चीन आणि चिनी वस्तू

0
12

वेध
सध्या चीन आणि भारत या दोन देशांमधील तणाव वाढत आहे. चीनच्या युद्धनौका आणि पाणबुड्या बंगालच्या उपसागरात तैनात करण्यात आल्या असून, सिक्कीमच्या सीमेवरील डोकलाम भागावरून वाद निर्माण झाल्यानंतर, चीन सरकार आणि तेथील प्रसारमाध्यमांनी भारताला युद्धापर्यंतच्या धमक्या दिल्या आहेत. चीन म्हटला की, ऑक्टोपससारखे पाय पसरविण्याकरिता अव्वल क्रमांकावर आहे. एकीकडे पाकिस्तानची डोकेदुखीतर आहेच, पाकिस्तानकडून दहशतवादाला असलेल्या पाठिंब्यामुळे काश्मीर अस्वस्थ झालाय्, शिवाय अमरनाथसारख्या यात्राही आता सुरक्षित राहिल्या नाहीत. त्यातच चीननेही  संधी साधून रंग दाखविणे सुरू केले आहे. भारतीय बाजारपेठा चीनने यापूर्वीच काबीज केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापारांतर्गत चिनी साहित्य आता भारतातल्या घराघरांत पोहोचले आहे. त्यामुळे तसे पाहिले तर भारताकडून चीनकरिता आथिर्र्क उलाढाल मोठ्या प्रमाणात होत राहते. ही मोठी उलाढाल पाहता, चीनने भारतासोबत मैत्रीचेच संबंध ठेवायला हवे होते, पण चीनला तशी अक्कल पाहिजे ना! भारतातील सामान्य जनता आता याच कारणामुळे चिडली आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार असावा, असे ज्यालात्याला मनातून वाटू लागले आहे. आता हेच पाहा ना, मुंबईतल्या शाळांमध्ये  ‘मेड इन चायना’विरोधात आवाज उठविण्यात आला आहे.  शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी वॉटर बॉटल, डबा, कम्पॉस, रंगपेटी, स्केचपेन, स्केल, पॅड, रबर यासारखे चिनी बनावटीचे साहित्य शाळेत घेऊन येऊ नये, असे आवाहन मुख्याध्यापक संघटनेने नुकतेच केले आहे. भारत आणि चीन या दोन देशांतील ताणलेल्या संबंधांच्या पार्श्‍वभूमीवरच्या या आवाहनामागे विद्यार्थ्यांत देशभक्ती जागृत व्हावी, स्वदेशीचा वापर व्हावा, असे संघटनेचे म्हणणे आहे. चिनी बनावटीच्या वस्तू वापरू नयेत, अशी जनजागृती यापूर्वी झाली आहे. पण, हातातल्या मोबाईलपासून तर घरातील टीव्ही-मिक्सरपर्यंत आवाका असलेल्या या देशात हे कितपत शक्य होईल?
मुंबईतल्या मुख्याध्यापक संघटनेचे हे आवाहन  यशस्वी होईल काय, हे सांगता येत नाही. आंतरराष्ट्रीय व्यापार संबंधावर याचा काय परिणाम होईल, याचाही अंदाज बांधणे कठीण आहे. या संघटनेच्या माध्यमातून हा उठाव मोठा होऊ शकतो. पण एक मात्र नक्की, या देशावर कुणी जराही वाकडी नजर टाकली, तर या देशातील विविध संघटना, नागरिक दक्ष राहतात. चीन ऑक्टोपस असला, तरी भारत चीनला उभा-आडवा फाडायला केव्हाही तयार आहे, हा भाग वेगळा!
जर भविष्यच बुडाले…
तरुणवर्ग हा देशाचा मुख्य आधारस्तंभ आहे. देशाचं उद्याचं भविष्य आजच्या तरुणांमुळेच घडणार आहे. म्हणूनच स्वामी विवेकानंद तसेच अनेक विचारवंतांनी आजवर देशातील तरुणांत जागृती केली. ते देशप्रेमच होतं की, स्वातंत्र्याच्या लढाईत तरुण देशभक्त क्रांतिकारकांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं. देशाला त्यांनी जे स्वातंत्र्य मिळवून दिलं, ते टिकवणं ही आजच्या तरुणांची मोठी जबाबदारी आहे, सोबतच इतरही जबाबदार्‍या त्यांनी समर्थपणे सांभाळाव्यात, अशी त्यांच्याकडून सर्वांची अपेक्षा आहे. पण असं असताना आज तरुणांच्या बाबतीत जे अपघात घडत आहेत, ते दुर्दैवी आहेत. त्यामुळे मन खिन्न होते, दु:खी होते. काळीज हेलावते. रविवारी नागपूरच्या वेणा जलाशयात, मौजमस्ती करण्यासाठी गेलेल्या आठ तरुणांना जलसमाधी मिळाली. सर्वच जण हळहळले. शेवटी बातमी शिळी होते, लोकं वाचतात अन् मग जैसे थे. पण, जीव गेलेल्यांचं काय? ज्या आई-वडिलांनी त्यांना तळहातावर जपलं, जे त्यांच्यावर अवलंबून होते त्यांचं काय? असे अस्वस्थ करणारे प्रश्‍न पिच्छा सोडत नाहीत. पण, त्यावर काहीतरी उत्तर देऊन मोकळं होण्याची माणसाची सवय जुनीच! जीव गेलेल्या तरुणांनी नावेत फेसबुक लाईव्ह केले, सेल्फी काढल्या, असं कारण सर्वांनी पुढे केलं. आजवरच्या तरुणांच्या इतर अपघातातही सेल्फी, मोबाईल कारणीभूत राहिलेही आहेत. ते काहीही असो. पण, आज  तरुणवर्ग हा आपल्या सुरक्षेविषयी जागृत राहिलेला नाही. बदलत्या जीवनशैलीनं त्याला भुरळ घातली आहे. काहीतरी वेगळं करण्याच्या नादात त्याचा घात होत आहे, हेच वेळोवेळी सिद्ध होत आहे. नवी भरारी, नवी उमेद ही सारी स्वप्नं साकार करण्याकरिता कधीकधी तरुणांकडून योग्य विचार, निर्णय घेतले जात नाहीत. तरुणांच्या बाबतीतल्या अनेक बातम्या या देशाकरिता उद्याची धोक्याची घंटा आहेत. एक दुसरं उदाहरण पाहता, मॉडेल कृतिका चौधरीच्या १२ जून रोजी झालेल्या हत्येमागे, अमली पदार्थ विकणार्‍याकडे तिची सहा हजारांची उधारी असल्याचं स्पष्ट झालंय्. कृतिका, करीअर करण्याकरिता आईवडिलांपासून दूर मुंबईला एकटी राहात होती आणि अमली पदार्थांच्या आहारी गेली होती. ज्या ठिकाणी नौकानयन करण्यास बंदी आहे, पुरेशी सुरक्षित सोय नाही, याची काळजी त्या तरुणांनी घेतली असती, तर वेणा जलाशयातील अपघात कदाचित झालाच नसता. अमली पदार्थांच्या आहारी कृतिका गेली नसती, तर तिची हत्याही झाली नसती. शेवटी आपण कुणाचेतरी भविष्य आहोत, आपल्यावर कुणीतरी अवलंबून आहे, पर्यायाने या देशाचे आपण सुजाण नागरिक आहोत, आपली एक भक्कम जबाबदारी आहे, याचा विचार आतापासूनतरी प्रत्येक तरुणांना करावा लागेल. कारण तरुणांच्या बाबतीतील अशा बातम्या विसरल्या जरी जात असल्या, तरी त्यामागे घरच्यांची, या देशाची जी हानी  होते, ती पोकळी कधीही भरून निघू शकत नाही. या घटनांवर आळा बसला पाहिजे.
– दीपक वानखेडे 
९७६६४८६५४२