ममतांना धडा शिकविण्याची गरज!

0
171

अग्रलेख
पश्‍चिम बंगालमधील २४ परगणा जिल्हा हा हिंसाचाराने जळत आहे, घुसखोर व मुस्लिम समुदायाने तेथे उच्छाद मांडला आहे. ते पोलिस ठाणी, त्यांची वाहने जाळत आहेत आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हा सर्व हिंसाचार मूकदर्शक बनून पाहात आहेत. कारण एकच- मुस्लिमांचे लांगूलचालन! १७ वर्षांच्या एका मुलाने ३० जूनला फेसबुकवर एक पोस्ट टाकली. ही पोस्ट आक्षेपार्ह असल्याची ओरड करून सर्वात आधी २४ परगणामधील बशीरहाट येथे हिंसाचार उफाळला. नंतर त्याचे लोण बदुरिया आणि लगतच्या भागात पसरले. पोलिसांच्या गाड्या जाळणे, बाजारातील हिंदूंची दुकाने जाळणे, येणार्‍या-जाणार्‍या दुचाकी आणि मोटारींना अडवून त्यांना पेटवून देणे, असा प्रकार सुरू झाला. भाजपा आणि अन्य पक्षांनी याला विरोध केला असता, तेथे चकमकी उडाल्या. या हिंसाचारात दोन जणांचा जीव गेला. या घटनेची वेळीच दखल घेतली गेली असती, तर हिंसाचार तेव्हाच आटोक्यात आला असता. पण, ममताने हा जिल्हा जळू दिला. कारण, आंदोलक हे मुस्लिम समुदायाचे होते व त्यातील बहुतेक हे बांगलादेशातून आलेले घुसखोर होते. त्यामुळे त्यांना यथेच्छ हिंसाचार करण्याची जणू मोकळीकच ममतांनी दिली. ज्या मुलाने ही पोस्ट टाकली होती त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या म्हणण्यानुसार ही पोस्ट मी टाकलीच नाही. कुणीतरी माझ्या नावाने ती टाकली. अर्थात, हा तपासाचा भाग आहे. पण, या हिंसाचाराला रोखण्यात पोलिस पूर्णपणे असमर्थ ठरले, हे वास्तव आहे. जेव्हा भाजपा, कॉंग्रेस आणि डाव्या नेत्यांनी बशीरहाट भागात भेट देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना अडविण्यात आले व अटक करण्यात आली. भाजपाच्या खासदार रूपा गांगुली यांनी असा आरोप केला आहे की, तिथल्या गुंडांनी महिलांवर बलात्कार केलेत. तिथल्या लोकांची घरे जाळली. पण, हे सत्य बाहेर येऊ नये म्हणून ममता या आम्हाला रोखत आहेत. तिकडे ममतांनी केंद्र सरकार आणि भाजपावरच आरोप केला आहे. केंद्राने योग्य वेळी मदतच पाठविली नाही, असा कांगावा त्या करीत आहेत. वास्तव हे आहे की, स्वत: केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी ममतांशी बोलणी करून केंद्रीय मदत किती हवी, याबाबत विचारणा केली होती. पण, ममतांनी ठाम नकार दिला होता. तब्बल सहा वेळा केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ममतांना विचारणा झाली. पण, ममता गंभीर नव्हत्या, असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे. याचा अर्थ, ममतांचे हिंसाचाराला प्रोत्साहन होते, हे स्पष्ट दिसत आहे. आता त्यांनी न्यायिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. २४ परगणा व आणखी सहा जिल्हे बांगलादेश सीमेला लागून आहेत. येथूनच मोठ्या प्रमाणात घुसखोरी, बनावट नोटा, मादक पदार्थ, शस्त्रे ही पश्‍चिम बंगालात येतात. या जिल्ह्यांच्या सीमांवर अर्धसैनिक दलाच्या अतिरिक्त तुकड्या आणण्यास ममतांचा विरोध आहे. मागे असाच महामार्गावर वाहनांचा तपास करण्यासाठी केंद्रीय राखीव पोलिस दलाने चेक पोस्ट लावले असताना ममतांनी त्याला विरोध दर्शवून हा आमच्या राज्याच्या कामकाजात हस्तक्षेप असल्याचा कांगावा केला होता. ममता या कॉंग्रेसमधूनच आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या शरीरात कॉंग्रेसच्या मुस्लिम आणि घुसखोरांच्या लांगूलचालनाचा डीएनए असणारच! त्या आधारावर त्या पश्‍चिम बंगालमध्ये राजकारण करीत आहेत आणि देशद्रोह्यांना मोकळे रान देत आहेत. मागे राज्यपालांनी त्यांना फोन करून स्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली असता, राज्यपालांनी मला धमकी दिली, असा बालिश आरोप ममतांनी केला होता. डाव्यांच्या ३४ वर्षांच्या प्रदीर्घ राजवटीला आव्हान देऊन ममता, सिंगूर आणि नंदीग्राम आंदोलनात सहभागी झाल्या आणि भावनांच्या लाटांवर स्वार होत आगामी २०११ व नंतर २०१६ च्या निवडणुकीत त्यांनी एकहाती बहुमत प्राप्त केले. त्या वेळी त्यांनी पहिले वाक्य उच्चारले होते- पश्‍चिम बंगाल भ्रष्टाचारमुक्त राहील! त्या वेळी प्रसिद्धिमाध्यमांना आणि प. बंगालच्या जनतेलाही वाटले होते की, ही सामान्य महिला राज्याचा चेहरामोहरा बदलवून टाकेल. पण, झाले उलटेच! अडीच हजार कोटींचा शारदा घोटाळा, १७ हजार कोटींचा रोज व्हॅली घोटाळा आणि नारद स्टिंग ऑपरेशन हे हजारो कोटींचे घोटाळे उघडकीस आले. अगदी काही महिन्यातच त्यांनी आपला रंग दाखवायला सुरुवात केली. राज्यात २७ टक्के मुस्लिम लोकसंख्या आणि त्यापैकी ३० टक्के मतदार आहेत, हे जाणून त्यांनी लांगूलचालन सुरू केले. त्यांच्या प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात, उत्सवात, इफ्तार पार्ट्यांमध्ये त्यांनी हजेरी लावली. इमामांचे मानधन सुरू केले. इथपर्यंत ठीक होते. पण, ज्या वेळी बांगलादेशमधून ८० हजार घुसखोर आले, बनावट नोटा येऊ लागल्या तेव्हा त्यांनी एक जाहीर भूमिका मांडली. हे घुसखोर नसून शरणार्थी आहेत आणि त्यांना कुणी हात लावण्याचा प्रयत्न केल्यास तो आम्ही हाणून पाडू. त्यांच्या या भूमिकेमुळे सारा देश अवाक् झाला. हा होता त्यांचा पहिला हिरवा रंग! यावरून त्यांचे मनसुबे लक्षात यायला वेळ लागला नाही. या घुसखोरांना स्थानिक लोकांच्या उरावर आणून वसविले. मालदा जिल्ह्याच्या गोपालगंज भागात अफीमची शेती मोठ्या प्रमाणावर होते. पण, ममतांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. उलट, ही शेती करण्यासाठी बांगलादेशी घुसखोरांना तेथे नेऊन वसविले. त्यांनी शेतकर्‍यांच्या जमिनी बळजबरीने हिसकून घेतल्या. सिंगूर आणि नंदीग्राममध्ये शेतकर्‍यांच्या हिताची भाषणे ठोकणार्‍या ममतांचा खरा चेहरा येथे उघड झाला. बांगलादेशच्या सीमेवरील कालीचक-३ या ब्लॉकमध्ये तर पोलिसही जाऊ शकत नाहीत, एवढी तेथे अफीम माफियांची दहशत आहे! या भागाला ‘मिनी अफगाणिस्तान’ म्हटले जाते, पण ममतांना लाज वाटत नाही. मागे याच लोकांनी एका हिंदू नेत्याच्या पोस्टवरून प्रचंड हिंसाचार केला होता. पोलिसांची ५० वाहने, सरकारी इमारती आणि कालीचक पोलिस ठाणे पेटवून दिले होते. पण, ममतांनी कोणतीच हालचाल त्या वेळीही केली नव्हती. तिकडे दार्जिलिंग २४ दिवसांपासून जळत आहे. नुकत्याच ताज्या हिंंसाचारात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन गोरखा ठार झाले. गोरखा समुदायाचे आंदोलन चिरडून टाका, असे निर्देश ममतांनी दिले आहेत. दार्जिलिंगसह सर्व पर्वतीय क्षेत्रात बंगाली भाषा अनिवार्य करण्याच्या सक्तीला गोरखा संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. एकूणच, सामान्य दिसणार्‍या ममता बॅनर्जी या राष्ट्रद्रोही लोकांना, बनावट नोटांचा व्यवहार करणार्‍यांना, अफीमची शेती करणार्‍यांना, हिंसाचार माजविणार्‍यांना मोकळे रान देत आहेत. त्यामुळेच भाजपाने तेथे राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. ममतांची ही मुजोरी वेळीच मोडून काढली नाही, तर हे विष अधिकच पसरण्यास वेळ लागणार नाही!