मोठी बातमी आणि तू इतक्या शांतपणे सांगतेस.’’ माधवी आनंदात होती आणि संभवी तितकीच शांत!
‘‘का गं ? कुठे हरवलीस ? ’’
‘‘आज बाबा आपल्या जवळ हवे होते.’’
संभवीच्या या वाक्यावर मात्र दोघीही नि:शब्द झाल्या. तिच्या डोळ्यांत घळाघळा अश्रू आले. ती बेडवरून उठली, देवघराच्या दाराकडे बघत राहिली. आई मनोभावे पूजा करीत होती. पिवळ्या गर्द झेंडूनी देवाला फुलं वाहून देवालय सजवत होती. माधवी स्वगत पुटपुटली,‘‘पडक्या देवळात एकाकी आयुष्य घालवणं, हा त्यांचा निर्णय, त्याला आपण काय करणार.’’ तिचे स्वगत संभवीच्या कानावर पडले. याचा अर्थ माधवीताईला माहीत आहे, बाबा कुठे आहेत ते … ‘‘ताई, मी इतकी यशस्वी झाले आहे याचा आनंद मला बाबांच्या चेहर्‍यावर बघायचा आहे. पण आता कुठे शोधणार त्यांना?’’
माधवी आणि संभवीचे वडील, विश्‍वास ऊर्फ विसूकाका कुटुंबापासून दूर, आपलं सर्व हरवून बसलेलं आयुष्य या मांडवपूरच्या गाव वेशीवरील एका पडक्या महादेवाच्या देवळात कंठीत होते. त्यांची दिनचर्या महादेवाची पूजा करायची आणि पोट भरण्यासाठी वासुदेवाचं रूप घेऊन पूर्ण मांडवपुरात भिक्षा मागायची आणि आपला उदरनिर्वाह करायचा हीच होती. अल्पावधीतच ते तेथील लोकांचे लाडकेही झाले होते, कारण, केवळ भिक्षा मागण्याबरोबरच, लोकांच्या मनातील भक्तिमार्ग जागृत करून लोकशिक्षणाचं कार्यदेखील ते वासुदेवाच्या रूपाने करत होते.
‘‘आला आला वासुदेव, वासुदेव दारी आला
संतवाणी ऐकूनिया, प्राण भिजवा प्राण भिजवा….’’
विसूकाकांनी स्वत: रचलेल्या या अभंगाचं पालुपद गात ते रोज गावात भिक्षा मागत असत, गावातली सगळी सान-थोर मंडळी त्याला ‘‘विसूकाका, विसूकाका’’ म्हणत मान देत. गावातल्या प्रत्येक धार्मिक कार्यात त्यांचा विचार घेतला जाई, तर समाज कार्याच्या वेळेस आपल्या डोक्यावरचा मोरपिसांचा टोप उतरवून पुढे असायचे, अशा या त्रयस्थाला या गावातील अनेकांनी अनेक नाती देऊन आपल्या गणगोतात समावून घेतलं होतं.
आयुष्याच्या उत्तरार्धाच्या प्रारंभी या विसूकाका ऊर्फ वासुदेवाला त्याच्या रक्ताच्या नात्यांनी दूर झिडकारलं. रक्ताच्या नातेवाईकांपासूनच नव्हे तर ते खुद्द स्वत:च्या पोटच्या पोरांपासूनसुद्धा खूप खूप दुरावले गेले. आज खरंखुरं वासुदेवाचं आयुष्य जगणारा हा वासुदेव, पूर्वी घरात वासुदेवाचंच जिणं जगला, या दारी-त्या दारी. फक्त फरक इतकाच की, मांडवपुरात त्याला मानाचं स्थान मिळालं जे, घरात कधीच मिळालं नाही. कारण, आप्तस्वकीय सधन होत गेले आणि हा आपल्या भोळेपणामुळे करंटाच राहिला. तरीही, या वासुदेवानं कुणाला दोष दिला नाही. उलट, सगळ्यांचे दोषारोप सहन केले. पण, पोटच्या पोरींनीही त्याला दूषणं द्यावी, यानी तो घायाळ झाला. माझ्या पोरांनीही मला समजून घेतलं नाही, ही खंत त्याला बोचत होती. एकेदिवशी मनातली विषण्णता वाढली. अन्न-पाण्याविना भटकंती सुरू झाली आणि ती इथे मांडवपुरात येऊन थांबली. एका सोमवारी पहाटे आंघोळ करून खड्या आवाजात महादेवाच्या पिडींला वासुदेव रुद्राभिषेक करीत होता. दर्शनासाठी आलेल्या गावकर्‍यांनी देवाची पूजा झाल्यावर त्या वासुदेवाला नमस्कार केला. त्याच दिवसापासून हा वासुदेव या पुरातन महादेवाच्या देवळातील पुजारी झाला आणि चिपळ्या, एकतारी हाती घेऊन मोरपिसांचा टोप डोक्यावर चढवला तो आजपर्यंत!
आजपर्यंत असं ऐकिवात आलं नाही की, मिळालेल्या अत्युच्य सन्मानाच्या वेळेला पोराला आपल्या माता-पित्याची आठवण झाली नाही, ते पोर तर मग नतद्रष्टच! संभवी तर भोळ्या भाबड्या विश्‍वास ऊर्फ विसूकाकांची मुलगी होती. ती आपल्या वडिलांचा शोध घेत घेत मांडवपुरात पोहोचली. एक नावाजलेली सुंदर अभिनेत्री मुलगी गावात आल्यावर सर्वजण अवाक् झाले. या गावात संभवीच्या ओळखीचं कुणीच नव्हतं. पण, तिला ओळखणारे बरेच होते. संभवी सोबत माधवीसुद्धा होती. दोघींनाही कळत नव्हतं की, आपण इथे वडिलांची विचारपूस करायची कशी? तितक्यात हेमूकाका समोर आले. हेमूकाका म्हणजे हेमचंद पोखर्णा! मांडवपूरचा शेठ माणूस! तालुक्याच्या ठिकाणी त्याची मिल होती. पांढरे शुभ्र कपडे घातलेला आणि कपाळी चंदनाचा टिळा असलेला हेमूकाका समोर आल्यावर दोघींना हायसं
वाटलं. दोघीही हेमूकाकाजवळ गेल्या आणि विचारपूस करू लागल्या. त्यावेळी गावाची गर्दी हळूहळू वाढत होती. ती गर्दी पाहून संभावीच्या डोळ्यांत पाणी आलं. माधवी आपले हुंदके दाबत होती, तेव्हा हेमूकाकानं जवळच्या चहाच्या टपरीवर त्यांना बसवलं. पाणी पाजलं आणि विचारपूस केली, हेमूकाकांनी विचारलं, ‘‘तुम्ही कसे आलात? आमचे वडील याच गावात राहात असल्याची माहिती आम्हाला मिळाली.’’ संभवी म्हणाली.
‘‘कोण गं तुमचे वडील?’’ हेमूकाका म्हणाले.
‘‘त्यांचं नाव विश्‍वास’’ माधवीनं उत्तर दिलं.
‘‘अच्छा! म्हणजे विसूकाका ’’ हेमूकाका म्हणाले.
‘‘नाही नाही विश्‍वास ’’ संभवी लगेच म्हणाली.
‘‘तेच ते! आम्ही त्यांना विसूकाका म्हणतो ’’ हेमूकाकाचा स्वर माणुसकीनं ओतप्रोत होता.
‘‘म्हणजे?’’ माधवनं विचारलं
‘‘होय! ते आम्हा सवार्र्ंचे विसूकाका आहेत. या गावातील पुरातन महादेवाच्या देवळात पुजारी आहेत. सकाळी उठून साग्रसंगीत पूजा करतात आणि मग मोरपिसांचा टोप चढवून वासुदेवांचं रूप घेतात आणि गावात भिक्षा मागतात. फार सज्जन माणूस, आमच्या मांडवपुरातले आदराचे व्यक्ती आहेत ते आणि तुम्ही त्यांच्या मुली आहात … ?’’ हेमूकाकानं पुन्हा प्रश्‍न केला.
दोघीजणी गप्प, काहीच बोलल्या नाहीत. एव्हाना बरीच गावमंडळी जमली होती, त्यामुळे दोघीजणी अस्वस्थ होत असल्याचं हेमूकाकांना जाणवलं, काही तरी कुटुंबाचा तिढा असेल, तो चव्हाट्यावर नको म्हणून हेमूकाकांनी त्यांना सरळ महादेवाच्या देवळात पाठवण्याचा विचार केला… ‘‘तुम्ही असं करा, याच रस्त्याने समोर जा, पुढच्या वळणापासून तलाव लागतो. तलावाच्या लगतच्या रस्त्याने जा, थोडं दूर गेलं तर तुम्हाला पुरातन महादेवाचं मंदिर दिसेल, तिथे असतील ते, कारण, ही त्यांच्या साधनेची वेळ आहे ’’ हेमूकाकांनी त्यांना पत्ता दिला.
दोघीजणी लागोलग उठून आपल्या कारमध्ये बसल्या आणि देवळाच्या दिशेने निघाल्या. इकडे हेमूकाकांना पण राहावलं नाही. तेही त्यांच्या मागोमाग पायी देवळाकडे निघाले. कोस दीड कोसानी मंदिर आलं दोघींनाही आपल्या बाबांना भेटायची ओढ होती. आज चौदा वर्षे झालीत, बाबा आपल्या आईपासून दूर आहेत. मोठी ताई जान्हवी लग्न होऊन परदेशात गेली आहे. ताईला दोन मूलं आहेत, असे आणि बरंच काही बाबांना पट्‌कन सांगायचं, असं दोघींच्याही मनात होतं. आम्हाला बाबांनी सोडलं. आईंनं मोठं केलं, वाढवलं, या सर्व गोष्टी त्या भेटीपुढे नगण्य होत्या. फक्त बाबांचा चेहरा दिसावा, हेच त्यांच्या मनात होतं.
गाडी देवळापाशी आली. वीस-पंचवीस पायर्‍या चढून मंदिराचा गाभारा होता, त्या मंदिराकडे पहात संभवी म्हणाली, ‘‘ताई! इथे किती प्रसन्न वाटतं गं!’’ ‘‘पुढे काही शुभ होणार असलं की, माणसाला असले प्रसन्न भास होतात ’’ माधवी उत्तरली. ‘‘ताई, आपण मागचं काहीच बोलायचं नाही, पुन्हा त्याच गोष्टी नको, फक्त बाबा आपल्या सोबत कसे येतील हे बघायचे, असतं कुणी असं, आपल्या परीनं जसं जमेल तसं कुटुंब राखणारं, आईनेही तसंच केलं. आता फक्त आपण आई-बाबांना सुख द्यायचं. आता आपण कमवतो नं ’’ संभवी बोलली.
वासुदेव देवळाच्या गाभार्‍यातील एका नक्षीदार खांबापाशी आपली पाठ आणि डोके टेकवून बसला होता. मांडी घालून, डोळे मिटून ध्यान करीत होता. त्याचे हे ध्यान, त्याचे हे चिंतन, ईश्‍वराचे, गतकाळातल्या आयुष्याचे की संाप्रतच्या वासुदेव रूपातल्या भक्तिमार्गाच्या प्रसारणांचे, कोण जाणे? पण देवळात वासुदेव ध्यान करत असेल, तर आलेला भाविक देवळातील घंटीसुद्धा वाजवत नसे. जणू पूर्ण गाव वासुदेवाच्या मनाला जपत होतं. एव्हाना दोघीही गाभार्‍याजवळ पोहोचल्या. आपल्या वडिलांना ध्यान करताना बघून हरखून गेल्या. डोळे मिटलेल्या त्या चेहर्‍यावर प्रचंड तेज होते. इतक्या वर्षांनंतर भेटलेल्या बाबांचं ध्यान मोडण्याची हिंमत झाली नाही. लहानपणी बाबा आपल्याशी मित्रासारखे वागायचे, खूप चांगलं आयुष्य देऊ शकले नाही, पण सर्वांना आनंद द्यायचे आणि आज! आज आमचे बाबा एकदम मोठे असल्यासारखे वाटत होते. माधवीच्या मनात आलेल्या या भावनांनी संभावीला शांत राहण्याचा इशारा केला. दोघी तशाच उभ्या राहिल्या. काही वेळानं वासुदेवानं लांब सुस्करा सोडला आणि उठून गाभार्‍यातल्या महादेवाच्या पिडींला नमस्कार केला. ‘‘बाबा! आम्ही आलो आहोत, मी संभवी आणि माधवीताईसुद्धा’’, संभवीच्या डोळ्यांत ओलावा साचत होता.
आवाज आल्यावर क्षणभर त्यांच्याकडे बघितलं. पुन्हा गाभारातल्या पिंडीकडे बघून हात जोडले आणि म्हणाला, ‘‘शंकरा! सदाशिवा! सिद्धेश्‍वरा! मनात झालेली चाहूल इतक्या अलगदपणे गाभार्‍यापर्यंत येऊन पोहोचावी, ही फक्त तुझीच किमया रे सिद्धेश्‍वरा’’ वासुदेव मुलीकडे बघत म्हणाला, ‘‘बेटा! ’’
क्षणाचाही विलंब न लावता दोघीजणी आपल्या वडिलांना जाऊन बिलगल्या. वासुदेव दोघींना कुरवाळत होता, तेव्हा डोळ्यांत सतत अश्रूंच्या धारा होत्या. दोघीजणी ओक्साबोक्सी हुंदके देत होत्या. दुपारच्या शांतपणात त्यांचे हुंदके मोठ्याने वाटत होते. हुंदक्यांनी भंगलेली ती दुपार संध्याकाळकडे कलती झाली. भेटीच्या ओढीचा ओघ ओसरल्यानंतर दोघी जणी आपल्या मनातलं बाबांजवळ बोलून जात होत्या, तसा वासुदेव प्रत्येक वाक्याला त्यांना कुरवाळत होता. सगळं ऐकून झाल्यावर म्हणाला, ‘‘मी काही पाषाणहृदयी नाही गं! माझ्या हृदयावरचं भलंमोठं पाषाण होतं, खरं सांगू मीच तुमच्याकडे धावत येऊन बिलगणार होतो. पण, माझे हे वासुदेवाचे रूप तुम्ही स्वीकारणार नाही, याचं भयं होतं. पण, आता माझं भय पार दूर गेलं.’’
हेमूकाका देवळाच्या दाराआडूनच सर्व ऐकत होते. त्यांनी विचार केला. बरं झालं आपण मुलींना इथे पाठवलं.
सगळं शांत झाल्यावर संभवी म्हणाली, ‘‘बाबा, मी अभिनेत्री झाले आहे. यंदा शासनानं मला अभिनयाचं प्रथम पारितोषिक म्हणून सुवर्ण कमळ देण्याचं जाहीर केलं आहे. त्याक्षणापासूनच मला तुमची अनावर आठवण येत होती. मला बक्षीस घेताना तुमच्या चेहर्‍यावरचा आनंद मला बघायचा आहे. बाबा! तुम्ही घरी चला आता. माधवीताईसुद्धा मोठी निर्माती झाली आहे. तिला जान्हवीताई परदेशातून पैसा पुरवते, आईसुद्धा अजूनही तुमची वाट बघत आहे. इतकं संगळं सूख असून तिच्या डोळ्यांत सतत पाणीच असतं. बाबा, चला नं…’’ विसूकाकांच्या डोळ्यात पाणी तरळले. ते बोलू लागले, ‘‘ मुलींनो, या सर्व गोष्टींनी मी भारावलो आहे. पण, माझ्या भरकटलेल्या आयुष्यात या गावानं माझा सांभाळ केला, इथली माणसं तुमच्यासाखीच माझ्या नात्याची झाली, घासातला घास दिला, प्रेम दिलं, मान दिला, माझ्या या वासुदेव रूपाला आणि…’’ ‘‘बाबा, हे तुमचं रूप नाही हे तुमचं अभिरूप आहे आणि हेच न समजण्याची चूक आमच्याकडून झाली आहे.’’ संभवीचं ऐकून यावेळी वासुदेव गाल्यातल्या गालात समाधानाचं हसला. दोघींच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला, ‘‘हे गाव, हा गाभारा, मला जागं करणारी पक्ष्यांची किलबिल, ध्यानधारणेनंतर सांजवेळीचा रंगलेला हा तलावाचा किनारा हे सगळं आता माझ्या अंगवळणी पडलंय्, इथली माणसं, या गावात रमलेलो मी, कसा सोडू हा गाव.’’ वासुदेवांनं खाली वाकून चिपळ्या, एकतारी उचलली. मोरपिसांचा टोप डोक्यावर चढविला आणि ‘‘येतो’’ म्हणून पायर्‍या उतरू लागला आणि तोडांनं ‘‘आला आला वासुदेव, वासुदेव दारी आला, संतवाणी ऐकूनिया प्राण भिजवा प्राण भिजवा.’’ हे पालूपद म्हणत विसूकाका निघाले. दोन्ही मुली त्याच्या पाठीमागे प्रवेशद्वारापर्यंत गेल्या. तेव्हा हेमूकाका देवळाच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या भल्या मोठ्या द्वारपालाच्या मूर्तीआड थांबले…
‘‘बाबा, आपल्या सोबत येणार नाहीत का गं संभवी?’’ माधवी म्हणाली. इतक्यात द्वारपालांच्या मूर्तीमागून हेमूकाका आले, म्हणाले, ‘‘येईल तो! मी पाठवीन त्याला, खरं सांगू, विसूकाका हा विसू नाही विठू आहे तो विठ्‌ठलासारखं सगळ्यांना आपलंसं करून घेतो.’’ ‘‘विसूकाका, उतरवा आता तो मोरपिसांचा टोप डोक्यावरून, तुमच्या लेकी तुम्हाला घ्यायला आल्या आहेत. तुम्हाला जायला हवं…. पण पोरींनो, या गावापासून विसूकाकाचं नातं तोडू नका. थोडं जपत चला त्यांना.’’ तेव्हा संभवी म्हणाली, ‘‘हेमूकाका, माधवीताई मी अगदी प्राण ओतून खोट्या भावनांचा खरा अभिनय करते आणि शासन मला त्याच्यासाठी सुवर्ण कमळ बक्षीस देतो. पण, मग प्राण भिजवून समाजातील खरीखुरी नाती बांधणार्‍या या अभिरूपाला कोण सुवर्णकमळ देणार, हेमूकाका! हे सुवर्णकमळ माझं नाही, माझ्या वडिलांचं आहे.’’

•मुकुंद सदाशिव पुराणिक