साप्ताहिक राशिभविष्य

0
525

रविवार, ९ ते १५ जुलै २०१७
श्र सोमवार, १० जुलै- अशून्यशयन व्रत, बाजीप्रभू देशपांडे पुण्यतिथी;  श्र मंगळवार, ११ जुलै-  भद्रा (प्रारंभ २५.२७), मंगळाचा कर्क राशी प्रवेश (१४.५८), विश्‍व जनसंख्या दिन;  श्रबुधवार, १२ जुलै- संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय रात्री ९.२६), भद्रा (समाप्त १४.०१); श्र गुरुवार, १३ जुलै –  श्री येलोजी महाराज पुण्यतिथी- अंभोरा (बुलडाणा); श्रशनिवार, १५ जुलै – भद्रा (१४.३१ ते २३.०६), श्री रामजीबाबा पुण्यतिथी- मोर्शी (अमरावती).
संक्षिप्त मुहूर्त ः साखरपुडा-१०,११,१२,१५ जुलै; बारसे- ११,१३ जुलै; जावळे- १३ जुलै; गृहप्रवेश- १०,११,१५
मेष- प्रकृती आणि प्रतिष्ठा सांभाळा
या आठवड्यात आपल्या राशीस्वामी मंगळाची स्थिती मागील आठवड्याप्रमाणे असून तो रवीसोबत पराक्रमात अस्तंगत आहे. चंद्र मात्र भाग्य स्थानापासून व्यय स्थानापर्यंत प्रवास करणार आहे. मंगळ व शनीचे षडाष्टक  आपणांस त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. विशेषतः प्रकृती आणि प्रतिष्ठा या अंगाने या कुयोगाचा दुष्परिणाम आपणांस जाणवू शकतो. अष्टमातून होणाराहा योग फारसा हितावह नाही. कुटुंबात बेबनाव, मतभेद, संततीकडून चिंता, मित्रांचे असहकार्य आपणांस या काळात राहू शकते. परंतु यातही दिलासा देणारी एक गोष्ट म्हणे गुरू आपला अर्थत्रिकोण मजबूत करीत आहे. आपली कार्यक्षेत्राची बाजू गुरू स्वतः सांभाळीत आहे. त्यामुळे आपली आर्थिक घडी मजबूत राहील. नोकरी- व्यवसायातील आपले स्थान उत्तरोत्तर प्रगतिपथावर राहील. आर्थिक नाकेबंदी आपणास जाणवणार नाही. शुभ दिनांक- ९,१०,११,१२.
वृषभ- नोकरी-व्यवसायात सुस्थिती
आपला राशीस्वामी शुक्र स्वतःच्या राशीत असून त्याच्यावर गुरुची शुभ दृष्टी आहे. शुक्र आपल्याला चांगले योग देणार असला तरी सप्तमातून त्याच्यावर शनीची दृष्टी आहे. चंद्रही या आठवड्यात अष्टमातून लाभस्थानापर्यंत प्रवास करणार आहे. शनी आपला योगकारक आहे. त्याची आपल्या राशीवर तसेच राशीस्वामी शुक्रावर शुभ दृष्टी आहे. त्यामुळे अनेक चांगल्या योगांची जणू रांगच आपल्यापुढे लागणार आहे. नोकरी-व्यवसायात आपणास सुस्थिती अनुभवावयास मिळेल. भाग्याची साथ मिळून काही महत्त्वाचे करार, टार्गेट आपणांस पूर्ण करता येतील. या योगांचा आपणास दीर्घकाळ लाभ मिळेल. अडचणींवर मात करण्याचे, आपल्या व्यावसायिक स्पर्धकांवर मात करण्याचे आपणांस बळ देईल. तथापि आर्थिक गुंतवणूक व मोठ्या आर्थिक व्यवहारात फसवणूक होऊ नये, यासाठी देखील पुरेशी सावधगिरी बाळगावी.
शुभ दिनांक- १०,११,१२,१३.
मिथुन- कलेचे कौतुक होईल
आपला राशीस्वामी बुध आत धनस्तानात आला आहे. शिवाय चंद्राचे या आठवड्यातील भ्रमण आपल्या सप्तमस्थानातून भाग्य स्थानापर्यंत होणार आहे. हा काळ कला, क्रीडा व साहित्य क्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम राहील. आपल्या कलेचे कौतुक होईल. समाज व सरकारकडून त्याची योग्य दखल घेतली जाईल. काहींना मानसन्मान प्राप्त होऊ शकतात. सरकारी नोकरीत असणार्‍यांना हा आठवडा लाभदायक राहील. नोकरीत, व्यवसायात अधिकारपद लाभणे, आर्थिक लाभ मिळणे, अधिकार्‍यांची मर्जी संपादन करता येणे, व्यवसाय विस्ताराच्या योजना आकारास येणे संभव आहे. काही मंडळींना अचानक प्रवासाचे योग येऊ शकतात. दरम्यान शनी-मंगळ-रवीचे षडाष्टक आपल्या राशीतून होणार असल्यामुळे प्रकृतीची काळजी घ्यावी. वाहने सांभाळून चालवावीत. व्यसनांना आवर घालायला हवा.  शुभ दिनांक-९,१३,१४,१५.
कर्क- आर्थिक घडामोडींची शक्यता
आठवड्याच्या सुरुवातीला आपला राशीस्वामी चंद्र षष्ठ स्थानात आहे. आठवडाअखेर तो भाग्य स्थानापर्यंतचा प्रवास करणार आहे. गुरुच्या राशीतील चंद्र हा एक शुभ योग आहे. हा योग धार्मिक कार्यात, तीर्थाटन, प्रवास, विदेश गमन, धार्मिक उपासना-व्रतवैकल्यांना सुरुवात यादृष्टीने उत्तम आहे. या चतुर्मासात आपण एखादा संकल्प अवश्य करून तो तडीस न्यावा. त्याचे दीर्घगामी शुभ प्रभाव आपणास जाणवत राहतील. आपणांस आर्थिक बलवत्ता प्रदान करणारी ही ग्रहस्थिती आहे. त्यामुळे या काळात जास्त आर्थिक घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नोकरी-व्यवसायतून होणारे उत्पन्न वाढू शकते. व्यवसाय विस्तार होणे, नोकरीत इन्सेटिव्ह वगैरे मिळणे संभवते. दरम्यान, व्यय स्थानातून होणार्‍या शनि व रवि-मंगळाच्या षडाष्टकामुळे प्रकृतीची काळजी घ्या. शुभ दिनांक- ९,१०,११,१५.
सिंह-  आर्थिक नाकेबंदी संभव
आपला राशीस्वामी रवी लाभ स्थानात मंगळासोबत आहे. तर आपल्या राशीत राहू आहे. चंद्र पंचम स्तानापासून अष्टम स्थानापर्यंत प्रवास करणार आहे. दरम्यान राशीस्वामी रवी व त्याच्या सोबत असलेल्या मंगळाचे शनिशी षडाष्टक आहे. काहीसा आर्थिक नाकेबंदीचा हा आठवडा राहू शकतो. आपली आवक अतिशय मंद राहील, त्यामुळे आपल्या काही योजना रखडल्या जाऊ शकतात. उधारी, उसनवारी अडकून राहील. खर्च वाढलेला राहील. नाहक मानसिक अस्वस्थता, चिंता, मनस्ताप देणारा व क्लेषकारक हा काळ आहे.  आपल्या कामात अडथळे व अडचणी निर्माण होऊ शकतात. प्रामुख्याने या काळात कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक, मोठे सौदे करू नका. आपण प्रकृतीची काळजी घ्यायला पाहिजे. वाहने सांभाळून चालवा. पथ्यपाणी व्यवस्थित सांभाळा. शुभ दिनांक- ९,११,१३,१४.
कन्या-  मानसिक तोल ढळू नये 
आपला राशीस्वामी बुध आता लाभस्थानात आलेला आहे. तर चंद्र या आठवड्यात चतुर्थ स्थानातून प्रवास सुरू करीत सप्तम स्थानी स्थिरावणार आहे. दरम्यान पराक्रम स्थानातून शनी व रवी-मंगळाचे षडाष्टक होणार असल्याने हा आठवडा आपणास काहीसा त्रासदायक राहील. विसेषतः हा मानसिकदृष्ट्या तणाव आणि व्यग्रतेचा काळ आहे. नोकरी- व्यवसायाच्या ठिकाणी, कुटुंबात कुठल्याही परिस्थितीत आपला मानसिक तोल ढळणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. धनेश शुक्र भाग्यस्थानात असल्याने तो धनवर्धक ठरणार आहे. राशीतील गुरूची दृष्टी असल्याने शुक्राच्या या फलितास अधिक बळकटी मिळू शकते. मात्र काही संधी तडकाफडकी येऊन ऐनवेळेवर धावपळ करावयास लावू शकतात. नोकरीच्या शोधात असणार्‍या युवावर्गाला काही चांगल्या संधी लाभून त्यांचे अर्थार्जन सुरू होऊ शकेल. शुभ दिनांक- १०,११,१४,१५.
तूळ-  प्रकृतीच्या कुरबुरीने बेजार
आपला राशीस्वामी शुक्र पीडादायक अष्टम स्थानात आहे. तर वक्री शनीची शुक्रावर दृष्टी आहे. शिवाय चंद्र पराक्रमातून प्रवास सुरू करीत षष्ठ स्थानापर्यंत जाणार आहे. प्रकृतीची कुरबूर, बदलत्या हवामानाचा त्रास, संधिवात, जुनी दुखणी या काळात आपणास बेजार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या काळात सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या मनाचा राखून ठेवा. शनि विलंब लावतो, परीक्षा पाहतो, मात्र  उंच भरारी घेण्यासाठी चिकाटी देखील देतो. त्यामुळे आपल्या योजना प्रयत्नपूर्वक राबवा. व्यवसाय विस्ताराच्या वा काही नवे उपक्रम सुरू करण्याच्या योजना असतील तर हाती घ्या व मार्गी लावा. गुंतवणुकीच्या योजना सावधपणे राबवा. सुरुवातीला  आपणांस काहीशी दगदग- धावपळ करावी लागू शकते, मात्र त्याचे उत्तम यश कालांतराने मिळताना दिसेल. शुभ दिनांक- ११,१२,१३,१४.
वृश्‍चिक-  प्रकृतीची काळजी घ्यावी
आपला राशीस्वामी मंगळ या आठवड्याच्या सुरुवातीला अष्टम स्थानात रविसोबत अस्तंगत आहे. शिवाय  त्याचे आपल्या राशीतून वक्री शनीशी षडाष्टक आहे. चंद्र धन स्थानातून पंचमापर्यंतचा प्रवास करणार आहे. साडेसातीसदृश स्थितीमुळे आपणास सध्या विशेषतः प्रकृतीची अधिक काळजी घ्यावयास पाहिजे असे हे विपरीत ग्रहमान आहे. या आठवड्याची सुरुवातही कष्टप्रद ठरू शकते. जुनी दुखणी असणार्‍यांनी पथ्य-पाण्याकडे दुर्लक्ष करू नये. ११ जुलैला राशीस्वामी मंगळाचे राश्यंतर होणार असले तरी तो नीच राशीत जाणार असल्याने तो आपणांस काही विशेष लाभ करून देईल असे वाटत नाही. प्रकृतीबाबत एखादेवेळी दगदग-धावपळ करावी लागू शकते. काहींना छोटी-मोठी शस्त्रक्रिया, अपघात यांचे भय राहील. आपले आर्थिक अंदाजपत्रक देखील सांभाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल. शुभ दिनांक- ९,११,१४,१५.
धनु-  पैसा व प्रतिष्ठा पणाला
आपला राशीस्वामी गुरू दशम स्थानात असून व्ययस्थानात वक्री शनी आहे. शनीशी षडाष्टक करणार्‍या  अस्तंगत मंगळाची राशीवर दृष्टी आहे. चंद्र या आठवड्यात आपल्या राशीतून प्रवास सुरू करीत सुखस्थानी जाणार आहे. आपला साडेसातीचा त्रास सध्या चढत्या टप्प्यात आहे. पैसा, प्रतिष्ठा आणि प्रकृती पणाला लागली असणार. आपल्या प्रयत्नांनाही सध्या वेगवान यश मिळणे जरा दुरापास्तच दिसत आहे. ही एकंदर ग्रहस्थिती पाहता आपणांस प्रतिकूल स्थितीवर मात करण्याठी कंबर कसावी लागणार आहे. शनीच्या प्रभावाने सार्‍या संधी उशीराच लाभतील, मात्र तरी त्या आपण स्वकष्टाने, प्रयत्नपूर्वक पदरी पाडून घेऊ शकाल व विपरीत स्थितीतही यशाची एक एक पायरी पुढे चढू शकाल. कुटुंबात सौहार्द्र टिकवून ठेवण्यासाठी आपणांस प्रयत्न करावे लागतील.                 शुभ दिनांक- ९,१०,११,१५.
मकर- सहकार्‍यांमधील वजन वाढेल 
आपला राशीस्वामी शनी लाभ स्थानात असून तो रवी व अस्तंगत मंगळाशी षडाष्टक करीत आहे. त्यातच मंगळाची आपल्या राशीवर दृष्टीही आहे. चंद्र या आठवड्यात व्यय स्थानातून प्रवास सुरू करीत आठवडाअखेर पराक्रम स्थानी जाईल. ही स्थिती आपणांस आपल्या कार्यक्षेत्रात यश देऊ शकते. या क्षेत्रात काही चांगल्या संधी चालून येतील, त्यांचा वेळीच लाभ घ्या. यामुळे आपली प्रतिष्ठा व सहकार्‍यांमधील वजन वाढेल. विरोधकांवर विजय मिळविता येईल. अधिकार्‍यांची मर्जी संपादन करता येईल. नोकरीच्या शोधात असणार्‍या काहींना निश्‍चितपणे चांगल्या संधी लाभून अर्थार्जन सुरू करता येईल. व्यवसायात नव्या क्षेत्रात पाऊल टाकावयास हरकत नाही. भागीदाराशी मतभेद निर्माण होऊ शकतात, मात्र ते सामोपचाराने मिटविता येऊन व्यवसायात पुढे जाता येऊ शकेल.        शुभ दिनांक- १०,११,१२,१३.
कुंभ- कामांना विलंब होणार
या आठवड्याच्या आरंभी आपला राशीस्वामी शनी दशम स्थानात असून त्याचे पंचमातील रवी व अस्तंगत मंगळाशी षडाष्टक आहे. तर चंद्र लाभ स्थानातून प्रवास सुरू करीत शेवटी धन स्थानात येईल. काहीशा क्लेशकारक घटनांनी हा आठवडा सुरू होण्याची शक्यता असून तो बरीच मेहनत करून पदरी अल्प यश घालणार आहेत. परंतु विलंबाने का होईना आपली कामे व योजनांना गती गति मिळेल व त्यावर आपणास समाधान मानावे लागेल, असे दिसते. दरम्यान सहकार्‍यांची चांगली साथ मिळेल. विरोधकांच्या कारवायांना खीळ घातला येईल. नोकरीत, व्यवसायात, कुटुंबात, तसेच काहींना राजकारण व समाजकारणात स्वतःचा दबदबा निर्माण करता येईल. नोकरी-व्यवसायात काही संधी उपलब्ध होतील. मात्र अपेक्षित यश मिळवण्यासाठी अधिक मेहनत व संघर्ष करावा लागेल. शुभ दिनांक- ९,१३,१४,१५.
मीन-  विरोधकांच्या कारवाया वाढणार
राशीस्वामी गुरू सप्तमस्थानातून आपल्या राशीला शुभदृष्टीनेे पाहात आहे. अशात चंद्र दशमस्थानातून प्रवास सुरू करीत आठवडा अकेर आपल्याच राशीत येणार आहे. वरकरणी ग्रहस्थिती चांगली दिसत असली तरी षष्ठातील राहू विशेषतः आपल्या कार्यक्षेत्रातील विरोधकांच्या विघातक कारवाया वाढीस घालू शकतो. याचमुळे प्रकृतीची कुरबूर, आर्थिक ओढाताण, दगदग, मनस्ताप असल्या अडचणी निर्माण होऊ शकतात. त्याच्याच प्रभावाने नोकरीत वरिष्ठ अधिकारी वर्ग नाराजीचा सूर काढताना दिसतील. याचाच फायदा विरोधक आणि आपले स्पर्धक घेण्याचा प्रयत्न करतील, मात्र त्यांचे मनसुबे लवकरच उधळले जातील. प्रलोभने व व्यसनांना बळी पडू नका. शनि-मंगळ षडाष्टकामुळे एखाद्या गाफील क्षणी आपली फसगत होण्याची संभावना आहे. त्यामुळे सावध राहा. शुभ दिनांक- ९,१०,११,१५.
– मिलिंद माधव ठेंगडी (ज्योतिषशास्त्री)/ ८६००१०५७४६