चीनची दादागिरी व सरदार पटेलांची दूरदृष्टी

0
141

अनेक शतकांनंतर आता आपल्याला दोन आघाड्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. साम्यवादी चीन अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे. नेपाळ, भूतान, सिक्किम, दार्जिलिंग आणि आसाम या भागांतून येणारे मार्ग सुरक्षित नाहीत. १९५६ पासून या भागांतून घुसखोरीला सुरुवात होऊन हा संपूर्ण टापू आपल्यासाठी धोकादायक झाला आहे. पटेलांनी दिलेल्या इशार्‍याकडे वेळीच जर लक्ष दिले असते, तर आज जशा देशाच्या सीमा असुरक्षित झाल्या आहेत, तशा झाल्या नसत्या.
सिक्किमच्या डोंगलांग भागात चिनी सैन्याने घुसखोरी करून उलट भारताच्या नावाने आदळआपट करत हडेलहप्पीपणाचे जुने अस्त्र पुन्हा उपसले आहे. भारताने इतिहासापासून शिकावे, असा अनाहूत सल्ला देण्याचा अगोचरपणा चीनने यावेळेस केला आहे. १९६२ मध्ये भारताला चीनकडून स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाची आठवण करून देत डोंगलांग भागात निर्माण झालेल्या पेच-प्रसंगात उलट भारतानेच माघार घ्यावी, अशी आडमुठ्‌ठी भूमिका चीनने घेतली आहे. १९६२ चा भारत आज नाही, हे मान्य करायला चीन तयार नाही हे दिसते. भारत, भूतान व चीन यांच्या सीमारेषा ज्या ठिकाणी एकत्र येतात, तेथे चीनने सुरू केलेल्या रस्ते बांधणीला भारताने आक्षेप घेतला होता. त्यामुळे चिडून चीनने ही ताठर भूमिका घेतली आहे. यावर्षी तर चीनने नाथुला खिण्डीत मान सरोवरला जाणार्‍या यात्रेकरूंना अटकाव करून परिसीमा गाठली आहे. या आधीही एप्रिल २०१३ मध्ये लडाखमधील दौलतबेग ओल्डी या आपल्या ठाण्याबाबत हरकत घेत चीनने तणाव निर्माण केला होता. सप्टेंबर २०१४ मध्ये चिनी अध्यक्ष शी जिन पिंग भारताच्या भेटीवर असताना चिनी सैनिकांनी चुमार क्षेत्रात घुसखोरी करत तणावपूर्ण स्थिती निर्माण केली होती. अशा कृत्याला वरिष्ठ पातळीवरून स्वीकृती असल्याशिवाय हे घडणे संभवत नाही.
१९६२ च्या चीन-युद्धाच्या अगोदर तणावपूर्ण संबंधांच्या पाश्‍वर्र्भूमीवर दि. १३ व १४ ऑगस्ट १९६२ या दिवशी लोकसभेत या परिस्थितीवर चर्चा घडवून आणण्यात आली. चीनद्वारे अमैत्रीपूर्ण व्यवहाराची, कम्युनिस्ट पक्ष वगळता सर्व पक्षांनी निंदा केली होती. कम्युनिस्ट नेते हिरेन मुखर्जी यांनीच चीनला ‘अमैत्रीपूर्ण देश’ म्हणून घोषित करण्यास विरोध केला. भारतीय कम्युनिस्टांच्या या भूमिकेत आजही बदल झाल्याचे आढळत नाही. (२००२ साली राश्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत डाव्यांनी थोर शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना विरोध केला होता. भारताला सामर्थ्यवान करण्यात जे घटक कारणीभूत ठरतात, त्यांना विरोध करायचा हीच कम्युनिस्टांची नीती राहिली आहे. ) ७ ऑक्टोबर १९५० ला चिनी सैन्याच्या तिबेटमधील प्रवेशामुळे भारत आणि चीनमधील बफर अचानक अन्तर्धान पावले. त्याचे दूरगामी दुष्परिणाम भारताच्या सुरक्षेवर होणार होते. यामुळे भारतीय उपखण्डातील सामरिक संतुलनात लक्षणीय बदल होणार होता. प्रा. एन. जी. रंगा यांनी संसदेत खडा सवाल केला- ‘माननीय पंतप्रधान आपल्या सुरक्षिततेवर येणार्‍या काळ्या गडद ढगांकडे दुर्लक्ष तर करत नाहीत ना?’ डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भविष्य वर्तविले की ‘भारताला एक दिवस तिबेटी भूमीवर चीनशी युद्ध करावे लागेल.’ असे काही तुरळक आवाज सोडल्यास अन्य कोणाला यात लक्ष घालण्यात रूची नव्हती. भारताचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल यांनी वामपंथीयांच्या देशांतर्गत व देशाबाहेरील धोरणांबाबत सरकारला सचेत केले होते. पं. नेहरूंनी मात्र सरदार पटेलांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्याने आपण चीनची कायमस्वरूपी डोकेदुखी ओढवून घेतली आहे. चीनच्या विस्तावादी व अडेलतट्टू भूमिकेच्या अनुशंगाने सरदार पटेलांचे १९५० साली काय आकलन होते, यावर प्रकाश टाकणे उपयुक्त ठरेल.
गृहमंत्री पटेल यांनी ७ नोव्हेंबर १९५० रोजी पंतप्रधान पं. नेहरू यांना चीनच्या आव्हानांविषयी आणि भावी अपेक्षित धोरणाविशयी मुद्देसूद व सविस्तर पत्र लिहिले होते. त्याआधी नुकतीच चीनबाबत नेहरूंनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. सरदार पटेल त्याच दिवशी अहमदाबादहून परतले होते. केवळ १५ मिनिटांची पूर्वसूचना मिळाल्याने ते बैठकीची कागदपत्रे सखोलपणे वाचू षकले नव्हते. बैठकीनंतर मात्र त्यांनी तातडीने सर्व संबंधित संदर्भाचा अभ्यास करून परराष्ट्र खाते पं. नेहरू हाताळत असल्याने स्वत:ची मते नेहरूंना कळविली.
हे पत्र मार्मिक मुत्सद्देगिरीचे द्योतकच नव्हे तर त्या लोहपुरुषाच्या कालभेदी दूरदृष्टीचे अति उच्च उदाहरण होते. सरदार पटेलांनी अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांना स्पर्श करत देशासाठी पथदर्शकाची भूमिका वठवली होती. त्यांच्या या बहुमूल्य आकलनाकडे दुर्लक्ष झाल्याने आपण अनास्था ओढवून घेतली. सरदार पटेलांनी विशद केलेले मुद्दे याप्रमाणे आहेत-
१) चीनने आपल्या तथाकथित शांततामय उद्देशांबद्दल भारताची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. माझे असे मत आहे की, आपल्या राजदूतांच्या मनात खोटा विश्‍वास पेरण्यात चीन यशस्वी झाला आहे. (हा संदर्भ राजदूत पणिक्कर यांनी नेहरूंना लिहिलेल्या पत्राबाबत होता. )
२) चिन्यांची ही कारवाई म्हणजे तिबेटी जनतेचा विश्‍वास घात आहे. दुर्दैवाने तिबेटी जनतेने आपल्यावर विश्‍वास ठेवला, आपल्या मार्गदर्शनाचा स्वीकार केला, पण आपण त्यांना चिन्यांच्या कचाट्यातून सोडवू शकलो नाही.
३) तिबेटमध्ये ऍग्लो-अमेरिकन कारस्थानांपासून चीनला धोका आहे, यावर कुणी विष्वास ठेवेल हेच मुळी कल्पनातीत आहे. त्यामुळे जर चिन्यांचा खरोखर यावर विश्‍वास बसला असेल, तर भारत हा इंग्लंड-अमेरिकेचा हस्तक आहे, असा त्यांचा ग्रह झाला असावा. ( नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेला भेट देत त्या देशाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असता चीनचे पित्त खवळले. सरदार पटेलांना याचा अंदाज ६७ वर्षांपूर्वीच आला होता. यातून त्यांचे द्रष्टेपण दिसून येते. ) त्यामुळे आपण त्यांच्यापुढे मैत्रीचा हात केला तरी ते आपल्याकडे संशयाने पाहतील, याची दखल घेणे आवश्यक आहे. आज नेमके तेच घडत आहे.
४) साम्यवादी चीनच्या संयुक्त राष्ट्र संघातील प्रवेषाचे सर्वशक्तीने समर्थन करणारे आपण एकच राष्ट्र आहो. त्यांनी मात्र आपल्यावर साम्राज्यवाद्यांचे हितचिंतक असल्याचा आरोप केला आहे. यावरून स्पश्ट दिसते की मैत्रीची भाषा करणारा चीन हा छुपा षत्रू आहे. (भारताच्या संयुक्त राष्ट्र संघातील सुरक्षापरिषदेच्या स्थायी सदस्यत्वाला चीनने विरोध केला आहे. त्याचप्रमाणे अझर मसूद व हाफिज सईद यांच्यावर बंदी घालण्याच्या प्रस्तावाला विरोध करून आपल्या चांगुलपणाची व उदार धोरणाची अशा प्रकारे विपरीत परतफेड केली आहे. )
५) १९१४ मध्ये आपला तिबेटशी करार झाला होता. परंतु लवकरच ते सर्व जुन्या करारांबाबत कानावर हात ठेवतील. साम्यवादी आणि साम्राज्यवादी एकाच माळेचे मणी आहेत. साम्यवाद्यांचा आदर्शवाद हा साम्राज्यवाद्यांच्या विस्तारवादापेक्षा दहा पटीनेे धोकादायक आहे. त्यांचे हे परखड मत किती दूरगामी होते, याची प्रचिती देशाला गेल्या सत्तर वर्षांत आली आहे.
६) आपल्या पश्‍चिम आणि वायव्य सीमेच्या धोक्याबरोबर आता आपल्याला ईशान्येकडून असलेल्या धोक्याचाही विचार केला पाहिजे. अनेक शतकांनंतर आता आपल्याला दोन आघाड्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. साम्यवादी चीन अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे. नेपाळ, भूतान, सिक्किम, दार्जिलिंग आणि आसाम या भागांतून येणारे मार्ग सुरक्षित नाहीत. १९५६ पासून या भागातून घुसखोरीला सुरुवात होऊनहा संपूर्ण टापू आपल्यासाठी धोकादायक झाला आहे. पटेलांनी दिलेल्या इशार्‍याकडे वेळीच जर लक्ष दिले असते तर देशाच्या सीमा आज जशा असुरक्षित झाल्या आहेत तशा झाल्या नसत्या.
७) भारतातील राष्ट्रविरोधी साम्यवादी शक्तींच्या सहायाने गुप्तहेर, पंचस्तंभी आणि विध्वंसक तत्त्वांना चेतना मिळेल. साम्यवादी उपसर्ग केवळ तेलंगण/वारंगळपर्यंत मर्यादित न राहता ही चळवळ उत्तर आणि ईशान्य भारतात पसरून त्यांना चीनमधून शस्त्रे दारूगोळा याची मदत मिळू लागेल.(संदर्भ- न सांगण्याजोगी गोष्ट, ले.- निवृत्त मे.जन. शशिकांत पित्रे ) गेल्या दोन वर्षांपासून डाव्या शक्तींकडून जे.एन.यू. तसेच अन्य ठिकाणी उघडपणे देशविघातक व विखारी भूमिका घेण्यात आली. त्यातून सरदार पटेलांचे निदान किती अचूक व योग्य होते हेच दिसून येते. सरदार पटेलांचे हे मर्मभेदक विश्‍लेशण जितके दूरगामी होते, तितकेच व्यावहारिक आणि तर्कशुद्ध होते. त्याला आदर्शवादाचा किंवा कोणत्याही भोळसट भोंदुगिरीचा स्पर्श नव्हता.
भारताशी सर्वंकश युद्ध करण्यात चीनला स्वारस्य असेल असे वाटत नाही. चीनला तसे करण्याची गरजही नाही. परंतु पाकिस्तानला सक्रिय मदत करत भारताला घेरण्याची नीती चीन भविष्यातही कायम राखेल, हे निश्‍चित. आपल्याला मात्र सर्वसमावेशक विकास करत चीनच्या कोणत्याही आवाहनाला तोंड देण्याची क्षमता बाळगावी लागेल.
सतीश भा. मराठे
९४२२४७७६६८