चीन, भारत व भूतान : एक संघर्षप्रवण त्रिकोण!

0
123

प्रासंगिक
आंतरराष्ट्रीय सीमारेषेबाबतची काटेकोर अंमलबजावणी आमच्यासाठी विशेष महत्त्वाची आहे, असे म्हणून चीनने नुकताच एक विक्रमी राजकीय विनोद केला आहे. तसेच यासाठी संबंधित देशांच्या संयुक्त चमूने पाहणी करीत असावे, असा शहाजोगपणाचा सल्लाही दिला आहे. यासाठी चीनने शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या चीनमधील दलिगन येथील बैठकीचे निमित्त साधले आहे. दहशतवादाचा विरोध व आंतरराष्ट्रीय सीमा नियंत्रण हे दोन मुख्य मुद्दे समोर ठेवून ही बैठक आयोजित होती. याला विनोद म्हणून संबोधण्यामागचे कारण असे आहे की, या बैठकीअगोदर चीनने सिक्कीम (भारत) व भूतान यांच्या भूभागात पूर्वी केलेले करार मोडून घुसखोरी केली आहे. चिमुकला भूतान हा देश सर्व बाजूंनी जमिनीने वेढलेला व हिमालयाच्या पर्वतरांगांनी अक्षरश: कुशीत घेतलेला देश आहे. भूतानच्या उत्तरेला चीन व दक्षिणेला भारत आहे, हे बहुतेकांना माहीत आहे. मालदीवपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या भूतानमध्ये थिंफू हे राजकीय राजधानीचे शहर आहे, तर फुत्शोलिंग ही जणू आर्थिक राजधानी आहे. बस. संपली भूतानमधील महत्त्वाच्या शहरांची नावे. असा हा चिमुकला देश या भूतलावर आजवर शतकानुशतके स्वतंत्र राहिला आहे, याला योगायोग, एकेकाचे नशीब, दुर्लक्षणीय प्रदेश किंवा तटस्थतेचा स्वाभाविक परिणाम यापैकी काय म्हणावे, हे सांगणे कठीण आहे.
चीन-भूतान सीमावादाचे कारण : तिबेट व भारतीय उपखंड यांच्यामधून जाणार्‍या प्राचीन रेशमी रस्त्यामुळे (सिल्क रूट) भूतानला भौगोलिक व राजकीय विलगता प्राप्त झाली आहे. (नावाने सिल्क रूट असलेला हा रस्ता काटेरी तारांसारखा अनेक देशांवर ओरखडे काढणारा आहे.) भूतान बहुतांशी बौद्धधर्मी आहे, ही आणखी एक विशेषता म्हणायला हवी. १९ व्या शतकात वांगचुक घराण्याने भूतानला राजकीय एकछत्र प्राप्त करून दिले. कारण काहीही असेल, पण ब्रिटिश राजवटीने भूतानशी स्नेहाचे संबंध राखले. खरेतर भूतानला चिरडणे ब्रिटिशांना मुळीच अवघड नव्हते. मग ब्रिटिश असे का वागले? सध्या या मुद्याचा विचार न केला तरी चालेल. पण, यामुळेच आज चीन- भूतान सीमावाद निर्माण झाला आहे. नाहीतर तोही भारत-चीन सीमावाद झाला असता. कारण भूतान ब्रिटिशांनी व्यापला असता, तर तो आज इतर प्रांतांप्रमाणे भारताचाच एक हिस्सा झाला असता. भूतानचा आर्थिक स्वातंत्र्य, व्यापार सुलभता व शांततामय समाजजीवन यातला क्रमांक अव्वल आहे. दरडोई उत्पन्न खूपच चांगले आहे, भ्रष्टाचार नाहीच म्हटले तरी चालेल. पण, तरीही भूतान हे एक अविकसितच राष्ट्र आहे. आधुनिकतेचा भूतानला फारसा स्पर्श झालेला नाही. जगातील फक्त ५२ देशांशी व युरोपियन युनियनशी भूतानचे राजकीय संबंध आहेत. भूतान संयुक्त राष्ट्र संघटनेचा सदस्य असला, तरी सुरक्षा समितीच्या पाचही स्थायी बड्या सदस्यांशी (अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया व चीन) भूतानचे राजकीय संबंध नाहीत. पण, सार्क संघटना व बिमस्टेक ( बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टि सेक्टोरल टेक्निकल ऍण्ड एकॉनॉमिक को-ऑपरेशन) या लांबलचक नावाचे बिमस्टेक हे लघुनाम असून या संघटनेचे बांगलादेश, इंडिया, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, भूतान व नेपाळ हे देश सदस्य आहेत.) व अलिप्त चळवळीशी त्याचे सदस्यत्वाचे संबंध आहेत. भूतानी सैन्य व भारतीय सैन्य यात पूर्वापार स्नेहाचे व घनिष्ट संबंध आहेत तसेच भारत भूतानी सैनिकांना प्रशिक्षणही देत असतो. ही सर्व माहिती सविस्तरपणे पाहण्याचे कारण असे की, चीनने भूतानच्या हद्दीत रस्ता बांधण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे हा प्रश्‍न केवळ भूतानशी नव्हे तर भूतान, भारत व चीन या तीन देशांशी संबंधित होणे कसे क्रमप्राप्त आहे, हे स्पष्ट होईल.
स्वाभिमानी भूतान : भूतानच्या हद्दीतील डोकलाम भागात रस्ता बांधण्यासाठी चीनने घुसखोरी केली आहे. यामुळे या भागातील जैसे थे परिस्थिती बदलण्याचा धोका आहे. भूतानने याबाबत चीनला खडसावले असून, उभय देशातील सीमारेषा लक्षात घेता, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने या भागात सुरू केलेले बांधकाम ताबडतोब थांबवावे व जैसे थे स्थिती (स्टेटस को) निर्माण करावी, असे बजावले आहे. भूतान व चीन यात प्रत्यक्ष राजकीय संबंध नसल्यामुळे हा संदेश भूतानने चीनला भारताकरवी दिला होता/आहे.
भारताचाही चीनला इशारा : चीनने २०१२ साली केलेल्या परस्परसामंजस्याचा भंग केला असून, त्यामुळे सुरक्षेवर गंभीर परिणाम होतील, असा स्पष्ट इशारा भारतानेही चीनला दिला आहे. रॉयल भूतान आर्मीच्या सैनिकांनी चीनच्या सैनिकांना त्यांच्या कृत्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. भूतानमध्ये प्रशिक्षणाच्या निमित्ताने असलेल्या भारतीय जवानांनी आणि भूतानच्या सैनिकांनी चीनच्या सैनिकांना जैसे थे स्थिती न बदलण्याचे आवाहनही केले. जैसे थे स्थिती बदलण्याचा भारताच्या सुरक्षिततेवरही गंभीर परिणाम होत आहे.
भारताचा संबंध : भूतानमध्ये चीनने आता जे अतिक्रमण केले आहे, ते डोकलाम पठार हे भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत मोक्याच्या असलेल्या सिक्कीमलगत आहे. भारत, तिबेट व भूतान यांच्या सीमा डोकलाम पठारावर मिळतात. तेथून बांगलादेशची हद्दही केवळ ५२ किलोमीटर आहे. ईशान्य भारताला जोडण्यासाठी हा एकमेव चिंचोळा मार्ग आहे. हा भाग कुणाच्या हातात गेल्यास भारताचा ईशान्येतील सात राज्यांशी संपर्क तुटेल. त्यातून चीनचा अरुणाचलावर डोळा आहेच.
भारत, चीन व भूतान हा त्रिकोण : भारत आणि चीन यांच्यात भूतान या तिसर्‍या देशाचीही सीमा येत असल्याने संबंधित तिन्ही देशांशी चर्चा करूनच सीमारेषा आखली जाईल, असे चीनने २०१२ मध्येच मान्य केले होते. भूतानबरोबर परस्परच सीमारेषा निश्‍चित करण्याचा प्रयत्न या समजुतीचा भंग ठरेल, असेही भारताने नमूद केले आहे. नाथुलामार्गे सुरू असलेली मानससरोवर यात्रा रद्द : तणावाचे वातावरण लक्षात घेऊन सिक्कीममधील नाथुला येथून होणारी कैलास मानससरोवर यात्रा भारताने रद्द केली व या भागातून यात्रेला जाणार्‍या ८०० हून अधिक भाविकांसाठी उत्तराखंडमधील लिपूलेख खिंडीतून यात्रेला जाण्याचा मार्ग सुरू केला आहे.
नियंत्रणरेषेवर सज्जता : या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर दोन्ही देशांनी गेल्या काही दशकांनंतर या दुर्गम सीमाभागात प्रथमच प्रत्येकी तीन हजार सैनिक नियंत्रण रेषेवर तैनात केले आहेत. लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी गंगटोक व कलिमपॉंग येथे लष्कराच्या माऊंटेन डिव्हिजनच्या मुख्यालयाला भेट देऊन आपल्या लष्कराच्या सज्जतेचा आढावाही घेतला आहे. भूतानची भूमी भारतीय सीमेजवळ आहे तसेच दोन्ही देशांत सुरक्षेसंदर्भात सहकार्य करण्याबाबत व्यवस्थाही आहे. भूतानचे चीनशी सरळ राजकीय संबंध नाहीत. त्यामुळे भूतान आपली भूमिका भारताकरवी कळवीत असतो. भूताननेही संबंधित जमीन आपली असल्याचे स्पष्ट केले आहे. या जमिनीवर चीन फेरफार करण्याचा प्रयत्न करतो आहे. तेथे जाऊन जमिनीवर ताबा मिळवू, असे कुणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. नियंत्रण रेषेवरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर १९६२ च्या युद्धापासून धडा घेण्याचा इशारा देणार्‍या चीनला भारताने शुक्रवारी सडेतोड प्रत्युत्तर दिले. आताचा भारत आणि १९६२ चा भारत यामध्ये फरक असल्याचे केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी चीनला सुनावले आहे.
१९६७ मध्ये भारताने चीनला शिकवला धडा : १९६७ साली सिक्कीमला भारतात सामील व्हायचे होते. सिक्कीममधील नाथुला व चोला खिंडींवर ताबा मिळविण्यासाठी चीनने १९६७ च्या सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये केलेले आक्रमण भारतीय फौजांनी चिनी फौजांना येथेच्छ बदडून निष्फळ ठरविले. उभयपक्षी बरीच जीवितहानी झाली. तटस्थ निरीक्षकांनी या संघर्षाबाबत मत नोंदविले आहे की, प्रतिपक्षाला वाटाघाटीसाठी प्रवृत्त करण्यासाठी बळाचा वापर यापुढे यशस्वी होणार नाही, हे चीनला या निमित्ताने कळून चुकले आहे.
१९७९ मध्ये व्हिएतनामनेही माघार घेतली नव्हती : चीनच्या आंतरराष्ट्रीय दादागिरीपुढे नमायचे नाही, अशा निर्धाराने व्हिएतनामने चीनला १९७९ मध्ये टक्कर दिली होती. व्हिएतनाम सीमेवरच्या काही ठिकाणांवर ताबा मिळवून आता आम्ही व्हिएतनामची राजधानी हनोई सर करू शकतो, अशी शेखी मिरवीत, चीनने १९६२ मध्ये भारतावरील आक्रमण जसे एकतर्फी युद्धविराम करून आटोपते घेतले होते, तोच प्रकार व्हिएतनामबाबतही करून पाहिला होता. पण, व्हिएतनामला आपले कंबोडियाबाबतचे धोरण बदलविण्यास भाग पाडण्याच्या चीनच्या वल्गना हवेतच विरल्या होत्या.
चीनची धमकी किती गंभीर : १९६२ सालची भारताची युद्ध लढण्याची तयारी व आजची भारताची संरक्षणसिद्धता याबद्दल आपल्यापेक्षाही जास्त जाणीव चीनला असेल, इतके चीनचे गुप्तहेर खाते तरबेज आहे. भारताची उत्तर सीमा चीनसाठी अडचणीचे युद्धक्षेत्र आहे. या भागाचा सराव असलेला तिबेटी तरुण लष्करात यायला तयार नाही. चीनमधील समुद्र किनार्‍यालगतच्या क्षेत्रातून येणारे तरुण सैनिक या भागात पुरत्या क्षमतेने लढू शकणार नाहीत. दक्षिण चिनी समुद्रात चीन अनेक कटकटींनी अगोदरच बेजार आहे. चीनचा जानी दोस्त पाकिस्तान आपल्या भूभागातून चीनमध्ये होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी थांबवू शकत नाही. पाकिस्तान व उत्तर कोरिया सोडल्यास चीनचे खरे चाहते जगात शोधूनच काढावे लागतील! चीनची इच्छा नसतानाही रशियाने आपल्या प्रभावाने भारताला शांघाय ऑर्गनायझेशनचा सदस्य करून घेतले आहे. याशिवाय भारताशी कुरापत काढल्यामुळे, भारत व अमेरिका अधिक जवळ येणार असतील, तर ते चीनला परवडणारे नाही. त्यामुळे चीन प्रत्यक्ष संघर्ष करण्यापूर्वी दहादा विचार करील. पण, शत्रूला युद्ध करावेसेच वाटू नये, अशी स्थिती निर्माण व्हायची असेल, तर भारताने स्वत:च शस्त्रास्त्रसज्ज असायला हवे, याला पर्याय नाही. आजच्या मोदी शासनाइतकी या बाबतीतली जागृती, तत्परता व तडफ यापूर्वी चीनने अनुभवली नसणारच. याबाबत शंका बाळगण्याचे कारण नाही. फारच फार तर चकमकी यांच्यापुढे चीन जाण्याची शक्यता दिसत नाही. सिक्कीममधील वादाबाबत भारताशी राजनैतिक पातळीवर चर्चा करण्याचा मार्ग अजूनही खुला आहे; परंतु भारतीय सैन्याने संबंधित भूभागातून माघार घेतली तरच ही चर्चा होऊ शकते, अशी अट चीनने घातली आहे. संबंधित पक्षांनी संयम बाळगणे गरजेचे असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. द्विपक्षीय समझोत्यांचे पालन करून जैसे थे परिस्थिती एकतर्फी बदलता कामा नये, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
चीनने करार मोडला : वेटसॉप नामग्याल हे भूतानचे भारतातील राजदूत आहेत. त्यांनी म्हटले आहे की, डोकलाम हा वादग्रस्त भाग आहे. पण, चीन व भूतान यात लिखित करार असा आहे की, जोपर्यंत याबाबत शांततापूर्ण मार्ग निघत नाही तोपर्यंत जैसे थे स्थिती कायम राखावी. कोणीही एकतर्फी कारवाई करू नये. म्हणून रस्ता बांधण्याचे काम थांबवावे, अशी आमची मागणी आहे.
अडीच आघाडी : भारतीय लष्कर एकाच वेळी अडीच आघाड्यांवर (पाकिस्तान, चीन व काश्मीरमधील अतिरेकी व फुटीरतावादी चळवळी) लढण्यासाठी सज्ज आहे, असे विधान लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी नुकतेच केले होते. चिनी लष्कराने त्यांचे हे वक्तव्य बेजाबदार असल्याचे म्हटले आहे. भारतीय लष्करातील काही विशिष्ट व्यक्तीने इतिहासातून धडा घ्यावा आणि युद्धाबाबतची ओरड थांबवावी, असे लष्कराचे प्रवक्ता कर्नल कियान म्हणाले. चीनने नुकतीच भारतीय सीमेनजीक तिबेटमधील दुर्गम हिमालयीन भागात कमी वजनाच्या रणगाड्याची चाचणी घेतली आहे.
चीनला रस्ता बांधायचाच आहे. हिंदी महासागरात प्रवेश हवाच आहे, युरोपमध्ये प्रवेशासाठी खुष्कीचा मार्गही मोकळा करून हवा आहे. हे सर्व समजा उद्या मिळालेही, पण त्या मोबदल्यात भारताची बाजारपेठ गमवावी लागली, तर ते चीनला परवडणार आहे का? भारताची साथ नसती तर भूतानची आपल्याला आडकाठी करण्याची हिंमत झाली नसती, असा चीनचा होरा आहे. भूतानची हिंमत व भारताची साथ यामुळे चीनचा तिळपापड झाला आहे, त्याची आगपाखड सुरू आहे. सिक्कीममधूनही हा रेशमी रस्ता जातो आहे. चीनला यालाही विरोध झालेला खपत नाही. ही सरळसरळ दादागिरी आहे. चीनची ही दादागिरी कितीतरी अगोदरच हेरून/ओळखून माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस म्हणाले होते की, आपला खरा शत्रू चीन आहे. तेव्हा ही भूमिका अनेकांना, विशेषत: साम्यवाद्यांना, आवडली नव्हती. पण जॉर्ज फर्नांडिस यांना किती दूरदृष्टी होती, ते आपले साम्यवादी बांधव सोडल्यास आता सर्वांनाच पटेल, असे वाटते. साम्यवादी देश आक्रमक नसतात, ते मुक्तिदाते असतात, अशी त्यांची ठाम समजूत असते आणि अजूनही आहे.
वसंत गणेश काणे
९४२२८०४४३०