खूपच प्रतीक्षा करायला लावली हो…

0
79

रविवारचे पत्रे…
१९४७ साली स्वतंत्र झालेल्या भारताचा एकही पंतप्रधान १९४८ साली अस्तित्वात आलेल्या इस्रायलच्या दौर्‍यावर मागच्या ७० वर्षात गेला नाही! भारताने इस्रायलला मान्यता लगेच दिली, परंतु परिपूर्ण राजनैतिक संबंध मात्र प्रस्थापित केले नाहीत. भारतातील अल्पसंख्यकांना आणि मध्यपूर्वेतील अरबांना खूष करण्यासाठी, ते नाराज होऊ नयेत म्हणून फिलिस्तीनींनाच सतत झुकते माप दिले गेले. तरीही फिलिस्तीनींनी, अरबांनी भारताला काश्मीरप्रश्‍नी कधीही पाठिंबा दिला नाही. याउलट, ज्याला भारताने सतत सापत्नभावाची वागणूक दिली तो इस्रायल सतत भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. इस्रायलशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याची हिंमत २५ वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी दाखवली. तरीही त्यांना आणि नंतर पंतप्रधान अटलजींनाही इस्रायलला भेट देणे जमले नाही. चिमुकला परंतु सशक्त इस्रायल देश भारतीय पंतप्रधानाची आतुरतेने वाट बघत राहिला.
पुढच्या वर्षी पवित्र जेरुसलेममध्ये भेटू, असे एकमेकांना म्हणत यहुदी लोक दोन हजार वर्षे जगभर निर्वासितांचे आयुष्य जगत राहिले. आपल्या भारतातही होते ते! त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला, राष्ट्रभक्तीला जगात तोड नाही. भारतीयांना इस्रायलींविषयी आणि इस्रायलींना भारतीयांविषयी काय वाटते, याचे विराट दर्शन जेव्हा भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलच्या भूमीवर पाय ठेवले तेव्हा घडले! भारत आणि इस्रायल! क्रूर नियतीने प्रदीर्घकाळ एकमेकांपासून दूर ठेवलेले दोन सख्खे बंधू गळाभेट घेताना बघून रामायणातील भरतभेट आठवली! पंतप्रधान नेतन्याहू आणि तमाम इस्रायलींच्या चेहर्‍यावरचे भाव पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तमाम भारतीयांना विचारत होते, ‘‘बहोत इंतजार करवाया जी! अब ना बिछडेंगे हम!’’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल भेटीमुळे भारत-इस्रायल मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाला आहे, तो सतत वृद्धिंगत होत राहो. यातच दोन्ही देशांचे आणि जगाचेही हित सामावले आहे.
सोमनाथ देविदास देशमाने
९४२१६३६२९१

हात पुरेना म्हणून द्राक्षे आंबट!
महाराष्ट्राचे जाणते राजे शरद पवार यांनी पुण्याच्या पत्रपरिषदेत वक्तव्य करताना म्हटले की, मी राष्ट्रपतिपदासाठी इच्छुक नव्हतो. मी राष्ट्रपती झालो असतो तर तुम्हाला भेटता आले नसते. जनता अडाणी आणि मूर्ख आहे, काहीही सांगितले तरी तिला खरे वाटते, असा साहेबांचा होरा असावा. पवारांना मोदीजींनी या वर्षी ‘पद्मविभूषण’ किताब बहाल केला. त्यानंतर मोदी-पवार जवळीक निर्माण झाल्याचे चित्र दिसले. साहेबांची भाजपाविरोधाची धारही कमी झाली. राष्ट्रपतिपदासाठी नावही चर्चेत आले. जनतेशी भेटण्यासाठी कुणी राष्ट्रपतिपद नाकारले काय, हे जनतेने सांगावे. पवारसाहेब, आपण गेल्या ६० वर्षांपासून जनतेला भेटत आहातच. तेही अगदी साधा माणूस म्हणून नव्हे, तर अनेक सर्वोच्चपदी विराजमान राहून. आपण मूर्धन्य राजकारणी आहात तसेच कितीतरी मंत्रिपदे, तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्रिपद, देशाचे संरक्षणमंत्री, कृषिमंत्री याचा आपणाला दीर्घ अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत आपण यशस्वीसुद्धा झालात. आपणाएवढा दीर्घ प्रशासकीय कामाचा अनुभव सध्यातरी कुणाला नाही. आपणास जनतेने ‘लोकनेता’ मानले आहे. त्यामुळे आपणासारखा मराठा माणूस राष्ट्रपतिपदावर विराजमान झाला असता, तर आम्हाला अत्यानंद झाला असता. भाजपा शासनाने शेतकर्‍यांना कर्जमाफी दिल्यावर ती पुरेशी नाही, असे आपण म्हणालात. आपण दीर्घकाल राज्यकर्ते असताना शेतकर्‍यांना अंशता:ही कर्ज माफ झाले नाही, त्याचे काय? आपली आणि विद्यमान शिवसेना पक्षप्रमुखांची वक्तव्ये कधी इधर कधी उधर असतात, हे आता जनता समजून चुकली आहे.
तसेच वरील पत्रपरिषदेत आपण दहशतवादावर चिंता व्यक्त करून त्यांचेविरुद्ध केंद्राने कठोर कारवाई केली पाहिजे, असे म्हटले आहे. सोबतच पाकिस्तानशी युद्ध न करण्याची माझी भूमिका आहे, असेही सूतोवाच केले आहे. दहशतवादावर अंकुश लावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असाही सल्ला दिला आहे. पाकिस्तानशी आपण कितीही गोडीगुलाबीने राहिलो तरी त्याचे शेपूट वाकडेच राहणार. उलट तो अधिक आक्रमक होणार, हे आम भारतीयांना माहीत आहे. मग त्यासाठी कोणते प्रयत्न करावेत, हे या जाणत्या राजाने विद्यमान सरकारला सांगावे. शेवटी एक मर्दमराठा राष्ट्रपतिपदापासून वंचित राहिला, याचे दु:ख निश्‍चितच आहे.
साहेबराव घोगरे
८१४९८७४०४६

शरद पवारांचा इतिहासाचा अभ्यास!
पुण्यात श्रीमंत कोकाटे यांच्या ‘शिवछत्रपती महाराज’ या पुस्तकाचे प्रकाशनाचे वेळी शरद पवारांनी, शिवाजी महाराज हे ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ होते असे म्हणणे इतिहासाला धरून नाही. या विधानावरून त्यांचे इतिहासाचे आणि गोमाता आणि ब्राह्मण यांचा द्वेषच फक्त दिसून येतो. त्यांनी इतिहासाचा पुरावा देणारे आज्ञापत्रे, बखरी, पोवाडे, शिलालेख यांचा अभ्यास करावा म्हणजे शिवाजी महाराजांचे चैतन्याने सळसळणारे व्यक्तिमत्त्व आणि जनतेवरील प्रेम त्यांना समजेल!
खरे तर आपला भारत देश हिंदू धर्म मानणारा आहे. हिंदू धर्म हा हिंदूचा प्राण आहे, तरीही अठरापगड जातीचे, निरनिराळ्या धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने भारतात एकत्र राहतात, हे भारताचे खरे वैशिष्ट्य आहे. जनतेचा आनंद स्वार्थी राजकारण्यांना बघवत नाही. आपल्या स्वार्थासाठी हेच लोक जाती-जातीमध्ये द्वेष पसरवतात आणि समंजस, नि:स्वार्थी, विचारी लोकांचा राग करून शिवीगाळसुद्धा करतात. हेच पुण्याचे काम समजून राष्ट्रीय कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने जनतेला लुबाडण्यासाठीच केले. हिंदू धर्मात गाईला गोमाता मानतात, तिची पूजा करतात. कारण ती देवासमान आहे म्हणून. कारण समाजाला ती गोमाता सतत देतच राहते. पौष्टिक दूध, शेतीसाठी शेणखत, औषधियुक्त गोमूत्रसुद्धा महत्त्वपूर्ण आहे. गोमाता शाकाहारी आहे. खाते फक्त गवत, चारा आणि ढेप. पण, मांसाहारी लोक गाईला कापून खातात. (गोहत्या बंदी झाली तरी) केवढी दुष्ट प्रवृत्ती! जी गोमाता मनुष्याचे संगोपन करते. तिचे बछडेदेखील अत्यंत क्रूरपणे चौकात कापून खातात. केवढा हा कृतघ्नपणा! केवढे हे मनुष्याचे अध:पतन!
त्या गाईचा आणि तिच्या बछड्याचा आत्मा या दुष्ट लोकांना शाप देईल की नाही? तुम्ही म्हणाल कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. पण, गाईच्या शापाने मात्र असे दुष्ट मरतील, हे निश्‍चित! जनतेलाच लुबाडणे, त्यांच्यातच भांडण लावणे, त्यांचाच पैसा भांडण लावून खाणे, भ्रष्टाचार करणे, शेतकर्‍यांची दयनीय अवस्था या देशात कॉंग्रेसनेच केली अन् हेच नतद्रष्ट लोक, संप करण्यास प्रोत्साहनही देतात. पण, जनता आता हुशार झाली आहे. देेशासाठी मरमिटनेवाले कोण? आणि स्वत:चीच घरे भरणारे भ्रष्टाचारी कोण? हे चित्र आता स्पष्ट झाले आहे. आपल्या पापाची फळे भोगावीच लागतात. हे जग चालवणारा तो महान शक्तिमान ईश्‍वर सार्‍यांच्या पाप-पुण्याचा हिशोब ठेवतो. जनतेवर प्रेम करणारे, मरणालाही न भिणारे नरेंद्र मोदी आणि त्यांचे सद्वर्तनी सहकारी एकसे बढकर एक आहेत. ईश्‍वर त्यांना दहा हत्तींचे बळ देवो आणि स्वार्थासाठी राजकारण करणार्‍यांना शक्तिहीन करो, ही जनतेची हाक ईश्‍वर ऐकणार आणि चमत्कार घडणार, हे निश्‍चित!
शारदा पांडे
७८७५८१२४४९

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी राज्यात १०० आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा साकारण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्याची सुरुवात २०१७-२०१८ च्या सत्रापासून होणार आहे. अशा प्रकारचा धाडसी निर्णय १४ ऑक्टोबर २०१६ रोजी महाराष्ट्र शासनाने घेतल्याचे वृत्तपत्रात वाचले.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा इयत्ता पहिलीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राहणार आहेत. एक हजार विद्यार्थ्यांसाठी ३० शिक्षकांची नियुक्ती होणार आहे. या सर्व शाळांसाठी अवघड क्षेत्रात कार्य करणार्‍या शिक्षकांमधून अर्ज मागविले जाणार आहेत.
आता येथे प्रश्‍न असा पडतो की, अशा अवघड क्षेत्रात जाण्यासाठी किती शिक्षक तयार होतील? महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने वरील बाबींवर अधिक अभ्यास करून तोडगा काढणे किंवा पुनर्विचार करण्याची वेळ येणार आहे. यातील महत्त्वाचे कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेतील शिक्षक आपले घरदार, बायको-पोरं सोडून इकडे येणारच नाहीत. त्यावरील जालीम उपाय म्हणजे माय-बाप सरकारने, संवेदनशील शिक्षण विभागाने, डी. एड. व बी. एड. झालेल्या अनेक तरुण बेरोजगारांना संधी द्यावी. अशा बेरोजगारांची या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांसाठी निवड करावी. बर्‍याच कालावधीनंतर शिक्षक पात्र परीक्षा (टीईटी) घेण्यात येणार आहे. यामधूनही शिक्षकांची निवड करता येईल. पुन:पुन्हा परीक्षा घेण्याची गरज पडणार नाही. याही पलीकडे जाऊन लेखी, तोंडी, अध्यापनकौशल्य, संवादकौशल्य, गायन, वादन, शारीरिक शिक्षण अशा विविध कला-गुणांच्या आधारे शिक्षकांची निवड करावी. शेवटचे आणि महत्त्वाचे असे की, शिक्षक म्हणून ज्या गावातील शाळेत नियुक्ती होईल तेथून कुठेही बदली होेेणे नाही, याचीही हमी असावी. अशा शाळेवर केवळ वर्ग एक व दोनच्या अधिकार्‍यांचे नियंत्रण असावे, असे वाटते. या शाळेत राजकीय पुढार्‍यांचा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचा हस्तक्षेप नसेल.
प्रल्हाद सिडाम
९४२१८४६७३४

न्यूज चॅनेलमधील तमाशा!
बरखाचे काय होणार (त. भा. ३-७-२०१७) च्या संदर्भाने एनडीटीव्हीने हाकलून दिल्यावर बरखा दत्तला आता उपरती होते आहे. जेव्हा लठ्ठ पगार, कौतुक, मान मिळत होता तेव्हा नव्हता दिसत मालकाचा खोटेपणा! २१ वर्षांच्या नोकरीत तिने एकदाही आवाज उठवला नसावा. नाहीतर तिची आधीच हकालपट्टी झाली असती. स्वतंत्र बाण्याची, निर्भीड पत्रकार अशी तिची प्रतिमा आहे. तिने इतकी वर्षं शेपूट घालून नोकरी केलीच कशी? चॅनेलवर सी. बी. आय.ची धाड पडल्यावर तिचे धाबे दणाणले की, आता पुढचा नंबर आपला आहे. तिने लगेच पवित्रा बदलला. आतापर्यंत तिने आपल्या कार्यक्रमांत सरकारविरुद्ध जी बडबड केली, देशद्रोह्यांचे समर्थन केले, लोकांची दिशाभूल केली त्याचे काय? ती तिची मतं होती की चॅनेलची? चॅनेलला शिव्या देऊन ती आता सत्तेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे, असं दिसतं. अर्णब गोस्वामीनेही टाइम्स नॉव सोडल्यावर चॅनेलवर तोंडसुख घेतले होते. या लोकांना त्यासाठी त्यांना भरपूर पैसे मिळतात. चॅनेल म्हणेल तसे संवाद बोलतात. पत्रकारितेचे स्वातंत्र्य वगैरे सगळं खोटं आहे. न्यूज चॅनेलवर जो तमाशा चालतो ते पाहून वाटते की, ही एंटरटेनमेण्ट चॅनेल आहेत. चॅनेलच्या विचारसरणीनुसार त्या तमाशातील पटकथा, संवाद, अभिनय हे सगळं बरखा, अर्णबसारखे उत्तम कलाकार करतात. लोकही हा तमाशा आवडीने पाहतात. सरकार पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर बंधन घालते, असा आरोप असतो यांचा. पण, त्यांच्या स्वातंत्र्यावर चॅनेलच बंधन घालतं. हे पत्रकार पैशाच्या लोभाने हे बंधन स्वखुशीने स्वीकारतात. सत्ता आणि विचारसरणी ही चॅनेलच्या मालकाचीच असते. अर्णबने चॅनेल सोडल्यामुळे चॅनेलचे काहीच बिघडले नाही. त्यांना अर्णबसारखं ओरडणारी, कोणाला बोलू न देणारी दुसरी मुलगी मिळाली आहे. अर्णबने स्वतःचे चॅनेल सुरू केले आहे. बरखा दत्त आता नवीन कुरणाच्या शोधात आहे. नाहीतर पैसे, ग्लॅमर, लाईमलाईट, चैन याशिवाय जगणार कशी?
सुजाता दाते
०७१२-२२८९९६६

‘लिव्ह इन’पेक्षा विवाह योग्य!
सध्या आपल्याकडे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ची खूप चर्चा झाली आहे. एकटे असलेले स्त्री-पुरुष ‘लिव्ह इन रिलेशनशिप’च्या गोंडस नावाखाली एकत्र राहतात. पूर्वी लग्न न करता एखाद्या माणसाने दुसर्‍या स्त्रीशी संबंध ठेवल्यास त्याला अंगवस्त्र म्हणायचे. तिला लग्नाच्या बायकोचा दर्जा नसायचा. पाश्‍चिमात्य देशांतून ही प्रथा आलेली आहे. तेथील संस्कृती वेगळी आहे. तेथे कुटुंबपद्धतीला महत्त्व नाही. परंतु, आपल्याकडे स्त्री-पुरुषाला एकत्र राहण्यास विवाहबंधन आहे. समाजात लग्न न करता राहणार्‍या स्त्री-पुरुषाकडे वेगळ्याच अर्थाने बोलतात. अपत्य झाल्यास वडिलांचे नाव सहजासहजी मिळत नाही. एकत्र राहायचे असते, परंतु विवाहाचे पवित्र बंधन का नको?
तसेच राहिल्यास बंधनाचा प्रश्‍न नाही. एकट्या स्त्रियांनासुद्धा पुरुष सहवास हवा असतो. मित्र म्हणून गप्पा करणे, सिनेमा-नाटक बघणे, प्रवासाला जाणे- केवळ सहवास हवा. कदाचित स्त्रियांनासुद्धा मित्र हवा असेल. नवरा म्हणून येणारे बंधन- नवरेशाही नको. पटेल तोपर्यंत पटेल नाहीतर सोडले. परंतु, विवाहामुळे जीवनाला स्थैर्य प्राप्त होते. विवाह हे एक पवित्र नाते आहे. मध्यंतरी नागपूरला अशी संस्था निर्माण झाली होती. परंतु, लवकरच बासनात गुंडाळली गेली. लहानपणापासून आमच्यावर झालेले संस्कार, संस्कृती, आम्हाला रिलेशनशिप भावत नाही. आम्ही पती-पत्नी हे परमेश्‍वराने बांधलेल्या गाठी समजतो. सप्तपदीची सात पावले चालल्यावर सात जन्मी हाच पती मिळो म्हणून वटपौर्णिमेसारखे व्रत करतो. आमच्या नशिबात जेवढे सुख होत तेवढे मिळाले. त्या शिदोरीवर आम्ही आयुष्य सहज काढून जीवन जगू शकतो. तेवढी आमची मानसिकता परिपक्व झालेली आहे. पाश्‍चिमात्य संस्कृती एका विचारसरणीची आहे, असे आम्हाला वाटते. परंतु, भारतीय संस्कृतीत प्रत्येक नात्याला एक बंधन, कर्तव्य आहे. हे विसरू नका.
निर्मला गांधी
९४२१७८०२९०

कर्जमाफीची आकडेवारी…
अनेक बैठका, चर्चासत्रे, निवेदने आणि अशाच काही घडामोडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी आणि राज्य असे सर्वंकष हित पाहून, तसेच कोणत्याही मोहाला किंवा दबावाला आणि सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, जास्तीतजास्त गरजू शेतकरी सामावले जातील अशी बहुप्रतीक्षित कर्जमाफी जाहीर केली, पण ते करताना शेवटचे ध्येय कर्जमुक्ती हेच राहील, असे स्पष्ट केले. मुख्यमंत्री, अर्थमंत्री, सहकारमंत्री, कृषिमंत्री आणि इतर सर्व संबंधितांचे मनःपूर्वक अभिनंदन!
याचबरोबर लाभार्थी शेतकर्‍यांचेही अभिनंदन आणि नव्या हुरूपाने शेतीची कामे करून त्यांची शेती अधिक उत्पन्नाची, समाधानाची व्हावी, अशा शुभेच्छा! कर्जमाफीसाठी पात्र शेतकर्‍यांच्या संबंधी जिल्हावार आकडे देणारी एक बातमी विविध वाहिन्यांवरून दाखवली जात आहे आणि ती आकडेवारी म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी केलेले ट्विट असेही सांगत आहेत. सविस्तर यादी माध्यमांकडे पोचली असेलच. आता हे कर्जमाफीपात्र शेतकर्‍यांचे कर्जाचे आकडे केवळ दुष्काळ आणि शेतीतील नुकसान यामुळे आहेत, की इतरही काही कारणे असतील? कोकणातील तीनही जिल्ह्यांत काही हजार लाभार्थी आहेत. यातील कोणत्या जिल्ह्यातून सिंचन योजना मंजूर किंवा चालू होत्या तेही पाहणे महत्त्वाचे. दीड लाखापेक्षा कमी कर्ज असलेले शेतकरी तर पूर्ण कर्जमुक्त झाले आणि इतरांना एकूण कर्जातील मोठा भाग वजा झाल्यामुळे डोक्यावरील ओझे कमी झाल्याचा आनंद मिळाला आहे. या आधीच्या सरकारांनी अशी विस्तृत, पारदर्शी माहिती जनतेला कधी सादर केली होती का? देशात डॉ. मनमोहनसिंग यांच्या काळात कर्जमाफी झाली तेव्हा महाराष्ट्रात केवळ ५-६ हजार कोटींची कर्जमाफी झाली आणि त्याचे लाभार्थी कोण, यावर अजूनही चर्चा चालू आहे! या तुलनेत फडणवीस यांनी अतिशय स्वच्छ व पारदर्शी योजना सादर केली आणि ३६ लाखांहून जास्त शेतकर्‍यांच्या सुमारे ३४ हजार कोटी रुपयांच्या कर्जाला माफी दिली आहे. अभिनंदनीय!!!
प्रमोद बापट
९८२३२७७४३९