झाशीची राणी

0
417

काल्पी. अपरात्र. वखारीतल्या पोत्यांआडून झाशीची राणी :-
‘‘तात्या! तिथेच थांबा. आणखी पुढे येऊ नका. तुमचा उपमर्द करायला मी म्हणत नाही आहे की, ‘आत येऊ नका.’ तुम्हास मी दिसावं, एवढी मी नेटकी नाही आहे या क्षणी!! या वखारीचे केवढे उपकार आहेत की,… तुमच्यापासून मला ही धान्याची पोती लपवून ठेवू शकत आहेत. तात्या तुम्ही मला तीर्थस्वरूप आहात. वंदनीय… पूजनीय आहात. तरीही… आज संपूर्ण देश तुमच्याकडे आशेनं पाहात आहे की,… हो! तात्या टोपे आपला भारत स्वतंत्र करून देणार आहे. मी, ही य:कश्‍चित झाशीची राणी, तुमच्या नेतृत्वाखाली समरांगणात उतरले आहे.
तुमची वाट पाहात मी झाशीचा किल्ला लढवीत राहिले. तुम्ही समयाला पावला नाहीत! समयाला पावले नाही म्हणून शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरास भारताच्या सरसेनापतिपदावरून बडतर्फ केलं होतं, ठावे आहे ना??… पण, मी कोण बडतर्फ करणारी. मला कोणी सम्राज्ञीचं मोल दिलेलं नाही;… मी आहे एका राज्याची… झाशीची… राणी!! पेशव्यांच्या दिमतीला आपण समयाला पावला नसतात तर कदाचित त्यांनी तुम्हाला सरसेनापतिपदावरून बडतर्फ केलं असतं… थांबा तात्या बोलू द्या मला. …नानासाहेब पेशव्यांना भारतीय स्वातंत्र्याची चाड आहे की, आपली पेशवाईची पेन्शन वाचवण्याची!! … श्रीमंतांवर टीका नाही करत आहे मी. तुम्ही म्हणता तशी माफीही मागेन मी. -पण, का? रीत म्हणूनच ना? रीत म्हणूनच मागेन मी; पण, त्यांनीही स्वार्थाचा विचार सोडून तुमच्या-माझ्यासारखा ह्या संपूर्ण देशाच्या स्वातंत्र्याचा नको का विचार करायला? …मी पाह्यलंय् तुम्हाला. तुमची सेना झाशीचा वेढा मोडून काढायला आली होती. तोफगोळे तुमच्या स्वातंत्र्याच्या फौजेवर तर जाऊन पडणार नाहीत ना, म्हणून आमचे गोलंदाज थांबले! आणि तिकडे तुमची फौज वाट पाहात राहिली, झाशीच्या किल्ल्यावरून तोफा केव्हा बरसतात, त्याची!! आमचे गोलंदाज फितूर होते की अनपढ, याचा विचार करण्यात काही अर्थ नाही, तात्या, कारण मी एकटीनं वेढा उकलून नव्वद मैलांवरली ही काल्पी गाठली आहे.
सर ह्यू रोजनं पाठवलेली इंग्रजी फौज वेडपटासारखा वेढा घालून बसली होती, झांशीच्या किल्ल्याला. एलिस नावाचा जहांबाज सेनापती पाठवला होता त्या पाताळयंत्री रोजनं !!… झाशीच्या राणीला धरायला. ‘अरे तुला साधी बिल्ली पकडायची तर साता जन्माची धाप लागेल; तिथे झाशीची राणी काय तुझ्या हाती लागणार आहे!! जा ऽऽ एखादी शेरनी पकडून पाहा; मग झाशीच्या राणीला धरण्याची स्वप्नं पाहाण्याचा विचार कर!!’ म्हणून कळवलं होतं त्याला दूताकरवी. तेव्हा हसला होता तो खदाखदा; आता कोर्टमार्शल चालेल त्याच्यावर आणि तुरुंगात स्वत:च्या डोईचे बाल उखडत बसेल तो!!
हो, तात्या!… मी झाशीच्या तटावरून घोडा फेकला. त्यावर स्वार होते मी. पाठीला माझा पुत्र, तेरा वर्षांचा दामोदर, बांधला होता. तात्या, इंग्रजांची अचंबित फौज बाष्कळपणे पाहात राहिली नुसती. काय घडतंय् कळेच ना तिला!! कळेपावेतो मी वेढा ओलांडून बाहेरसुद्धा पडले!… पण, तिथेच नष्टचर्य संपलं होतं, असं नाही! तुम्ही सगळे पराक्रमाचं कौतुक करत राहाणार की, ‘भैया, बघा; तिनं कसा फेकला तटाहून घोडा. पाठीला दामोदराला बांधून!’… या वीरश्रीनं युक्त अशा महाधाडसाचं कौतुक होत राहील या जगाच्या अंतापर्यंत… पण, नष्टचर्य तिथेच संपलं नाही माझं, या देशाचं,… थांबा, तात्या, श्रीमंतांवर टीका नाही करताहे मी !! …
त्या महामूर्ख एलिसनं एका कॅप्टनला माझ्या मागावर धाडलं, मला धरून आणायला. … ब्रूक्स का बोकर नाव आहे त्याचं, म्हणे; कळलं मला आत्ताच!! तात्या पंचेचाळीस कोस म्हणजे इंग्रजांच्या भाषेत नव्वद मैल अंतर कापून काल्पी गाठायचं; म्हणजे लहानसामान्य का गोष्ट वाटते आपल्यास!! दर वीस कोसावर घोडा बदलावा लागतो. धावू नाही शकत त्यापेक्षा एका रपेटीत! शिवाय वाटेत पाणी पाजावं लागतं… त्याला, मला, दामोदराला! तात्या सर्व गुप्तपणानं करून ठेवावं लागलं आधी. घोडे, दासी … सर्व काही व्यवस्था…
–तर एका ठिकाणी घोड्याला पाणी पाजायला थांबले होते मी. लहानग्या दामोदराच्याही पोटात काही घालायचं होतं. विहिरीतून पाणी शेंदताना दिसलं की, मागच्या टेकाडावर, तो कॅप्टनबाबा मागावर आला आहे! वीस-पंचेवीस इंग्रज स्वार होते त्याच्या सोबत. एका बाईला धरायला ते तर खूपच झाले होते. मी तशीच उठले. खोगीर कसलं, दामोदराला पाठीवर बांधलं आणि घोड्यावर मांड टाकली. (शांतता) कॅप्टनबाबाला वाटलं, आता मी पळून गेले तरी, आलेच तावडीत त्याच्या. मी घोडा वळवला… तो त्याच्या दिशेनं. सावकाश चालवत राहिले घोडा. …चकित झाला तो. थांबून राहिला. शरण येणार्‍या राणीला पाहून. विजयाचा उन्माद नव्हे पण, आनंद दिसत होता त्याच्या चेहर्‍यावर. मी स्तब्ध उभी राहिले. पन्नास कदमांवर इंग्रज फौजही स्तब्ध उभी होती. त्यांचा नेता तो कॅप्टनबाबा पुढ्यात होता. मी जे टाच मारली घोड्याला. डोळ्याचं पातं लवतं नं लवतं तोच आडवा घाव घातला खड्गाचा त्या कॅप्टनबाबाच्या कमरेवर. वरला कॅप्टन वेगळा. खालचा कॅप्टन वेगळा. तशीच वळले आणि सुसाट वेगानं दौडत आले; काल्पीच्या दिशेनं.
आत्ता मला समाचार मिळालाय् की कॅप्टनचे दोन तुकडे झाले नाहीत. इतकंच नाही तर तो वाचला़. केवळ बेशुद्ध झाला. मात्र; त्याच्या कमरेला जे पिस्तूल होतं त्याच्या म्यानावर वार बसला होता. म्यान उघडून पाहिलं. आत फक्त लोह-कीस मिळाला एवढा तडाखा अबलख होता. इथवर मी कशी पोहोचले, माझं मला माहीत! माझ्या मनात आता तुम्हा कोणाबद्दल काहीच नाही. श्रीमंतांबद्दलही राग राहिलेला नाही. झालं गेलं गंगेला मिळालं. आता पुढे पुन्हा तुमच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्ययुद्ध लढायला मी सिद्ध आहे, तात्या!!
तात्या ऽऽ! तुमच्या काल्पीत या अपरात्री एखादं लुगडं मिळेल का हो बदलायला? (शांतता) बाहेरच्या चिखलधुळीनं नव्हे; … स्त्रीच्या निसर्गधर्मानं माझे कपडे भरले आहेत!!’’
-डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे