काश्मीरचे वास्तव

0
169

काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे, असे आपण सगळे नेहमीच म्हणत असतो. पण, या अंगाला ज्या जखमा झाल्या आहेत, या अंगाच्या मनात ज्या वेदना आहेत, या अंगाला अर्धांगवायूचा जो झटका आला आहे, त्यावर तातडीने उपचार करण्याची गरज आहे. या पृथ्वीवरील नंदनवन म्हणून ज्या काश्मीरची ओळख आहे, त्या काश्मीरचा दहशतवादाने कसा नरक झाला आहे, हे लक्षात घेऊन काश्मिरी लोकांच्या जखमांवर मलम लावण्याची नितान्त आवश्यकता आहे…

जम्मू आणि काश्मीर. उत्तर भारतातलं एक प्रमुख राज्य. हिमालयाच्या कुशीत दडलेलं अन् निसर्गसौंदर्य लाभलेलं पृथ्वीवरचं नंदनवन. जे ऍण्ड के म्हणूनही ते ओळखलं जातं. दक्षिणेकडे ते हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या सीमांना लागून आहे, तर उत्तर आणि पूर्वेकडे या राज्याची आंतरराष्ट्रीय सीमा चीनला लागून आहे. पाकव्याप्त म्हणजेच गुलाम काश्मीरला लागून जी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहे (पश्‍चिमेकडे), ती आणि गिलगिट-बाल्टीस्तान (आग्नेयेकडे) हे प्रदेश जम्मू-काश्मीरला पाकिस्तानपासून वेगळे करतात. भारतीय राज्यघटनेने जम्मू-काश्मीरला ३७० व्या कलमान्वये विशेष दर्जा दिला आहे. देशातील हे एकमेव असे राज्य आहे, जिथे विधानसभेची मुदत सहा वर्षे आहे आणि या राज्याचा स्वत:चा वेगळा झेंडाही आहे. जम्मू, काश्मीर खोरे आणि लेह-लद्दाख अशा तीन विभागात हे राज्य विभागले आहे. तीन विभाग मिळून या राज्यात एकूण २२ जिल्हे आहेत. देशातील हे एकमेव असे राज्य आहे, ज्याला दोन राजधान्या आहेत. श्रीनगर ही उन्हाळी राजधानी तर जम्मू ही हिवाळी.
पुण्याची ‘सरहद’ ही काश्मिरी मुलांच्या हितासाठी काम करणारी सामाजिक संस्था आणि जम्मू-काश्मीरचे सरकार यांच्या निमंत्रणावरून महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमधील २५ संपादक-पत्रकारांनी नुकताच काश्मीर खोर्‍याचा अभ्यास दौरा केला. त्यात माझाही समावेश होता. त्या दौर्‍यात मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, पीडीपीचे उपाध्यक्ष सरताज मदनी, ग्रेटर काश्मीर या इंग्रजी दैनिकाचे मालक-संपादक, हॉटेल मालक असोसिएशन, टूर्स आणि ट्रॅव्हल्स असोसिएशन, हाऊस बोट आणि शिकारा मालक संघटनेचे पदाधिकारी, राज्याचे पोलिस, आमच्या लष्कराचे जवान, छोटेमोठे दुकानदार व व्यापारी, सामान्य काश्मिरी नागरिक अशा अनेकांशी जेव्हा मुक्त संवाद झाला, तेव्हा त्यातून ज्या बाबी समोर आल्या, त्या निश्‍चितपणे अंतर्मुख व्हायला लावणार्‍या आहेत.
आम्ही श्रीनगरच्या विमानतळावर उतरल्यापासूनच तिथे असलेल्या सुरक्षाव्यवस्थेचा अंदाज आला. डोक्यावर वजनदार हेल्मेट, छातीवर बुलेटप्रूफ जॅकेट, हातात एके-४७ रायफल, कमरेला जिवंत काडतुसे असलेले मॅगझिन्स, पायाला दगड लागू नयेत म्हणून पॅडस असे शस्त्रसज्ज जवान अगदी दहा-दहा फुटांच्या अंतरावर डोळ्यांत तेल घालून पहारा देताना दिसले. कोणी रस्त्याच्या कडेला, कोणी एखाद्या इमारतीच्या छतावर, कोणी बुलेटप्रूफ वाहनावर, असे शस्त्रसज्ज जवान पाहून प्रारंभी मनात धडकीच भरली. विमानतळापासून दिसू लागलेले दृश्य कमीअधिक फरकाने संपूर्ण खोर्‍यात पाहायला मिळाले अन् एकूणच परिस्थितीचा अंदाज आला. काश्मीरमध्ये कधीही न जाता ज्या गोष्टी कानावर आल्या होत्या, ज्या बाबी टीव्हीच्या छोट्या पडद्यावर पाहिल्या होत्या आणि वर्तमानपत्रांमधून वाचल्या होत्या, त्यामुळे काश्मीरला जाताना मनात प्रचंड दहशत होती. तिथे गेल्यानंतरही पहिल्या दिवशी ती कायम होती. पण, आमचा अभ्यास दौरा सुरू झाला आणि मनातली दहशत कमी होत गेली. आपण काश्मीरला चाललो तर आहोत, सुरक्षित परतू का, हा जो प्रश्‍न दौर्‍यापूर्वी मनात उपस्थित झाला होता, तो दुसर्‍या दिवशी दूर झाला. आपण जर टीव्हीवरील बातम्या पाहिल्या नाहीत आणि वर्तमानपत्र वाचले नाही, तर आपण काश्मिरात आहोत, याचा विसरच पडतो. श्रीनगरला आम्ही ज्या हॉटेलात मुक्कामी होतो, तिथून तीन किलोमीटर अंतरावर सीआरपीएफच्या तुकडीवर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. पण, टीव्ही ऑन करेपर्यंत आम्हाला त्याचा थांगपत्ताही लागला नव्हता. रमझानचा महिना सुरू होता, रोझे ठेवले जात होते. त्यातच मशिदीतून नमाज पढून बाहेर पडणार्‍यांनी अयुब नावाच्या डीएसपीची हत्या केल्याची घटना घडली. पण, त्या घटनेची गंधवार्ताही आम्हाला श्रीनगरमधल्या श्रीनगरमध्ये नव्हती. विशिष्ट भागात विशिष्ट लोकांच्या बाबतीत अशा घटना घडतात, त्याचा सामान्यांशी काही संबंध नसतो, याची जाणीव आम्हाला त्याच वेळी झाली.
काश्मीरमध्ये जवानांवर दगड फेकले जातात, पाकिस्तानातून आलेले अतिरेकी गोळीबार करतात, पाकच्या चिथावणीवरून हिजबुल मुजाहिदीन आणि लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनांमध्ये भरती झालेले काश्मिरी तरुण अतिरेकी गोळ्या झाडतात, केव्हा अस्थिरता निर्माण होईल याचा काही नेम नसतो… हे सगळे खरे असले, तरी पर्यटनासाठी येणार्‍या नागरिकांच्या केसालाही तिथे धक्का लागत नाही, आजवर तशी एकही घटना घडली नाही, असे तिथल्या अनेकांनी आम्हाला सांगितले अन् त्याचा अनुभव आम्हीही घेऊन आलो. पृथ्वीवरचे हे नंदनवन पर्यटकांसाठी अतिशय सुरक्षित असल्याची जी ग्वाही तिथल्या लोकांनी आम्हाला दिली त्याची प्रचीती आम्हालाही अनुभवाने आली. आम्ही काश्मीरमध्ये असताना जे काही पर्यटक आम्हाला दिसले, त्यात बहुतांश महाराष्ट्र आणि गुजरातमधून आलेले होते. पर्यटक अडचणीत सापडल्यास त्यांच्या मदतीला धावून जाण्याची, प्रसंगी आपल्या घरी त्यांना सुरक्षित ठेवण्याची सामान्य काश्मिरी माणसाची प्रवृत्ती आढळून आली. पर्यटकाला ते देव मानतात. काश्मीरची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे, असा आपला समज आहे. परंतु, तिथल्या अर्थव्यवस्थेत पर्यटन क्षेत्राचा वाटा केवळ पाच टक्केच असल्याचे तिथल्या जाणकारांनी सांगितले अन् आश्‍चर्य वाटले. श्रीनगर, पहलगाम, सोनमर्ग, गुलमर्ग अन् कारगिल ही तिथली महत्त्वाची पर्यटनस्थळे आहेत. दगडफेक आणि हिंसाचाराच्या घटनांमुळे या सगळ्या पर्यटनस्थळी यंदाच्या हंगामात केवळ दहाच टक्के पर्यटक आले. याचाच अर्थ ९० टक्के पर्यटक कमी आले. त्यामुळे या सगळ्या ठिकाणचे लोक अतिशय चिंतेत होते. पर्यटकांनी मोठ्या संख्येत यावे, त्यांनी पर्यटनाचा आनंद लुटावा, त्यांच्या खाण्यापिण्याची आणि सुरक्षेची काळजी आम्ही घेऊ, असे तिथले हॉटेल व्यावसायिक, दुकानदार आणि अन्य मंडळी विनम्रपणे सांगत होती.
अमरनाथ यात्रेचा उल्लेख प्रत्येकाने केला. दरवर्षी अमरनाथ यात्रा भरते, लाखो भाविक अमरनाथला येतात. त्यांच्यापैकी एकालाही कधी काश्मिरी माणसाने त्रास दिला नाही आणि अतिरेक्यांच्या हल्ल्यात यात्रेकरू बळी पडला नाही, असा त्यांचा दावा आहे. यंदाची अमरनाथ यात्रा सुरू झाली आहे. सात-आठ तुकड्यांनी बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेतले आहे. अर्थात, आमच्या मदतीशिवाय हे शक्य नाही आणि मदत करताना आम्ही मागेपुढे बघत नाही, यात्रेकरू हिंदू आहेत, याचाही विचार करत नाही. यंदा चार लाख काश्मिरी मुस्लिम अमरनाथ यात्रेकरूंना आपल्या खांद्यावर घेऊन गुहेपर्यंत नेण्यास सज्ज असल्याचेही आम्हाला सांगण्यात आले. एका अर्थाने शिवलिंगाच्या दर्शनाचे पुण्य आम्हालाच मिळते, असे ते मानतात. अमरनाथ यात्रेवर दहशतीचे सावट आहे, अतिरेक्यांकडून हल्ला करविला जाऊ शकतो, अशी भीती पसरवली जात असली, तरी ही यात्रा सुरक्षित पार पाडण्याची जबाबदारी आमची आहे, असे पहलगाम आणि कारगिलचे काश्मिरी बांधव सांगतात.
श्रीनगरमधील लाल चौकाबाबत बरेच काही ऐकून होतो. हा चौक दहशतग्रस्त आहे, एवढेच माहिती आम्हाला ऐकून आणि वाचून होती. स्वातंत्र्यपूर्वकाळात क्रांतीचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या या चौकाबाबत मनात दहशतही होती आणि त्या चौकात जाण्याची उत्सुकताही. त्याच उत्सुकतेतून आम्ही दौर्‍याच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी लाल चौकात गेलो. चौकात शस्त्रसज्ज जवानांचा कडेकोट बंदोबस्त होता. या चौकात वारंवार दगडफेकही होत असते. काश्मिरी तरुण येतात, जवानांवर दगड फेकतात अन् निघून जातात. पण, आम्ही गेलो त्या वेळी शांतता होती. चौकाच्या संपूर्ण परिसरात मोठे मार्केट आहे. या मार्केटमध्ये प्रचंड वर्दळ होती. लोकांकडून सामानाची खरेदी सुरू होती. आम्ही अर्धा तास त्या ठिकाणी उभे होतो. परंतु, आम्हाला कसलीही भीती वाटली नाही. आम्ही मनसोक्त फोटोग्राफी केली. सुरक्षा जवानांशी चर्चा केली. तिथल्या सामान्य माणसांशीही बोललो. सुरक्षा जवानांची व्यथा ही होती की हाती बंदूक आहे, त्यात काडतुसे आहेत, पण दगडफेक्यांवर गोळी चालविता येत नाही; तर काश्मिरी नागरिकांची व्यथा ही होती की, आमचा कोणीच वाली नाही. आमच्या व्यथा जाणून घेत आम्हाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात नाही. जवानांची व्यथा तर शंभर टक्के खरी आहे. नागरिकांची व्यथा खरी जरी असली, तरी त्यासाठी जबाबदार नेमके कोण, हे त्या एका दौर्‍याच्या आधारे ठरविता येणार नाही. या लाल चौकाजवळच एके ठिकाणी हनुमानाचे मंदिर आहे, त्याला लागूनच मशीद आणि मशिदीला लागून गुरुद्वाराही आहे. हिंदूंच्या हनुमान मंदिराला कधी बाधा पोचवली जात नाही, हे मात्र शंभर टक्के खरे!
काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे, असे आपण सगळे नेहमीच म्हणत असतो. पण, या अंगाला ज्या जखमा झाल्या आहेत, या अंगाच्या मनात ज्या वेदना आहेत, या अंगाला अर्धांगवायूचा जो झटका आला आहे, त्यावर तातडीने उपचार करण्याची गरज आहे. या पृथ्वीवरील नंदनवन म्हणून ज्या काश्मीरची ओळख आहे, त्या काश्मीरचा दहशतवादाने कसा नरक झाला आहे, हे लक्षात घेऊन काश्मिरी लोकांच्या जखमांवर मलम लावण्याची नितान्त आवश्यकता आहे. जगभरातले लोक ज्या स्वित्झर्लंडला जातात अन् तिथे नंदनवनात गेल्याचा आनंद लुटतात, त्या स्वित्झर्लंडपेक्षाही सुंदर आमचे काश्मीर आहे, असा दावा आपल्या काश्मिरी बांधवांनी केला आहे. अशा या नंदनवनात गेल्या तीन दशकांपासून दहशत, भीती, अशांतता, परस्परअविश्‍वासाचे जे वातावरण निर्माण झाले आहे, ते दूर करण्याचीही नितान्त गरज आहे. काश्मिरी लोकांच्या मनात परकेपणाची भावना निर्माण झाल्याचेही अनुभवास आले. आम्ही परके नाहीत, आम्ही भारतीय आहोत, आमचा स्वीकार करा, आम्हाला सन्मानपूर्वक वागवा, आमच्याशी बोला, अशी विनवणी अनेक लोकांनी केली.
काश्मिरात गेल्या दोन-तीन वर्षांत दगडफेक करण्याचा नवाच प्रकार अस्तित्वात आला आहे. पाकिस्तानकडून, फुटीरतावाद्यांकडून चिथावणी आणि पैसे मिळताच, खोर्‍यात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या लष्कराच्या शूर जवानांवर ठरवून दगडफेक केली जाते. २० मिनिटे ते अर्धा तास ही दगडफेक चालते अन् थांबते. त्याचप्रमाणे लष्कर आणि जम्मू-काश्मीरचे पोलिस जेव्हा अतिरेक्यांविरुद्ध कारवाई सुरू करतात, तेव्हा दगडफेक करणारे तरुण अतिरेक्यांसाठी ढाल म्हणून पुढे येतात. आता या काश्मिरी तरुणांवर लाठ्याही चालवायच्या नाहीत, गोळ्या तर अजीबात झाडायच्या नाहीत, पण अतिरेक्यांना पकडण्यासाठी दगडफेक करणार्‍या तरुणांना बाजूला तर करायचे आहे, मग नेमकी ऍक्शन काय घ्यायची, असा प्रश्‍न सुरक्षा दलापुढे असतो.
आम्हाला शांतता हवी आहे, आम्हाला जगण्याचा आनंद घ्यायचा आहे, आम्हाला दहशतवाद आणि हिंसाचारापासून मुक्तता हवी आहे, आम्हाला भाईचारा हवा आहे, आम्हाला राजकारणात अन् एकमेकांवर कुरघोड्या करण्यात रुची नाही, असे आम्हाला भेटलेला प्रत्येक काश्मिरी माणूस अतिशय पोटतिडकीने सांगत होता. काश्मीरमध्ये कुठलाही मोठा उद्योग नाही. जो आहे तो म्हणजे पर्यटन उद्योग. पण, या पर्यटन उद्योगावर सध्या अवकळा पसरली आहे. तीन दशकांपासून सुरू असलेल्या हिंसाचारामुळे पर्यटक या ठिकाणी यायला घाबरतात. काश्मिरात एखादी जरी घटना घडली, तरी दिवसभर इलेक्ट्रॉनिक मीडियावर तेच दाखविले जाते, त्यामुळे देशातील जनतेच्या मनावर त्याचा विपरीत परिणाम होतो अन् मग पर्यटक काश्मिरात येण्यास घाबरतात. त्यामुळे मीडियाने अतिरंजित वृत्त दाखवू नये, अशी कळकळीची विनंती करायलाही पर्यटनाशी संबंधित मंडळी विसरली नाहीत. पर्यटन उद्योगाशी संबंधित सगळ्यांनीच एका सुरात इलेक्ट्रॉनिक मीडियाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. घडणार्‍या घटनांच्या बाबतीत इलेक्ट्रॉनिक मीडियाकडून राईचा पर्वत केला जातो, घटना रंगवून वारंवार दाखविली जाते, अनेकदा तर दगडफेकीची जुनीच घटना दाखविली जाते, असा आरोप या मंडळींनी केला. याच्यावर कुठेतरी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
– गजानन निमदेव