ब्लॅक ऍण्ड व्हाईट -‘रेन्बो’

0
71

एक सकस, दमदार, प्रत्ययकारी व समाजप्रबोधनात्मक नाट्याविष्कार…

प्रस्तावना
देश व समाज घडणीमध्ये त्यात वास्तव्य करणार्‍या माणसांची ‘एकोपा, प्रेम व मानसिकता’ महत्त्वाची भूमिका बजावत असते. परंतु वर्षानुवर्षे एकत्र राहूनही माणसे एकमेकांना ओळखू शकत नाहीत व जाणूनही घेऊ शकत नाहीत. कारण मानवी संबंधातील प्रत्येक नात्याची बांधणी वेगळी आहे. त्यातील देवाणघेवाण, आशाआकांक्षा व अपेक्षांचा बोजा असल्याने त्याचा एक ताण मानवी मनावर असतो. सध्या तर आपलं ‘प्रेम, भावना व नातेसंबंध’ संपूर्ण जगाला सांगायची अहमहमिका लागल्याने सगळेचजण सदान्‌कदा या ‘व्हर्चुअल रॅटरेस’मध्ये आपणच सर्वात ‘पसंदीदा, इनव्हायटेड व व्यस्त’ असल्याच्या आविर्भावात आपल्याच अत्यंत जवळच्या माणसांना टाळून जीवनातील त्यांच्यामार्फत मिळणार्‍या साध्या साध्या गोष्टीतील आनंदाचा अव्हेर करते आहे. याचमुळे मानवी संबंधात पेच, गुंतागुंत व पर्यायाने समस्याच निर्माण करीत आहेत. यातील ज्ञात-अज्ञात केवळ परमेश्‍वरच जाणो, परंतु एकुणात काय तर आपण कितीही सुखी व समाधानी असल्याच्या वल्गना केल्या तरीही कुठेतरी पाणी मुरत असतंच! वरकरणी खोटं खोटं वागतानाच मनातल्या मनात जखमीच असतो.
संकल्पक व विचारधारा…
डॉ. स्मिता माहूरकर, डॉक्टर, लेखक, दिग्दर्शक, अभिनेत्री, सूत्रसंचालक, परीक्षक व सौंदर्यसम्राज्ञी अशी सप्तरंगी (रेन्बो) व्यक्तिमत्त्व! ‘नाटक, निवेदन, कविता, कथा व स्तंभलेख’ अशी विपुल साहित्य संपदा, ‘नाटक, कवितावाचन, डॉक्युमेंट्री व सिनेमा’ माध्यमातून अभिनय. सलग तीन वर्षे कथा स्पर्धेत पारितोषिक प्राप्त, जवळपास १५० स्वरचित कवितांचं सादरीकरण, सलग आठ कवितांना ‘केंद्र शासनाची पुरस्कृता’ लाभली व ‘बेटी बचाओ’ ही कविता गाजली.
लहानपणापासून अनुभवलेल्या ‘स्त्री-पुरुष’ संबंधातील विविध छटा आपल्या मनावर बिंबवल्या जात असल्याने ‘पती-पत्नीच्या आयुष्याची सुरुवात गोंधळलेलीच असते. त्यामुळेच प्रेम, वात्सल्य, मैत्री, मातृत्व, पितृत्व, सामंजस्य या भावभावनांनी भरलेली विविधारंगी समृद्धता, मखमली दिवस ओसरले, की अलगद, नकळत ओसरायला लागते आणि उरतात फक्त गृहीतकं! एकीकडे पाच वर्षांनी निर्जीव भिंतींना रंगरंगोटी, फर्निचर व कपड्यांना रोल पॉलिश करतानाच दुसरीकडे जीवनावश्यक अशा या ‘इंद्रधनु नात्याला’ रंगवायचं विसरून जातो. कारण एकमेकांना ‘गृहीत धरण्याची खोड’ या नात्यावरील धूळ झटकायचं विसरायला कारणीभूत ठरते. मग निर्जीव वस्तूंना आवर्जून नवलाई देण्याच्या नादात या नात्याची ‘धूळ, झीज व कीड’ आपल्याला ‘दिसणं, जाणवणं व स्पर्शणं’ दुरापास्तच!
कथासंहिता व सादरीकरण
वरकरणी ‘सुखी’ भासणार्‍या प्रेमविवाहित पतीपत्नीच्या ‘कौटुंबिक व व्यक्तिगत’ आयुष्यातील एकतानता तपासतानाच समाजाचे प्रबोधन करण्याचा ‘लेखिका व सादरकर्त्या डॉ. स्मिता माहूरकर यांचा हा प्रामाणिक प्रयत्न होय. त्यांची लेखनातील सफाई चकित करतानाच आश्‍वासकही वाटते. हे खरं तर एक ‘मनोविश्‍लेषणात्मक चर्चानाट्य’ होय आणि याची हाताळणी अत्यंत कठीण असूनही डॉ. स्मिता माहूरकर व दिग्दर्शक समीर हेजीब यांची नाट्यतंत्रावरील हुकुमत असल्याने त्यांना हे धाडस पेलता आलं, असंच म्हणता येईल. त्यामुळे भविष्यातही त्यांच्याकडून चांगल्या संहितांची अपेक्षा बाळगायला हरकत नाही. घराघरातून घडणार्‍या रोजच्या, लहानसहान प्रसंगांना समुच्चय करून बेतलेलं कथानक व वाक्यरचना, अनाकलनीय घटना, शब्दप्रधान संवाद, पल्लेदार वाक्ये व समाजप्रबोधन वगैरे प्रकाराला पूर्णत: फाटा दिल्याने आपल्या रोजच्या जीवनातील प्रसंग घडत असल्याची अनुभूती प्रेक्षकांना मिळते आणि ते संहितेच्या कह्यात अलगदपणे ओढले जाऊन त्याचा एक भाग होऊन जातात. या नाटकाला तसं कथानकच नाही आहे आणि तशी गरजही भासत नाही. कारण यातील ‘कंटेंट, फॉर्म व भूमिका’ प्रेक्षकांना खूपच भावतात व आकर्षित करतात की प्रेक्षक अक्षरश: गदगदून जातात. हे नाटक कोणत्याही क्षणी ‘मेलोड्रामा’च्या वाटेवर जाईल असं वारंवार केवळ वाटतं पण दिग्दर्शकबरहुकूम ते खुबीने टाळलं गेलं आहे. या नाटकाची परिणामकारता त्याच्या विषयात वा कथानकात सामावलेली नसून प्रत्यक्ष साकारलेल्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये दडलेली नाट्यमयता, स्फोटकता त्याच्या अचूक वजनानिशी किती उत्स्फूर्तपणे व्यक्त होऊ शकते त्यात दडलेली आहे. यातील प्रसंगातून, पात्रांच्या परस्परांच्या संघर्षातून निर्माण होणारे ताणतणाव, त्यातून उडणार्‍या ठिणग्या, त्या ठिणग्यातून अवचित उजळणारे आयुष्याचे अंधारे कोपरे प्रेक्षकांना सतत अनुभूती देत रहाते. या नाटकाची संहिता जितकी नाट्यपूर्ण विणीची तितकाच अभिनयातून उभा राहणारा आविष्कार अस्सल आहे. शब्दांच्या आरोह-अवरोहांवर विशेष लक्ष केंद्रित केल्याने त्यांच्या आघातांवर विराम स्थानांवरचा परिणाम प्रभावकारी व प्रत्ययकारी झाला आहे. स्त्रीचं व्यक्तिमत्त्व, तिच्या समस्या प्रेक्षकांना सहजपणे समजतील-उमजतील अशाच पेश केल्याने व मुख्यत्वे शब्दोच्चार, आवाजातले चढउतार, शब्दांवर दिलेला जोर व शब्दफेक हेच संवाद माध्यम उपयोगात आणल्याने नाटकाचा ‘विषय, आशय व उद्देश’ प्रेक्षकांना प्रभावी व परिणामकारक ठरतो. किंबहुना त्याचमुळे उत्तम नाट्यनुभावाच्या प्रतीक्षेत राहणार्‍या प्रेक्षकांसाठी ही एक पर्वणीच होय. फिरता रंगमंच, सोपी व सोयीस्कर व आवश्यक साधनसामग्री, सहज देहबोली, सहजसुंदर अभिनय, मुव्हमेंट्‌स, प्रसंगांना पूरक हलकीशी बदलणारी वेशभूषा याने तीन ते चार पात्रांचा वावर रंगमंचावर जाणवतो हीच खरी अभिनयाची जादू होय. या नात्यातील अटळ अशा वळणावरून हलकेच जाताना यातील गुंतागुंत व स्त्रीपुरुष भावभावनांना जपण्याचा व दोघांनाही समसमान संधी व पैस देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या नाटकाच्या विषयात जरी बरीचशी इंटेन्सिटी असली तरीही दिग्दर्शकाने टोन डाऊन करत लोप्रोफाईलवर हे नाटक खेळवत ठेवलं आहे. थोडक्यात म्हणजे इंटरप्रिटेशनच वेगळं आहे. या लेखनाचं नुसतं जर वाचन केलं तर अनेक प्रसंगांना हास्याचे फवारेही उडतील. विनोदाच्या जागा चपखल असल्याने कदाचित ही कौटुंबिक जिव्हाळ्याची कॉमेडी किंवा नर्मविनोदी नाटकच भासेलही. परंतु, यातील टोकदार प्रसंगांना बोथट करून त्याची बांधणी बरीचशी लुजच ठेवली आहे ज्यामुळे यातील पात्र संहितेबरहुकूम बंदिस्त राहतात. त्यांच्यातील खरेपण उघड होत नाही. संहितेची दुखर्‍या बाजूची तीव्रता कमी करत त्यातला नाटकीपणा यशस्वीपणे व सहजाभिनयातून टाळला आहे. त्यांच्यातील प्रसंग नैसर्गिकपणे घडल्याने त्यांच्या भावना जशाच्या तशा प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात व लेखिकेला अपेक्षित नाट्य त्यातून घडत जातं.
समीर माहूरकर यांची नेपथ्याची साथ, समीर हेजीब यांचं पार्श्‍वसंगीत, नंदिनी माहूरकरचं तरल नृत्य दिग्दर्शन व कविता बाकरेंची साधी पण प्रत्ययकारी वेशभूषा नाट्याला पूरक ठरतात. हा अभिनव नाट्यानुभव प्रेक्षकांना सुरुवातीपासून आपल्या कह्यात घेऊन जवळपास पावणेदोन तास ‘ब्रेकफ्री’ खिळवून ठेवतो ही अविश्‍वसनीय व कौतुकाचीच बाब होय!
सारांश
खरं तर आपण स्वत:ला तरी ओळखतो का? आपल्या मनातील द्वंद्व, गुंतागुंत आपल्यालाच उमगलेली नसल्याने इतरांची काय अवस्था? मग हा गुंता सोडवायचा कसा? या नाटकाने हा गुंता सोडवलेला निश्‍चितच नाही, परंतु मोकळा केला आहे. आता ज्याने त्याने यातून काहीतरी शिकून आपापली समस्या सोडवायची आहे. हे नाटक जरी मूलत: व संपूर्णत: स्त्रियांच्याच समस्यावर आधारित असलं व एका स्त्रीनेच एनॅक्ट केलेलं असलं तरीही ‘स्त्री-पुरुष’ दोहोनांही एक चांगलाच धडा शिकवून जात असल्याने प्रत्येकाने एकदा तरी हा नाट्याविष्कार बघायलाच हवा! स्त्री-पुरुष व पतीपत्नी यांचं नातं केवळ एकमेकांवरील प्रेमावरच अवलंबून असतं. या नात्याला एका वेगळ्या ‘ढंगात, शैलीत व अतिशय संवेदनशील रीत्या’ हाताळल्याने लेखिकेचा उद्देश सफल झाला आहे, असे आवर्जून नमूद करावेच लागेल. या नात्यातील गुंतागुंत, खटके, दुरावा व पुनर्मिलन ही सगळी स्थित्यंतरं अतिशय ‘संयमित, तरलतेने व संयतपणे’ उघडी करत त्यावर पांघरूण घालताना ‘लेखक, दिग्दर्शक व अभिनेत्री’ यांनी चुकांना अजिबात थारा दिलेला नाही. शिवाय फक्त स्त्रीविषयक झालेल्या सुरुवातीला हलकेच पुरुषाच्या भावभावनांना मोकळीक दिल्याने नाटकाला आपोआप ‘बॅलन्स’ करण्याची किमयाही साधली गेली आहे त्यामुळे ते एककल्ली व एकीकडे कललेलं नाही, हे समाधानकारक होय!
संपूर्णतः मनोरंजनात्मक कथनातून ‘पतिपत्नीच्या’ घट्ट नात्याचं निखळ बोधामृत, प्रेक्षकांना आव्हानात्मक वाटणं हेच या कलाकृतीचे यश होय! आणि शेवटाला ‘डॉ. माहूरकरांच्या स्मित-हास्य सवालजवाबांसह प्रेक्षकांशी थेट संवाद साधून त्यांना तणावमुक्त करण्याची क्लृप्ती परिणामकारक असल्याची व पसंतीची पावती समस्त प्रेक्षकवर्गाने उत्स्फूर्तपणे समक्ष भेटून अगदी तसाच स्वानुभव व्यक्त केल्याचे आढळते. कदाचित आजच्या या आधुनिक तंत्रज्ञान व सोशल नेटवर्किंगच्या कह्यात गुरफटलेल्या समाजाला अशीच प्रबोधनात्मक कलाकृतीची गरज असावी, हे विशेषत्वाने नमूद करावेच लागेल!
•एनसी देशपांडे /९४०३४९९६५४