कोटेचा यांची नियुक्ती

0
78

वेध
जामनगर येथील गुजरात आयुर्वेद विद्यापीठाचे माजी कुलगुरू वैद्य राजेश कोटेचा यांची केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयात विशेष सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयएएसच्या बाहेरील व्यक्तीची अशा महत्त्वाच्या पदावर नियुक्ती होणे, ही कदाचित पहिलीच घटना असावी. निवृत्त आयएएस अधिकार्‍याचीही अशी नियुक्ती सहसा होत नाही. परंतु, रालोआ सरकारने चाकोरीसोडून वेगळा मार्ग स्वीकारण्याचे ठरविलेले दिसते. निवृत्त आयएएस अधिकारी परमेश्‍वरन् अय्यर यांना, पेज जल व स्वच्छता विभागात सचिव म्हणून मागे नियुक्त केले होते आणि आता कोटेचा यांची नियुक्ती. या नियुक्तीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आयएएस लॉबीत अस्वस्थता आहे.
मूळ गुजरातचे, ५४ वर्षीय वैद्य कोटेचा जयपूर येथील प्रथितयश आयुर्वेदतज्ज्ञ आहेत. आयुर्वेद क्षेत्रातील त्यांचे कार्य बघून त्यांना गेल्या वर्षी ‘पद्मश्री’ पुरस्कारही मिळाला आहे.
केंद्र सरकारचे आयुष मंत्रालय, ऍलोपॅथी सोडून इतर चिकित्सा पद्धतींशी संबंधित आहे. आतापर्यंत या चिकित्सा पद्धती दुर्लक्षित राहिल्या आहेत. आयुर्वेदाला भरभक्कम पाठिंबा देणे भारताचे कर्तव्य आहे. पण, आतापर्यंतचा कारभार पाहिला तर भारत त्यात अपयशी ठरला आहे. आयुर्वेदाला प्रोत्साहन देणे म्हणजे भारताला मध्ययुगात नेण्यासारखे आहे, असा एक खोडसाळ प्रचार सुरू असतो. त्याला सरकारच काय, सर्वसामान्यही बळी पडतात. अशा मंत्रालयात नियुक्ती झाली की, कशीबशी सेवा करायची आणि दरम्यान इतर मंत्रालयात बदलीची सतत खटपट करायची, अशीच वृत्ती येथील आयएएस अधिकार्‍यांची आतापर्यंत राहिली आहे. आयुष सचिवांची ही अनिच्छाच आयुर्वेदाच्या प्रचार, प्रसाराला मारक ठरत होती. वैद्य कोटेचा यांच्या नियुक्तीने हा सर्व अनिच्छेचा कारभार संपुष्टात येईल. ते कल्पक आहेत आणि त्यांचे संपूर्ण जीवन आयुर्वेदाला समर्पित आहे. त्यामुळे येत्या काळात भारतात तरी आयुर्वेदाला चांगले दिवस येण्याची शक्यता बळावली आहे. कोटेचा यांच्या गुणवत्तेबाबत कुणाचेच दुमत नाही; परंतु त्यांना विरोध, ते स्वयंसेवक आहेत म्हणून होत आहे. त्यांनी काही काळ संघाचे प्रचारक म्हणूनही कार्य केले आहे. त्यामुळेच हा पोटशूळ आहे. संघाची व्यक्ती, मग ती कितीही लायक असली तरी, तिच्याकडे तुच्छतेने बघण्याची आपली परंपरागत वृत्ती असल्यामुळे, कोटेचा यांच्या नियुक्तीकडेही याच दृष्टीने बघणे सुरू झाले आहे. पण, मोदी असल्यामुळे या लोकांचे काही चालणार नाही, हेही तितकेच नक्की!

‘न खाने दूँगा…’
‘‘लोकांमध्ये असा समज आहे की, तामिळनाडूतील अण्णाद्रमुक पक्षाच्या चारही गटांच्या दोर्‍या भाजपाच्या हातात आहेत. तामिळनाडू राज्याच्या राजकारणात स्वत:चा शिरकाव व्हावा म्हणून, भाजपाच्या राजकीय खेळीचा हा एक भाग असू शकतो. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत या राज्यातून अधिकाधिक मते मिळावीत म्हणून भाजपाची ही व्यूहरचनाही असू शकते. परंतु, तामिळनाडूतील संभाव्य मध्यावधी निवडणुकांच्या आधी, अण्णाद्रमुकशी युती व्हावी म्हणून जर भाजपाची ही दीर्घावधीची खेळी असेल, तर मग गंभीर प्रश्‍न उपस्थित होऊ शकतात.’’ वरील भाष्य अशा व्यक्तीचे आहे की, जी तामिळनाडूतील असूनही तिथे तिचा काहीच जनाधार नाही. एकदा लोकसभेत ती निसटत्या मताधिक्याने आणि तेही घोटाळा करून निवडून आली होती. ती व्यक्ती भ्रष्टाचारात आकंठ बुडालेली आहे आणि कुठल्याही क्षणी तिला अटक होऊ शकते. आर्थिक लाभासाठी देशाचे हितही खुंटीला टांगण्याची त्या व्यक्तीला खोड आहे. ती व्यक्ती म्हणजे कॉंग्रेस पक्षाचे महान नेते पी. चिदम्बरम्!
तामिळनाडू राज्यात भाजपाला म्हणावे तसे स्थान नाही. तिथले राजकारण द्रविड संकल्पनेवरच चालते; मग पक्ष कुठलाही असो. आणि द्रविड संकल्पनेत भाजपाला जागा नाही. परंतु, जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूत जी एक विचित्र परिस्थिती उद्भवली आहे, तिचा सर्वाधिक लाभ भाजपाला होत असल्याचे बघून चिदम्बरम् यांचे पित्त खवळले आहे. आता तर मोदीभक्त रजनीकांतही रणांगणात उतरत आहे. द्रविड राजकारणात कॉंग्रेसला कुणी विचारत नाही आणि भाजपाचे मात्र निमूट ऐकत आहेत, या वास्तवाने त्यांची झोप उडाली आहे. त्यामुळे आता चिदम्बरम् यांनी वेगळाच राग आळवणे सुरू केले आहे. त्यांच्या मते (आणि ते खरेही असू शकते) अण्णाद्रमुकचे सरकार अत्यंत भ्रष्ट आहे. हॉटेलमधील मेन्यू कार्डप्रमाणे तिथे उच्च स्तरावर काम करवून घेण्याचे ‘रेट कार्ड’ तयार आहे. तेवढे पैसे फेका आणि काम करवून घ्या. इतका व्यापक प्रमाणात भ्रष्टाचाराचा नंगानाच सुरू आहे. अशा स्थितीत, भाजपाने अण्णाद्रमुकशी युती केली, तर ते मोदी यांच्या ब्रीदाला हरताळ फासणारे ठरेल, असे चिदम्बरम् यांचे म्हणणे आहे. ‘‘न खाऊंगा, न खाने दूँगा,’’ हे ब्रीद मोदींनी घोषित केले होते. त्यापैकी ‘न खाऊंगा’ या ब्रीदाला मोदी यांनी सिद्ध केल्याचे चिदम्बरम् यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केल्याचे दिसून येते. पण, भाजपाने अण्णाद्रमुकशी युती केली तर ‘न खाने दूँगा’ या ब्रीदाचे काय, असा गंभीर प्रश्‍न चिदम्बरम् आजकाल विचारत आहेत. ज्या व्यक्तीने आपल्या कुशाग्र बुद्धीचा वापर करून, देशाचा अगणित पैसा, मालकीण व स्वत:ला खोर्‍याने ओढू दिला, ती व्यक्ती अण्णाद्रमुकसारख्या कथित भ्रष्टाचारी पक्षाशी भाजपाची युती होत आहे, म्हणून कळवळत आहे. तामिळनाडूमध्ये भाजपा केवळ शिरकावच नाही, तर मजबूत आधार निर्माण करीत आहे, हे खरे चिदम्बरम् यांचे दुखणे आहे. पण, आता त्यांना विचारतो कोण?
– श्रीनिवास वैद्य
९८८१७१७८३८