परकीय चलन विनिमय समितीचा भारत सदस्य

0
178

हँबर्ग, १० जुलै 
जागतिक परकीय चलन विनिमय समितीचा (जीएफएक्ससी) भारत लवकरच सदस्य होणार आहे. परकीय चलन विनिमय बाजाराला चालना देऊन व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी केंद्रीय बँकांचे प्रमुख आणि तज्ज्ञांनी एका नव्या समितीची स्थापना केली आहे. ही समिती बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट या संघटनेच्या (बीआयएस) मार्गदर्शनाखाली काम करणार आहे. बीआयएसकडे साठ देशांच्या केंद्रीय बँकांचे सदस्यत्व आहे.
आर्थिक क्षेत्रातील धोके, गैरव्यवहार कमी करण्यासंबंधीच्या अहवालामध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे. आर्थिक स्थैर्य मंडळाने ‘जी-२०’ परिषदेमध्ये याबाबतची माहिती दिली आहे. एफएसबी ही जागतिक अर्थव्यवहार व्यवस्थेवर काम करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी जागतिक परकीय चलन विनिमय संहिता आणखी कडक करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले होते. नव्याने विस्तारलेल्या जीएफएक्ससी याविषयी नियनित बैठका घेणार आहे.
सध्या आठ देशांच्या परकीय चलन विनिमय समित्या आहेत. या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, युरो विभाग, हॉंगकॉंग, जपान, सिंगापूर, ब्रिटन आणि अमेरिका या देशांचा यामध्ये समावेश होतो. जीएफएक्ससी ब्राझील, चीन, भारत, कोरिया, मेक्सिको, दक्षिण  आफ्रिका, स्विडन, स्वित्झर्लंड आदी देशांनाही यामध्ये समाविष्ट करून घेणार आहे. (वृत्तसंस्था)