साईंवर अमिताभकृपा!

0
103

अग्रलेख…
माणसं संधीचं सोनं करतात, पण सोन्याचं काय करायचं, हा सवाल कायमच राहतो. माणूस मोठा होऊन होऊन किती होणार? अखेर तो मातीच्या पायाचा माणूसच राहणार की नाही? त्याने कितीही संधींचं सोनं केलं, तरीही मग सोनं हादेखील एक धातूच की… मग एखाद्या माणसाने माणसाच्या वकूब आणि क्षमतेपेक्षाही अधिक कर्तृत्व गाजविले की, मग त्याला देव करून टाकण्याची पद्धत अगदी अलीकडच्या काळापर्यंत होती. देव नावाची एक संकल्पना आहे आपली. पारलौकिक अशा शक्ती असलेले कुणी असेल तर ते देव असतात. बरे, प्रत्येक पिढीला असे आपले देव हवे असतात. माणसांत देवाचे कलम केले जाते त्यासाठी. हिंदूंचे ३३ कोटी देव आहेत. इतरही धर्मांचे देव आहेत. बाकी त्याहीपलीकडे जाऊन अनेक गावांच्या ग्रामदेवता वेगळ्या आहेत. काही जाती- जमातींचेही आपले वेगवेगळे देव जगभर आहेत. तरीही नवे देव निर्माण करण्याचा अन् ते प्रस्थापित करण्याचा अखिल मानवजमातीचा सोस काही संपता संपत नाही. त्यासाठी मग एखाद्या मर्त्य मानवात काही वेगळे दिसले की, मग त्याचा देव करून टाकण्याची संधी आम्ही काही सोडत नाही. आता माणसाचा असा देव केला की, मग या देवांचे काय करायचे, असाही एक सवाल आहेच. तिकडे दक्षिणेत हा सोस मोठ्या प्रमाणात आहे. एम. जी. रामचंद्रन्‌पासून जयललितांपर्यंत अनेकांची मंदिरे करण्यात आली. आपल्या रजनीकांतचाही असाच त्यांनी ‘याचि देही याचि डोळा’ देव करून टाकला आहे! बाळासाहेब ठाकरे यांचेही तिकडे नाशिककडे एकाने मंदिर बांधले आहे. अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर हेही आपले आधुनिक देव आहेतच. आता माणसांनी देवत्वाच्या पातळीवर जायला काही हरकत नाही. माणसं माणुसकीनंच न वागण्याच्या या जगात आता माणसांचे देव होत असतील, तर त्यात वाईट काहीच नाही. आपल्या देशात तर गल्लोगल्ली असे पोहोचलेले संत-महात्मे असतात. आतापर्यंत हे ठीक होते. मात्र, आता माणसांचा देव केल्यावर त्याला प्रत्यक्ष देवाच्याही पलीकडे नेऊन ठेवण्याचे ऍडव्हान्स व्हर्जन आलेले आहे. महानायक अमिताभचा आता ‘महादेव’ करून टाकण्यात आला आहे. म्हणजे आता अमिताभ शिर्डीच्या साईबाबांपेक्षाही मोठा झालेला आहे. म्हणजे तो शिर्डीच्या साईंना प्रमोट करणार आहे. साई संस्थानचा तो ब्रॅण्ड ऍम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आला आहे. यंव रे गब्रू!
आता तो साईंचेही प्रमोशन करणार म्हणजे अमिताभ बच्चन हा साईबाबांपेक्षाही मोठा झाला, असे मानायला काहीच हरकत नाही. आता मध्यंतरी शंकराचार्य म्हणाले होते की, साईबाबा हे काही हिंदूंचे देव नाहीत. त्यामुळे त्यांची हिंदूंनी पूजा करू नये. त्यावर बरेच वादळ उठले होते. टीव्हीच्या वृत्तवाहिन्यांना ब्रेकिंग न्यूज मिळाली. दिवसभर मग त्यावरच दळण दळले गेले. त्या निमित्ताने, साईबाबा आले कुठून, ते कोण होते, याच्या एक्सक्लूसिव्ह स्टोरीज् ‘हमारेही चॅनेलपर पहलीबार’ अशा सद्भावनेसह वारंवार दाखविण्यात आल्या. मग चॅनेलीय विद्वानांनी त्यावर चर्चासत्रही केले. आता त्यामुळे नेमके काय झाले, हे कळायला मार्ग नाही. साईभक्तांची संख्याही जगभर आहे. मात्र, साईच्या संत असण्यावर अन् ते देवाचा अंश असण्यावर शंकाकुशंका घेण्यातच आल्या आणि मग कदाचित साईंनाच कंटाळा आला असेल. नाहीतरी ते एका वरातीसोबत जात असताना कुणीतरी त्यांना, ‘‘आओ सांई’’ असे म्हणत हात धरून दगडावर बसवून घेतले आणि ते शिर्डीचे झाले, अशी आख्यायिका आहे. आता इतक्या वर्षांनी आपल्यावर शंका घेतली जाते म्हणून साईंनी शिर्डीतून बाहेर पडायचे ठरविले असेल. त्यामुळे भक्तांना अलीकडच्या काळात त्यांची दिव्य ज्योत शिर्डीत असल्याची दिव्य अनुभूती येईनाशी झाली असावी. त्यामुळे संस्थानकडे भक्तांचा ओघही कमी झाला असावा. म्हणून त्यावर बराच खल झाला असेल. संस्थानचे काय की, भक्तच आले नाही तर संस्थानचा इतका मोठा पसारा कसा सांभाळायचा? कुणीतरी सुचविले असावे की, साईबाबांचे नव्याने ब्रॅण्डिंग केल्याशिवाय विना भांडवलाचा हा व्यवसाय कसा चालायचा? ज्यांच्याकडे तेलही नाही दिवाळीला, अशांसाठी दिवे उजळणार्‍या साईंचा वापर नंतरच्या काळात जगाला ‘तेल’ (चुना लावणे या वाक्‌प्रचाराला हा पर्यायी वाक्‌प्रचार आहे.) लावणार्‍यांच्या श्रद्धेला व्यापणारा अन् सामान्यांना सबुरीचा सल्ला देणारा देव म्हणून करून घेण्यात आला. ते ज्या दगडावर विसावले होते, तो दगड सोन्याने मढला. मग अशा दैवी श्रीमंतीला अचानक ओहांटी लागली तर त्यावर अनेकांचे पोटच नाही, तर चैनीची मोट असलेला धंदा बसताना पाहून काहीतरीतर करावेच लागणार की नाही? मग त्यांनी साईंचेही ब्रॅण्डिंग करण्याची क्षमता असलेला कोण, याचा शोध घेतला आणि मग त्यांना अखिलजगत्‌स्वामी, ब्रह्मांडनायक, महानायक, शहेनशहा अमिताभची आठवण झाली! ‘‘साईंना वाचव रे बाबा,’’ असे साकडे संस्थानवाल्यांनी अमिताभला घातले आणि मग आता अमिताभ साईंचा ब्रॅण्ड ऍम्बेसेडर झालेला आहे. आजच्या बाजारीकरणाच्या अन् मार्केटिंगच्या, जाहिरातबाजीच्या युगात चांगल्याही गोष्टींची जाहिरात करावीच लागते. बरे, अलीकडच्या काळात साईंच्या स्पर्धेत इतरही देवस्थाने उतरली आहेत. विदर्भाच्या गजानन माउलींचे स्थान अद्याप अबाधित आहे. नाही म्हणायला स्वामी समर्थांचेही भक्त आहेत. त्यांचाही चित्रपट आला. साईंवर कधीकाळी मनोजकुमारने चित्रपट केला होता. त्यात दिग्गज कलावंतांनी काम केले होते. मात्र, आता या स्पर्धेत कदाचित साई मागे पडल्याचे वाटले असावे, म्हणून मग संस्थानचे संस्थानिक अमिताभच्या पायी पडले असावेत. त्यांना कळते की, आधुनिक काळात करिश्मा केवळ अमिताभकडेच आहे! तसेही त्याला रात्री झोप न येण्याचा वर मिळालेला आहे (रोग नाही म्हणायचे). तो अगदी मधापासून कायम चूर्णापर्यंत कशाकशाची जाहिरात करतोच. मग आपल्या साईंचीही केली तर काय हरकत आहे, हा विचार आजच्या युगाला साजेसाच आहे. काय आहे की, गजानन महराज संस्थान, स्वामी समर्थ देवस्थान यांचा कारभार वेगळा आहे. त्यांचे भक्तही आपले गरीब, कष्टाळू आहेत. त्यांच्या ज्या भक्तांची डोकी आभाळात पोहोचली आहेत; मात्र त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. संस्थानचा कारभारही म्हणूनच पारदर्शी आहे. साईंचा कारभार पाहणारेही भलतेच कारभारी. या संस्थानचा कारभार बघण्यासाठी अगदी सनदी अधिकारी नेमण्याची वेळही सरकारवर आली होती. त्यातही साईंच्या अवकृपेने संस्थानला अधिकारीही मिळाले ते लेखा पाठकबाईंसारखे. त्यालाही झालीत आता पंचविसेक वर्षे… साईंच्या चमत्कारांपेक्षा संस्थानचा कारभार पाहणार्‍यांचेच चमत्कार अगाध आहेत… भक्तांच्या श्रद्धेवर किती काळ ही आध्यात्मिक चैन टिकणार ना! त्यामुळे साईंचा करिश्मा झाकोळला. काय आहे की, नेता कोण आणि कसा आहे, त्यापेक्षा त्याला मानणारे कोण, कसे हे महत्त्वाचे ठरते. साईंचा महिमा कितीही अगाध असला, तरीही आता ते सारे जुने झाले आहे. त्यांच्या ऍसेटची घासून गुळगुळीत झालेली कॅसेट करून टाकली या लोकांनी. आता अमिताभसाई सांगतील की, साई किती मोठे आहेत. ज्यांना जे हवं ते देणारे हे साई आहेत. साईंचे काही नवे चमत्कार अमिताभसाई सांगतील. ते सांगतील की, ‘मर्द’च्या चित्रीकरणात मी कोसळलो आणि मरणाच्या दारी पोहोचून परतलो तो साईकृपेनेच! खासदार म्हणून निवडून आलो, तेही त्यांच्याच कृपेने. त्यानंतर मी ‘नॉन रेसिडेन्शियल इंडियन’ झालो, एबीसीएल कंपनी बुडाली, ८० कोट रुपयांचे कर्ज झाले तेही साईंच्या ‘मुलायम कृपे’नेच फेडता आले होते. आता अमिताभसाईंमुळे मोठ्या पडद्यावरचे लहानमोठे देवही साईमहिमा गातील. सचिनही येईल. अंबानीही येतील आणि मग अमिताभकृपेने साईंची डुबती नय्या पार लागेल… जय अमिताभसाई!!!