स्त्रियांना प्रवेश नसलेले बेट!

0
171

टोकियो, १० जुलै 
जपानचे ओकिनोशिमा या छोट्याश्या बेटावर स्त्रीयांना प्रवेश दिला जात नाही आणि वर्षाला फक्त २०० पुरुषांनाच या बेटावर प्रवेश दिला जातो. या आगळ्यावेगळ्या बेटाला ‘युनेस्को’ने जागतिक वारशाचा दर्जा दिला आहे. याचे कारण या बेटावरील १७ व्या शतकापासूनचे प्रार्थनास्थळ आहे. जगभरातील प्रार्थनास्थळांपेक्षा निश्‍चितच वेगळे असे एक प्रार्थनास्थळ ओकिनोशिमा येथे आहे. या बेटावर दरवर्षी फक्त २०० पर्यटकांनाच जाण्याची परवानगी आहे. तेसुद्धा वर्षांतून एक दिवसच त्यांना ही परवानगी मिळते.
२७ मे या दिवशीच पर्यटक तिथे जाऊ शकतात. या पर्यटनस्थळी जाण्याआधी पर्यटकांना विवस्त्र व्हावे लागते. इथल्या किनार्‍यावर स्नान केल्यानंतरच पर्यटक पुढे जाऊ शकतात. असे केल्याने शरीर पवित्र होते अशी त्यांची श्रद्धा आहे. या बेटावर स्त्रीयांना मात्र येण्याची परवानगी नाही. त्यांना इथे येण्याची बंदी घालण्यात आलीय्. या ठिकाणी येणार्‍या पर्यटकांसाठी आणखी एक नियम आहे. पर्यटक इथल्या कोणत्याच वस्तू घरी घेऊन जाऊ शकत नाही. अगदी दगड, गोटे, झाडांच्या फांद्या, पाने अशा कोणत्याच वस्तू या पवित्र ठिकाणावरून घरी घेऊन जायची परवानगी पर्यटकांना नाही. या बेटावर दुर्मिळ वस्तूंचा खजिना देखील आहे. ज्यात आरसे, भांडी, दागिने यांचा समावेश आहे. यात ८० हजारांहून अधिक दुर्मिळ वस्तूंचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)