भारताचा जागरूक पहारेकरी

0
169

तिसरा डोळा
त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची विशेषतः ही की, ते जेवढ्या लवकर कुणाशी शत्रुत्व घेतात तेवढ्याच वेळात ते कुणाशी मैत्रीसुद्धा करू शकतात. त्यांच्या परिवाराबद्दल फारशी माहिती सार्वजनिक जीवनात कुणाला नसावी.
सत्तेत असले काय आणि नसले काय, ज्यांच्या काम करण्याच्या शैलीत कुठलाच फरक पडत नाही. विरोधकांना नामोहरम करण्याची ज्यांची परंपरा खंडित होत नाही, विरोधकांना ज्या वेळी वाटते की ही व्यक्ती संपली, त्या वेळी या व्यक्तीने नव्याने आकार घेतलेला असतो. एक अनुभवी शिक्षक, अर्थशास्त्रज्ञ, गणिततज्ज्ञ, परिपक्व राजकारणी, कायद्याचा एक जाणकार, प्राणिमात्रांवर प्रेम करणारा भूतदयावादी आणि आपल्या अमोघ वक्तृत्व शैलीने उपस्थितांवर मोहिनी घालणारे चतुरस्र व्यक्तिमत्त्व… अशा कितीतरी रूपात आपण त्यांना बघू शकतो. त्यांच्यात भारताचा अर्थमंत्री होण्याची, विदेश मंत्री होण्याची आणि कायदा मंत्री होण्याची क्षमता आहे, असे विरोधकसुद्धा मानतात. टु-जी घोटाळ्यापासून नॅशनल हेरॉल्डपर्यंतच्या खटल्यांमधून भल्याभल्यांना घाम फोडणारी ही तामिळी व्यक्ती कोण, याची एव्हाना अनेकांना कल्पना आली असावी. होय! तुमच्या मनातील जे नाव आहे ते सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्याशिवाय दुसरे असूच शकत नाही!
सुब्रह्मण्यम् स्वामी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत म्हणून ते धडाकेबाज निर्णय घेतात आणि परखड प्रतिक्रिया व्यक्त करतात असे नव्हे, त्यांची बंडखोर वृत्ती अगदी महाविद्यालयीन जीवनापासूनची. त्यांचे वडील सीताराम सुब्रह्मण्यम् एक नावाजलेले गणिततज्ज्ञ आणि तेव्हाच्या केंद्रीय सांख्यिकी इन्स्टिट्यूटचे संचालक होते. त्यांच्याप्रमाणेच स्वामींनादेखील गणिततज्ज्ञ व्हायचे होते. पण, त्यांनी हिंदू कॉलेजमध्ये गणिताची स्नातक पदवी घेतली (दिल्ली विद्यापीठातून ते तिसरे मेरिट होते) आणि पुढे कोलकाताच्या भारतीय सांख्यिकी इन्स्टिट्यूटमध्ये शिकायला गेले. त्या वेळी पीसी महालानोबीस हे त्या संस्थेचे संचालक होते. स्वामींच्या वडिलांचे ते प्रतिस्पर्धी होते. त्यामुळे त्यांनी स्वामींना परीक्षेत कमी ग्रेड देण्यास प्रारंभ केला. त्यावर उपाय म्हणून स्वामींनी एक संशोधन पत्र लिहून, महालानोबीस यांच्या सांख्यिकी गणना मौलिक नसून, जुन्या पद्धतीवर आधारित असल्याचा निष्कर्ष काढला. त्यांचा जन्म चेन्नईतील म्यालापोर येथे १७ सप्टेंबर १९३९ सालचा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो योजना आयोग गुंडाळला, त्याची परिकल्पना महालोनोबीस यांची होती आणि त्यांची पंडित नेहरूंशी घनिष्ठता होती. सुरुवातीपासून स्वामी हुशार आणि चुणचुणीत म्हणून ओळखले जात.
सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्या जीवनात अनेक चढाव-उतार आले. त्यातून ते राजकारण आणि पुढे कायद्याच्या अभ्यासाकडे वळले. टु-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याची सध्या सर्वत्र चर्चा असते. त्यामागे स्वामींचा सुपीक मेंदू कार्यरत होता. राजकीय सारिपाटावरून अनेक दिवस लुप्त झालेल्या स्वामींनी २००८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची भेट घेतली आणि मोबाईल स्पेक्ट्रम बॅण्डच्या अवैध आवंटनाबद्दल दूरसंचार मंत्री ए. राजा यांच्याविरुद्ध खटला चालवण्याची अनुमती मागितली. यातूनच पुढे राजा यांची बेकायदेशीर कामे उघडकीस आली. आज भारतीय भाविक कैलास मानसरोवराची यात्रा निर्विघ्नपणे करताना दिसतात. नुकताच चीनने त्यात अस्थिरतेचे कारण सांगून अडंगा आणला आहे. पण, ही यात्रा स्वामींच्या अथक प्रयत्नांमुळेच शक्य होऊ शकली. उभय देशांमध्ये या यात्रेबाबत झालेल्या कराराचे श्रेय त्यांच्याकडेच जाते. कैलास मानसरोवराच्या यात्रेसाठी त्यांनी १९८१ मध्ये अभियान आरंभ केले आणि त्यासाठी तेव्हाचे चीनचे सर्वोच्च नेते देंग जियाओपिंग यांची भेटदेखील घेतली होती.
स्वामींच्या बुद्धिमत्तेची चुणूक तारुण्यातच दिसू लागली होती. त्यांनी वयाच्या २४ व्या वर्षी हॉर्वर्ड विद्यापीठातील पीएच. डी.ची पदवी मिळविली आणि २७ व्या वर्षी त्याच विद्यापीठात ते गणित शिकवू लागले. १९६८ मध्ये अमर्त्य सेन यांनी त्यांना दिल्लीच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकविण्यासाठी आमंत्रित केले. १९६९ मध्ये त्यांनी आयआयटीमध्ये अर्थशास्त्राच्या अध्यापनास सुरुवात केली. ते नेहेमी महाविद्यालयाच्या वसतिगृहात जाऊन तेथील विद्याथ्यार्र्ंशी राजकारण आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर चर्चा करीत. पुढे त्यांनी आयआयटीच्या सेमिनार्समध्ये भारताच्या पंचवार्षिक योजनेबद्दलच प्रश्‍नचिन्ह उपस्थित करून बुद्धिवंतांचा रोष ओढवून घेतला. पंचवार्षिक योजना बंद केल्या, तर आपल्याला विदेशी निधीवर अवलंबून राहण्याची पाळी येणार नाही, असा युक्तिवाद ते करीत असत. पंचवार्षिक योजनेशिवायदेखील भारत १० टक्के विकासदर गाठू शकतो, असा त्यांचा दावा होता. त्यांच्या या युक्तिवादाची दखल तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनादेखील घ्यावी लागली. संसदेतील भाषणात स्वामींचे विचार वास्तविकता आणि व्यावहारिकतेशी मेळ खात नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून इंदिरा गांधींनी त्यांची सूचना दुर्लक्षित केली. इंदिरांच्या नाराजीमुळे त्यांना १९७२ मध्ये दिल्ली आयआयटी मधील नोकरीवर पाणी सोडावे लागले. त्याविरुद्ध त्यांनी न्यायालयात आवाज उठवला. १९९१ मध्ये स्वामी या खटल्यात विजयी झाले. निकाल आपल्या बाजूने लागताच ते एक दिवसासासाठी आयआयटीमध्ये रुजू झाले आणि दुसर्‍याच दिवशी आपला राजीनामा दिला. यावेळी आर्थिक स्थैर्यासाठी पत्नी व मुलीसह अमेरिकेत जाण्याचा निर्णय स्वामींनी घेतला, पण त्यांच्या भाग्यात त्या वेळी विधात्याने वेगळेच काहीतरी लिहून ठेवले होते. त्यांच्या राष्ट्रवादी विचारांनी प्रभावित होऊन जनसंघाचे नेते नानाजी देशमुख यांनी त्यांना १९७४ मध्ये राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली. १९४७ साली फाळणीनंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा संपूर्ण मानव समूहाला जो मनस्ताप सहन करावा लागला, त्यातून निघालेले आक्रंदन सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी अनुभवले आहे. त्यांच्या भाषणांमधूनही याचा वारंवार उल्लेख होत असतो. जेव्हा आणिबाणी (१९७५ ते ७७) लावण्यात आली त्या वेळी त्यांच्यातील साहसी वृत्ती दृग्गोचर झाली आणि देशातील लोक त्यांच्याकडे एक आयकॉन या स्वरूपात बघू लागले. सरकारने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढला होता, पण तो नाकारून १९ महिन्यांपर्यंत ते सरकारला चकमा देत राहिले. आणिबाणीत अमेरिकेतून भारतात परतणे, संसदेची सुरक्षाव्यवस्था भेदणे, १० ऑगस्ट १९७६ रोजी संसदेच्या अधिवेशनात भाग घेणे आणि त्यानंतर पुन्हा पलायन करून अमेरिकेत परतणे, ही त्यांची साहसी कृत्ये जनसामान्यांच्या हृदयावर कायमची कोरली गेली आहेत. १९७७ मध्ये जनता पार्टीची स्थापना झाली, त्या वेळी स्वामी संस्थापक सदस्यांपैकी एक होते. याच पक्षाने इंदिरा गांधींना सत्ताच्युत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९९० मध्ये त्यांनी जनता पार्टी हा स्वतःचा राजकीय पक्ष काढला आणि त्याचे अध्यक्ष झाले. तत्पूर्वी सर्वोदयी चळवळीत त्यांनी निष्ठापूर्वक काम केले. विरोधक त्यांच्या या पक्षावर टीका करून, त्यांची खिल्ली उडवीत असत- स्वामी अशा पक्षाचे सेनापती आहेत, ज्या पक्षाची स्वतःची सेनाच नाही! पण, ही टीका सहन करूनही स्वामींनी स्वतःची उंची वाढवत नेली. १९९० ते २०१३ पर्यंत त्यांनी जनता पार्टीचे नेतृत्व केले आणि नंतर त्यांचा पक्ष भारतीय जनता पार्टीत विलीन केला. १९९० च्या दशकात स्वामींची ब्लूप्रिंट पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासाठी मार्गदर्शक ठरली. चंद्रशेखर पंतप्रधानपदी असताना त्यांनादेखील वाणिज्य आणि कायदा मंत्री या नात्याने स्वामींनी आर्थिक सुधारणांच्या काही योजना दिल्या होत्या. सोनिया गांधींना वारंवार अडचणीत आणणार्‍या स्वामींनी, १९९९ मध्ये वाजपेयी सरकार पाडण्याचे प्रयत्न केले होते. त्यांनी जयललिता आणि सोनिया गांधींची अशोका हॉटेलमध्ये भेट घडवून आणली. पण, त्यांचे प्रयत्न असफल झाले आणि यानंतर त्यांचे गांधी परिवाराशी कायमचे फाटले. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचा संसदेतील अनुभव दांडगा आहे. त्यांचे सर्वच राजकीय पक्षांमध्ये प्रशंसक आहेत. घटनेतील ३७० कलम हटविले गेले पाहिजे ही, त्यांची भूमिका सारे जाणतात. तिहेरी तलाकविरुद्ध आवाज उठवून त्यांनी मुस्लिम महिलांची सहानुभूती मिळविली आहे. रिझव्हर्र् बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या कार्यशैलीवर टीका करून स्वामींनी खळबळ उडवून दिली होती. वादात अडकून राहणे, वाद निर्माण करणे आणि ओढवून घेणे, हे त्यांना जात्यात आवडते, हे त्यांच्या आजवरच्या कार्यशैलीवरून दिसून येते. त्यांनी रघुराम राजन यांच्यावर टीका तर केलीच, पण सरकारचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम् यांच्यावरही शरसंधान केल्याने, अखेर मोदींना हस्तेक्षप करावा लागला. ट्विटरवर सुब्रह्मण्यम् स्वामींचे २८ लाख फॉलोअर्स आहेत. प्रत्येक मुद्यावरील त्यांचे ट्विट लक्षणीय तर असतेच, पण दिशादर्शकही असते. त्यांच्या विशिष्ट शैलीतील लिखाणामुळे नेटिझन्स त्यांच्याकडे आकृष्ट होतात. त्यांनी राहुल गांधी, सोनिया गांधी, अरविंद केजरीवाल यांना दिलेल्या उपाध्या नंतर सोशल नेटवर्किंग साईटवरही खूप लोकप्रिय झाल्या.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची विशेषतः ही की, ते जेवढ्या लवकर कुणाशी शत्रुत्व घेतात तेवढ्याच वेळात ते कुणाशी मैत्रीसुद्धा करू शकतात. त्यांच्या परिवाराबद्दल फारशी माहिती सार्वजनिक जीवनात कुणाला नसावी.
हॉर्वर्डमध्ये शिक्षण घेत असतानाच त्यांची, रोक्सना या भारतीय पारसी तरुणीशी ओळख झाली. त्या वेळी रोक्सना गणितात पीएच. डी. करीत होती. नंतर उभयतांनी १९६६ मध्ये विवाह केला. आज ७७ वर्षांचे वय असलेल्या स्वामींना दोन मुली आहेत. मोठी गीतांजली ही व्यावसायिक असून, एमआयटीमध्ये प्राध्यापक असलेल्या डॉ. संजय शर्मा यांच्याशी तिचा विवाह झाला आहे. डॉ. शर्मा हे एका सनदी अधिकार्‍याचे चिरंजीव आहेत. दुसरी मुलगी सुहासिनी हैदर ही माध्यमजगतात कार्यरत असून, तिचे पती नदीम हैदर हे, माजी विदेश सचिव सलमान हैदर यांचे चिंरजीव आहेत. स्वामींनी योजना आयोगाचे सदस्य म्हणूनही कार्य केले आहे. चंद्रशेखर सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री होते. युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड ऍण्ड डेव्हलपमेंटतर्फे विकसित देशांमधील सहकार्याबद्दलचा जो अहवाल तयार केला जातो, तो तयार करण्यासाठी स्वामींना जिनेव्हा आणि स्वित्झरर्लंड येथे निमंत्रित केले जाई. स्वामींनी जयललिता यांच्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल केला, ज्यामुळे त्यांना बराच मनस्ताप सहन करावा लागला. स्वामींनी ईव्हीएम मशीनमध्ये होणार्‍या गोंधळाबद्दलही आवाज उठविला होता आणि मतदारांना मतदानानंतर त्यांनी केलेल्या मतदानाची मुद्रित स्लिप मिळावी, अशी मागणी केली होती. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हा मुद्दा येत्या काळात मार्गी लागलेला दिसू शकेल. अयोध्या प्रकरण, नॅशनल हेरॉल्ड प्रकरण, नटराज मंदिर प्रकरण, काळ्या पैशांविरुद्ध मोहीम… या सार्‍या मुद्यांवर त्यांची स्वतःची मते आहेत आणि ती त्यांनी वगवेगळ्या व्यासपीठावर परखडपणे मांडलीदेखील आहेत. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान व्हावे म्हणून त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यासाठी झोकून प्रचारदेखील केला. हिंदू संस्कृती, हिंदू संघटना आणि हिंदुत्वाबद्दलची त्यांची मते जगजाहीर आहेत. त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वामुळे ते सत्तेत असो वा नसो, नेहमी माध्यमांमध्ये जागा मिळवून जातात. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्या रूपात आपल्या देशाला समाजाचा, देशाचा, या देशाच्या संस्कृतीचे रक्षण करणारा एक जागरूक पहारेकरी मिळाला आहे, असे म्हटले तर वागवे ठरणार नाही!
– चारुदत्त कहू/ ९९२२९४६७७४