एंटर द ड्रॅगन!

0
138

दिल्ली दिनांक
माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस अचेतन अवस्थेत आजारी आहेत. वाजपेयी सरकारमध्ये सरंक्षणमंत्री असताना, फर्नांडिस यांनी एका व्याख्यानमालेत एक विधान केले होते. ‘‘भारताचा खरा शत्रू पाकिस्तान नाही, तर चीन आहे!’’ असे ते विधान होते व त्यावर बरेच वादंग झाले होते. फर्नांडिस यांचे विधान किती अचूक होते, हे आता दिसून  येत आहे.
पाकिस्तानला काश्मीरबाबत जो जोर आला आहे, त्यामागे चीनची ताकद आहे. चीनची फूस असल्यानेच पाकिस्तान भारताविरुद्ध दररोज युद्धबंदीचे उल्लंघन करीत आहे. आता चीनने स्वत:च उघडपणे भारताविरुद्ध दंड थोपटले आहेत. पाकिस्तानने काश्मीर आघाडी पेटत ठेवली आहे, तर चीनने सिक्कीमबाबत आघाडी उघडण्याचे ठरविलेले दिसते. काश्मीरमधील स्थिती चिंताजनक असताना, चीनने उघडलेली नवी आघाडी भारतासाठी एक गंभीर आव्हान ठरण्याचे संकेत आहेत.
बुरहाननंतरचे काश्मीर
वर्षभरापूर्वी २२ वर्षांचा बुरहान वानी नावाचा अतिरेकी,  सुरक्षा दळांशी झालेल्या चकमकीत ठार झाल्यावर खोर्‍यातील स्थिती  निवळेल, असा अंदाज वर्तवला जात होता. तसे झाले नाही. ८ जुलै रोजी  बुरहानच्या चकमकीस एक वर्ष पूर्ण झाले असताना, केंद्र सरकारला खोर्‍यात सुरक्षा दळांच्या २२४ कंपन्या  पाठवाव्या लागल्या, इंटरनेेट सेवा बंद करावी लागली, यावरूनच बुरहानची चकमक कोणता परिणाम घडवून गेली, याचा अंदाज बांधता येईल. काश्मीर खोर्‍यातून येणार्‍या बातम्या चिंताजनक आहेत. एका मोठ्या फळविक्रेत्याचा मुलगा एक दिवस दगडफेकीत सामील होण्यासाठी घराबाहेर गेला. सायंकाळी वडिलांनी त्याला   कानपिचक्या दिल्या. दगडफेकीत सामील होऊ नकोस, असे त्याला बजावले. दुसर्‍या दिवशी हा मुलगा घराबाहेर पडला आणि ‘मिलिटंट’ झाला. खोर्‍यात ‘मिलिटंट’ होणे हे एक अभिमानाचे काम झाले आहे. दुसरी एक घटना-  एका पित्याने आपल्या मुलीचा विवाह करण्यासाठी एका डॉक्टरची निवड केली. मुलीने विवाहास नकार दिला. ‘‘मी विवाह करील तर ‘मिलिटंट’शीच!’’ हे तिचे उत्तर!! काश्मीर खोर्‍यातील घटनाक्रम चिंताजनक आहे तो यासाठी. प्रथमच मुली, महिला मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आल्या आहेत. एक अतिरेकी नुकताच मारला गेला. त्याच्या अंत्यविधीस २० हजाराचा जनसमुदाय उभा आहे आणि एक शाळकरी मुलगी शेवटची प्रार्थना म्हणत आहे, सर्वत्र नि:शब्द शांतता आहे. हे दृश्य गंभीर संकेत करणारे आहे. बुरहान चकमकीस एक वर्ष पूर्ण झाल्यावर खोर्‍यात मोठा हिंसाचार होईल, असा अंदाज होता. केंद्र सरकारने वेळीच उपाययोजना केल्याने असा हिंसाचार झाला नाही. पण, हे झाले तात्कालिक यश. काश्मीर खोर्‍यातील स्थिती दिवसेंदिवस खालावत आहे. केवळ सुरक्षा दळाच्या बळावर ती  पूर्ववत होणारी नाही. यासाठी काश्मिरी जनतेला मुख्य प्रवाहाच्या जवळपास आणण्यासाठी उपाय योजण्यात आले पाहिजेत.
एक कटु सत्य
बुरहानच्या चकमकीनंतर काश्मीर खोर्‍यात स्थानिक अतिरेक्यांची संख्या वाढली, असेही सरकारच्या लक्षात आले आहे. बुरहानच्या चकमकीपूर्वी स्थानिक अतिरेक्यांची संख्या फार कमी होती, त्यात आता मोठी वाढ झाली आहे. एक प्रकारे ‘मिलिटंट’ होण्याचे भूत स्थानिक युवकांवर स्वार झाले आहे. सुरक्षा दळांच्या लक्षात ही बाब आली असली, तरी त्या आघाडीवर ते काही करण्याच्या स्थितीत नाहीत.
घटना वाढल्या
काश्मीरमध्ये सुरक्षा दळांवर हल्ले होण्याच्या घटना वाढत आहेत. पाकिस्तानच्या सक्रियतेचा व वाढत्या आत्मविश्‍वासाचा हा पुरावा मानला जात आहे. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या ज्या कारवाया सुरू आहेत, त्यावरून त्याने भारताविरुद्ध दंड थोपटण्याचे ठरविलेले दिसते, असा निष्कर्ष काढला जातो.
सिक्कीम  ते  हब्बनतोता
चीन फार दीर्घकालीन योजनेवर काम करीत आहे. भारताभोवती फास तयार करण्याची त्याची योजना आहे. सिक्कीमच्या डोकलाम भागावर दावा सांगणे, हा त्यातील एक भाग आहे. भूतानला भारताचे संरक्षण आहे. ही बाब चीनच्या डोळ्यांत खुपत आहे. चीनने तिबेट गिळंकृत केला. तिबेटच्या संस्कृतीचे नामोनिशान त्याने मिटविले. आता त्याला अचानक सिक्कीमचे स्मरण झाले आहे. डोकलाम प्रकरण कुठपर्यंत ताणले जाईल, याचा अंदाज कुणालाही करता आलेला नाही. ‘ग्लोबल टाइम्स’ या बीजिंगहून प्रसिद्ध होणार्‍या सरकारी वृत्तपत्राने अतिशय कठोर भूमिका घेतली आहे. सीमेवर चीनने काही कारवायाही केल्या आहेत. डोकलाममधून भारतीय सैन्य मागे घेतले जाईपर्यंत भारताशी चर्चाही नाही, ही चीनची भूमिका काहीशी चिंताजनक अशी आहे. चिनी राजदूतानेही अनपेक्षित अशी कडक भाषा वापरली आहे. चीन केवळ काश्मीर सीमेवर पाकिस्तानला पाठिंबा देत व स्वत: सिक्कीम सीमेवर थांबणारा नाही. भारताला घेरण्यासाठी त्याने थेट दक्षिणेत  हब्बनतोता या श्रीलंकेतील बंदराची निवड केली आहे. चीनच्या पुढाकाराने या बंदराचा विकास केला जात आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर आपले नौदल तैनात करण्याची त्याची योजना आहे. हब्बनतोतापासून  भारताचा किनारा फार दूर नाही. तेथून केव्हाही भारतावर मारा करता येऊ शकतो, किमान तशी स्थिती तयार करता येऊ शकते, या  व्यूहरचनेवर चीन मागील काही वर्षांपासून काम करीत आहे.
भारताचे ब्रह्मास्त्र
चीन सीमेवर सुरक्षा बळकट करण्याची गरज लष्कराला वाटत होती. त्याचाच एक भाग म्हणून २०१३ मध्ये युपीए सरकारने माउंटन स्ट्राईक कॉर्प उभारण्यास मजुंरी दिली. यात जवळपास ९० हजार सैनिक असतील.  ‘ब्रह्मास्त्र’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या या दळाचे मुख्यालय पश्‍चिम बंगालमधील पानागढ हे असून, यात काही तुकड्या भारत-चीन सीमेवर तैनात केल्या जात आहेत. अर्थात, ही एक दीर्घकालिक योजना आहे.
चिकन नेक
भारताच्या काही राज्यात नक्षलवाद्यांनी जो रेड कॉरिडॉर तयार केला आहे, त्याचेही धागेदोरे चीनपर्यंत जात असल्याचे काही वर्षांपूर्वीच्या एका सरकारी अहवालात नमूद करण्यात आले होते. याचा अर्थ, चीन केवळ पाकिस्तानला पाठिंबा देऊन थांबलेला नाही. काश्मीर आघाडी, सिक्कीम आघाडी, दक्षिणेत हब्बनतोता, वेळ  पडल्यास भारताला पूर्वोत्तर भारताशी जोडणारे ‘चिकन नेक’ यावरही चीनचा डोळा राहणार आहे. देशाला पूर्वोत्तर भागाशी जोणारा ८४ मैल लांबीचा एक अरुंद पट्‌टा आहे, जो ‘चिकन नेक’ म्हणून ओळखला जातो. काही भागात तर तो फक्त १६ मैल एवढाच रुंद आहे. एकीकडे नेपाळ तर दुसरीकडे बांगला देश अशी ही स्थिती आहे. नेपाळ चीनच्या बाजूने आहे. बांगला देश सध्या भारताच्या बाजूने असला, तरी केव्हा त्याच्या भूमिकेत बदल होईल, हे सांगता येत नाही. या दोन्ही देशांना हाताशी धरून चीन ‘चिकन नेक’ आवळण्याचा प्रयत्न करू शकतो. असे झाले तर भारताचा पूर्वोत्तर भागाशी संपर्कच तुटतो. अर्थात, हे करणे चीनसाठी एवढे सोपे नाही.
धोरण आवश्यक
चीनबाबत एक सर्वंकष धोरण ठरविण्याची वेळ आली आहे. भारतीय औषध उद्योगाचा कच्चा माल चीनमधून येतो. हे प्रमाण आहे ८५ ते ९० टक्के. उद्या चीनने हा औषधपुरवठा बंद केला तर? भारतातील औषध उद्योग बंद पडतील. अमेरिकन कंपन्यांच्या महागड्या औषधांवर भारताला अवलंबून राहावे लागेल. चिनी ड्रॅगन जागा झाला आहे. त्याने विळखा घालण्यापूर्वीच भारताला  ठोस निर्णय घ्यावे लागतील…
– रवींद्र दाणी