नेते आणि संपत्ती…

0
64

प्रासंगिक
‘नेते आणि संपत्ती’ हा विषय ‘आचार्य’ पदवीप्राप्तीसाठी संशोधनाचा नक्कीच होऊ शकतो, असे माझे ठाम मत झालेले आहे. बिहार राज्याच्या माजी मुख्यमंत्र्याच्या आणि माजी केंद्रीय मंत्र्याच्या आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या संपत्तीबाबतीत जे जे आणि जेवढे काही समोर येत आहे, त्यावरून माझ्या या मताला बहुतेकांचा नक्कीच पाठिंबा मिळेल, याची मला खात्री आहे!
गाई-म्हशींच्या दुधावर उदरनिर्वाह करणारं, हाता-पायाच्या बोटांमिळून संख्या असणारं आणि गावगोठ्यात वस्ती करून राहिलेलं कुटुंब काही दशकात नवकोट नारायणाच्या रांगेत जाऊन बसते आणि तेसुद्धा दूध-दुभत्याच्या भरोशावर नव्हे, तर त्या गाई-म्हशींच्या खाद्यांन्नाच्या भरोशावर, यावर माझ्यासारख्या सामान्य बुद्धीच्या आणि आयुष्यभर खर्डेघाशी करीत निवृत्तीनंतर लाखाच्या जवळपास पोहचलेल्या संपत्तीने हुरळून जाणार्‍या पामराच्या भुवया उंचावणारं ठरतं. या त्यांच्या संपत्तीची यादी जसजशी समोर यावयास लागली तेव्हापासूनच हे सारे त्यांना कसे काय साध्य झालं, याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झालेली आहे.
सरस्वतीसोबत लक्ष्मी नांदत नसते, असं आमचे वाडवडील सांगून गेलेत; परंतु या नेत्याच्या मुलांच्या डोक्यावर केवळ लक्ष्मीचीच कृपा झालेली नाही, तर नुकत्याच कुठल्यातरी विद्यापीठाने त्यांना ‘आचार्य’ ही पदवी देऊन साक्षात सरस्वतीलाही वरदहस्त ठेवायला भाग पाडले! त्यामुळे आमच्या पूर्वजांनी सांगितलेले नीती आणि नियम हे चूक होते, अशी शंकाही आताशा आम्हाला यायला लागली. विशेषत: शिक्षणातील पाया मजबूत नसतानाही त्यांच्या लेकरांना जेव्हा मंत्रिपदावर आरूढ होताना बघितले आणि त्यांच्यासमोर नतमस्तक होणार्‍या उच्चशिक्षाविभूषित अधिकार्‍यांना बघितलं की असं वाटतं, ज्यांनी आपल्या आयुष्याची २५ वर्षे विद्याराधनेत घालविली, अनेक स्पर्धापरीक्षांसाठी रात्र रात्र जागरणं केली आणि आपल्या मायबापाच्या मिळकतीमधील पोटाला चिमटा घेऊन आपल्या भविष्यासाठी वेगळा काढून ठेवलेला वाटा खर्च केला, हे सारे केवळ याचसाठी होते की काय?
काही दशकांपूर्वी हर्षद मेहता या शिक्षणात बुद्धी नसणार्‍या सामान्य माणसाने आपल्या कर्तृत्वाने(?) अनेकांच्या डोळ्यांत धूळ फेकत स्वत:ची इतकी आर्थिक प्रगती करून घेतली की, त्याच्या क्लृप्तीने अनेकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली! अर्थात, त्याने वापरलेल्या क्लृप्त्या या आर्थिक गुन्हेगारीच्या चौकटीतील होत्या आणि त्यामुळे कालांतराने त्यावर कारवाईही झाली, ही गोष्ट वेगळी.
महत्वाचे हे की, पूर्वीच्या नेतेमंडळींकडे असणारी संपत्ती आणि आताच्या नेतेमंडळींकडे असणारी संपत्ती याकडे बघितले, तर आताचे नेते हे नक्की संपत्तीचे आयोजन, संगोपन आणि संवर्धन कसे काय करतात, हे अभ्यासावेसे वाटते. आपल्या पहिल्या निवडणुकीत दिलेल्या संपत्ती-विवरणामध्ये आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या नावावर असलेली तुटपुंजी संपत्ती पुढील पाच वर्षांच्या निवडणुकीतील संपत्ती-विवरणामध्ये कितीतरी पटीने कशी काय वाढते किंवा वाढू शकते? या संपत्तीव्यवस्थापनाचा अभ्यास त्यांनी केव्हा आणि कसा केला? त्याला कशाची आणि कुणाची साथ लाभली? हे सारे अनाकलनीय वाटते. चुरगाळलेल्या कपड्यांत पायी फिरणारा नेता काही वर्षांतच कडक इस्त्री केलेली उंची वस्त्रं लेवून, नावही माहीत नसलेल्या उंची आणि नव्याकोर्‍या चारचाकी वाहनांनी गावात आणि गावोगाव फिरतो, तेव्हा ज्यामुळे हे सारे त्याला प्राप्त झालेले आहे त्याचे सूत्र हे आम्हालाही आमच्या प्रगतीसाठी त्याने कथन करावे, असे वाटून जाते.
त्या सत्यनारायणाच्या कथेतील मोळीविक्याला सत्यनारायणाच्या पूजनाचे माहात्म्य आणि महत्त्व कथन केल्याने, त्यानेही सत्यनारायणाचे पूजन केले. दरवर्षी अथवा दर पौर्णिमेला तो आपल्या कुटुंबासमवेत सत्यनारायणाचे पूजन करीत होता. आयुष्याच्या अंती त्याला स्वर्गसुख प्राप्त झाले, असे आम्ही श्रद्धायुक्त अंत:करणाने वाचन, पठण आणि श्रवण करीत असतो; तरीसुद्धा आम्हाला, नेत्यांना मिळणारी, मिळालेली किंवा त्यांनी मिळवलेली म्हणा ना, ती सुखे या जन्मात का मिळू नये? हे जेव्हा आम्हाला आमच्या आयुष्यात प्राप्त होत नसेल, तर आमच्या पूजेत नक्की कुठली कमी त्या नारायणाला जाणवली, हे त्या नारायणाला विचारावेसे वाटते. परंतु, सामान्य माणूस श्रद्धाप्रेमी असल्याने आणि त्याचा त्या नारायणावर विश्‍वास असल्याने, विशेषत: तो देवाला घाबरत असल्याने नाही विचारीत. त्यामुळे देवही आम्हा सामान्यांच्या व्यवस्थेबद्दल आणि अवस्थेबद्दल नक्कीच निश्‍चिंत आहे.
तरीसुद्धा काही शंका, काही प्रश्‍न कायम अनुत्तरित घेऊन जगणार्‍या आम्हा सामान्यांना दरवर्षी प्राप्तिकर विवरण भरावयाचे असले की घाम फुटतो. अशा वेळी या सर्व नेत्यांच्या थाटामाटाकडे, कलाकलाने वाढत जाणार्‍या संपत्तीकडे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या राहणीमानाकडे बघितले, तर आपल्या संपतीचे विवरण त्यांना तरी माहीत असेल काय?
या सार्‍या प्रश्‍नांची उत्तरे आम्हाला नाही मिळणार, याची आम्हाला खात्री आहे आणि मिळेपर्यंत आम्ही अथवा ते कुठे असतील, हेसुद्धा सांगता येणार नाही. अर्थात, त्या बिहारच्या नेत्याने या आपल्या संपत्तीसंबंधी जी काही उलटसुलट चर्चा सुरू आहे त्यामध्ये विरोधकांचा हात आहे, असे सांगून आपल्या स्वच्छ चारित्र्याची आणि शुद्ध प्रतिमेची ग्वाही दिली तेव्हा वाटले की, हे असे आपल्याला का नाही सुचत…?
– मधुसूदन (मदन) पुराणिक
९४२००५४४४४