काटेकोर नियोजनाची गरज

0
61

वेध
गेल्या ५० वर्षांमध्ये पावसाळ्यातील ढगांची घनता क्रमशः कमी होत असल्याचा ताजा अहवाल हवामानशास्त्र खात्याने दिला आहे. जून, जुलैमधील पावसाचे प्रमाण कमी होत चालल्याचे आपण दरवर्षी पाहत आहोत. या पार्श्‍वभूमीवर, या अहवालाकडे आपसूकच लक्ष वेधले जाते. पावसाच्या बेभरवशीपणाला अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणे जबाबदार आहेत. परंतु, हवामानबदल किंवा जलवायूचक्र परिवर्तन या संदर्भात एकमेकांकडे बोटे दाखविण्याचीच जगभरात स्पर्धा लागल्याचे दिसते. अनेक देशांनी पुढील काळात पाणी कमी होत जाणार असल्यामुळे त्या दृष्टीने नियोजन सुरू केले असून, अनेक देशांनी अधिक पाणी लागणारी पिके घेणे बंद केली आहेत. या पष्ठभूूमीवर आपल्याकडे कोणते नियोजन पाहायला मिळते? जूनमध्ये वेळेवर पाऊस येईल, या भरवशावरच पाणीवाटपाचे नियोजन आजही केले जात आहे. पिकांसाठी कमीत कमी पाणी कसे लागेल, या विषयी नियोजन आणि अंमलबजावणी केली जात नाही. दरवर्षी केरळात आणि महाराष्ट्रात वेळेवर मोसमी पाऊस येत आहे, अशी भविष्यवाणी हवामान खात्याकडून वर्तविली जाते आणि जूनमध्ये  येतात ते केवळ कोरडे ढग! अशा परिस्थितीत पाणीसाठे, वापर आणि वाटपाचे फेरनियोजन आवश्यक असून, धरणांमधील गाळ काढून त्यांची क्षमता वाढविण्यासारखी कामे पाऊस नसण्याच्या काळात केल्यास अधिक पाणी साठविता येईल. आजमितीस मोजमापानुसार जेवढे पाणी धरणांमध्ये असल्याचे दिसते, तेवढे प्रत्यक्षात असत नाही. कारण धरणांमध्ये सातत्याने गाळ साचत असतो. त्यामुळेही धरणातील साठ्याची दाखविली जाणारी आकडेवारी चुकू शकते. उद्याचा विचार करून, पाऊस यापुढे बेभरवशीच राहणार, हे गृहीत धरून पाण्याबाबत नियोजन करण्यास नियोजनकर्त्यांनी प्राधान्य द्यायला हवे. पश्‍चिम घाटात उगम पावणार्‍या पूर्ववाहिनी नद्या महाराष्ट्रासह दख्खनचे पठार आणि दक्षिणेतील अनेक राज्यांमधील मोठ्या परिसराचे भवितव्य ठरवितात. सामान्य पर्जन्यमान गृहीत धरून राज्या-राज्यांमध्ये पाणीवाटपाचे करारही झाले आहेत. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये ऋतुचक्र बदलले आहे. जूनमध्ये हमखास येणारा पाऊस जूनची अखेर उजाडली, तरी येत नाही. पावसाळ्यातील पावसाचे दिवस कमी झाले आहेत.
दहशतवाद आणि सोशल मीडिया
पाकिस्तान आणि दहशतवाद यांचे अतिशय घट्‌ट नाते असल्याचे जगजाहीर आहे;  तरीही आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवाद संपवण्याचे आणि दहशतवादविरोधी कडक कारवाई करण्याचे दावे पाकिस्तान करत असतो. मात्र, प्रत्यक्षात पाकिस्तानने दहशतवाद संपवण्यासाठी कोणताही पुढाकार घेतलेला नाही. उलट, ज्या संघटनांवर बंदी घातलेली आहे अशा संघटना आजही सोशल मीडियातून सक्रिय आहेत. या माध्यमातून पाकिस्तानमध्ये खुलेआम दहशतवादी विचारसरणी पसरवण्याचे काम या दहशतवादी संघटना राजरोसपणाने करत आहेत.  ‘डॉन’ या पाकिस्तानी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, बंदी घातलेल्या ६४ दहशतवादी संघटनांपैकी ४१ संघटना जगातील सर्वात लोकप्रिय असलेल्या  फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटचा वापर खुलेआम करत आहेत. गेल्या महिन्यात डॉनने, बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना, ज्यामध्ये शिया आणि सुन्नी संघटना, पाकिस्तानात सक्रिय असलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना, बलुचिस्तान आणि सिंध प्रांतात सक्रिय असलेल्या फुटीरतावादी संघटना यांची पडताळणी केली. यामधून ही धक्कादायक  माहिती हाती लागली आहे. अहले सुन्नत वल जमात (एएसडब्लूजे) ही संघटना दहशतवादी विचारसरणीचा आणि साहित्याचा विस्तार करण्यात फेसबुकवर कार्यान्वित असणारी सर्वात मोठी संघटना आहे. तसेच शिया संघटना आणि बलुचिस्तानमधील फुटीरतावादी संघटनेव्यतिरिक्त तालिबान-पाकिस्तान यांचाही समावेश असल्याचे म्हटले जाते. या संघटनांच्या फेसबुक खात्यांना आणि पेजेसवरील फुटीरतावादी आणि कट्‌टरपंथी विचारधारेला खुलेआम मिळणारे समर्थन ही चिंतेची बाब आहे. हत्यारांचा वापर आणि प्रशिक्षण यांच्याशी संबंधित असणार्‍या काही समूहांनी यापैकी काही फेसबुक खात्यांना सार्वजनिक पातळीवर लाईक केलेले आहे. ज्या दहशतवादी संघटना समाजमाध्यमांमध्ये सक्रिय आहेत, त्यांचा मुख्य उद्देश तरुणांची माथी भडकावून त्यांना आपल्या विचारधारेत सामावून घेणे असाच असतो, हे सहज लक्षात येते. या संघटना इंग्रजीऐवजी उर्दू किंवा रोमन उर्दू भाषेतून आपले फेसबुक पेज किंवा समूह चालवतात. यावरून  या संघटनांचे लक्ष्य स्थानिक समर्थक मिळवणे हेच आहे. जगभरातील प्रगत देशांसह आशियातील देशांसाठी डोकेदुखी ठरलेली इस्लामिक स्टेट संघटना यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भारताच्या दृष्टीने आणखी एक चिंतेची बाब म्हणजे, या निर्बंध घातलेल्या संघटनांचे लक्ष्य जम्मू-काश्मीरही आहे. कारण बहुसंख्य पेजेसवर काही काळापूर्वी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचे उदात्तीकरण केले जाते.
– अभिजित वर्तक 
९४२२९२३२०१