भ्याड हल्ला!

0
94

अग्रलेख
काश्मीरला भारतापासून तोडण्यासाठी, भारतीयांच्या मनात काश्मिरी लोकांविषयी द्वेष निर्माण करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये दहशत पसरविण्यासाठीच पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेकरूंवर भ्याड हल्ला केला. अशा हल्ल्यांना तोंड देण्याची क्षमता भारतीयांमध्ये आहे आणि ज्यांनी हा हल्ला केला त्यांना कठोर शिक्षा केली जाईल, यात शंका नाही. यंदा अमरनाथ यात्रेवर हल्ला होऊ शकतो, अशी भीती आधीच व्यक्त करण्यात आली होती. गुप्तचर विभागाने तशी माहिती केंद्र आणि राज्य सरकारला दिली होती. त्या दृष्टीने सुरक्षाव्यवस्थाही चोख ठेवण्यात आली होती. १५ वर्षांपूर्वी अमरनाथ यात्रेकरूंवर असाच हल्ला करण्यात आला होता. परंतु, मधली १५ वर्षे ही यात्रा सुरळीत पार पडली. दहशतवादाचा धोका असतानाही देशभरातून मोठ्या संख्येत यात्रेकरू अमरनाथला दरवर्षी जातात आणि अतिशय श्रद्धेने बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेतात. पण, मानवजातीला कलंक असलेल्या दहशतवाद्यांनी यंदा या निरपराध यात्रेकरूंवर हल्ला केला अन् त्यात आमचे सात भाविक मृत्युमुखी पडले, ही अतिशय दु:खाची गोष्ट आहे. अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ला हा कोट्यवधी भारतीयांच्या श्रद्धेवर झालेला हल्ला आहे. भारतीय मूल्य आणि परंपरेवर झालेला हा हल्ला आहे. भारतीय नागरिक या हल्ल्याने विचलित होणार नाहीत आणि घाबरणारही नाहीत, हे मानवतेच्या शत्रूंनी लक्षात घेतले पाहिजे. असे कित्येक हल्ले झाले आणि भारतीय समाजाने ते परतवूनही लावले. अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला हल्ला हा अतिशय निषेधार्ह आहे. अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यापुढे झुकायला भारत हा काही षंढांचा देश नाही, तर भारत हा कोणत्याही संकटांचा मुकाबला करण्यासाठी सक्षम असलेला मजबूत मानसिकता असलेला कणखर देश आहे. भारत अशा हल्ल्यांना भीकही घालणार नाही अणि कधी कुणापुढे झुकणारही नाही. दहशतवादाचा नायनाट कसा करायचा हे भारताला, भारताच्या नागरिकांना आणि सुरक्षा दलांना चांगले ठाऊक आहे. त्यामुळे ज्यांनी कुणी असा हल्ला करण्याचे दुस्साहस केले आहे, त्यांनी आता परिणाम भोगायला तयार राहावे. यात्रेवर असलेला दहशतवादी हल्ल्याचा धोका ओळखून सरकारने आधीच कडेकोट सुरक्षाव्यवस्था केली होती. सुरक्षेत कोणतीही चूक राहू नये याची काळजीही घेण्यात आली होती. अमरनाथ यात्रेला प्रत्यक्ष सुरुवात होण्यापूर्वी सगळ्या शक्यतांचा विचार करून नियोजन करण्यात आले होते. असे असतानाही उत्तर भारतातल्या पहिल्या श्रावण सोमवारी शिवभक्तांवर हल्ला झाल्याने चिंतेचे वातावरण जरूर निर्माण झाले आहे. मात्र, हल्ला झाल्यानंतरही बिथरून न जाता यात्रा सुरूच ठेवण्याचा जो निर्धार सरकारने आणि सुरक्षा यंत्रणांनी केला, त्याची प्रशंसाच केली पाहिजे. जर यात्रा थांबविण्याचा निर्णय झाला असता, तर अतिरेक्यांचे मनोबल उंचावले असते अन् सुरक्षा दलांचे व यात्रेकरूंचे मनोबल खच्ची झाले असते. अमरनाथ यात्रेसाठी येणार्‍या यात्रेकरूंच्या केसालाही धक्का लागणार नाही, यात्रेकरूंनी बिनधास्त यावे, आम्ही त्यांच्या सुरक्षेची काळजी घेऊ, असे आश्‍वासन जम्मू-काश्मीरच्या सरकारने आणि सामान्य काश्मिरी जनतेनेही दिले होते. आमचा प्रदेश हा शांतताप्रिय आहे, आम्हाला कुणाशीही भांडण नको आहे, आम्हाला संवाद हवा आहे, आम्हाला भाईचारा हवा आहे, यात्रेकरूंनी आणि पर्यटकांनी कोणत्याही भीतिशिवाय यावे, असे आवाहन काश्मीरमधील हॉटेलमालकांनी, जनतेने, टूरिस्ट ऑपरेटर्सनी आणि अन्य अनेकांनी केले होते. असे असतानाही दुर्दैवाने यात्रेकरूंच्याच बसवर अतिरेक्यांनी हल्ला केला आणि त्यात सात यात्रेकरूंचा अंत झाला. काश्मीर खोर्‍यात पर्यटक येत नाहीत, त्यामुळे आमचा पर्यटन उद्योग पार थंडावला आहे, मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली आहे, हिंसाचाराच्या छोट्यामोठ्या घटना घडत असताना इलेक्ट्रॉनिक मीडियावर प्रत्यक्षात अतिरंजित वर्णन दाखविले जाते, त्यामुळे पर्यटक काश्मिरात येण्यास घाबरतात अन् त्यांचा परिणाम आमच्या अर्थव्यवस्थेवर होतो, असे गार्‍हाणे काश्मिरी बांधव सातत्याने मांडत असतात. त्यात तथ्य आहे. पण, याच काश्मिरी बांधवांपैकी काही जण अतिरेक्यांना थारा देतात, त्यांना पाठीशी घालतात, त्यांना आपल्या घरात आश्रय देतात, हे वास्तव कसे विसरता येईल? पाकिस्तानातून शस्त्रास्त्रे घेऊन येणार्‍या अतिरेक्यांना काश्मीरमधल्या जनतेने हाकलून लावले पाहिजे, त्यांचा तिथेच बंदोबस्त केला पाहिजे, हे जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत देशाच्या अन्य भागातील जनतेला विश्‍वास वाटणार नाही. काश्मीर खोर्‍यात अशांतता आहे, परिस्थिती अस्थिर आहे, कधी दगडफेक होईल याचा काही नेम नसतो. अशा वातावरणात देशभरातील पर्यटकांनी काश्मिरात पर्यटनासाठी यावे, जुलै-ऑगस्टमध्ये अमरनाथ यात्रेसाठी यावे, अशी अपेक्षा जर आमचे काश्मिरी बांधव करीत असतील, तर ती पूर्ण कशी करणार? इलेक्ट्रॉनिक मीडियावर अतिरंजित चित्र दाखविले जाते हे एकवेळ मान्यही केले, तरी वस्तुस्थिती बदलणार आहे काय? देशवासीयांच्या मनात काश्मिरातल्या दहशतवादाविषयी जी भीती आहे, ती कशी जाणार? ती तर प्रत्यक्ष कृतीतूनच घालवावी लागणार. आता प्रत्यक्ष कृती म्हणजे काय? तर काश्मिरी तरुणांनी दगडफेक आणि हिंसाचार ताबडतोब थांबवायला हवा, अतिरेक्यांशी लढणार्‍या आमच्या शूर जवानांच्या मार्गात येणार्‍या काश्मिरींनी स्वत:ला बाजूला करावे, आझादीची भाषा जे थोडे लोक करतात त्यांचाही बंदोबस्त करावा. असे झाले तरच देशाच्या उर्वरित भागातील जनतेला विश्‍वास वाटेल, त्यांची पावलं मग आपोआपच काश्मीरकडे वळतील. आपण भारताचे अविभाज्य अंग आहोत, असे समजून काश्मिरी बांधवांनी व्यवहार ठेवावा. त्यांच्याकडून अशी अपेक्षा करण्यात गैर काहीच नाही. भारतीयांना तर काश्मीरही हवे आहे आणि काश्मिरी बांधवही हवे आहेत. भारतीयांच्या काश्मीरप्रेमाबद्दल काश्मिरी बांधवांनी संशय बाळगण्याचे कारण नाही. पण, काश्मिरी बांधवांनी पाकिस्तानच्या भूलथापांना आणि फुटीरतावादी नेत्यांच्या चिथावणीला बळी पडून देशाविरुद्ध भूमिका घेऊ नये, अशी अपेक्षा करणे चूक ठरणार नाही. अमरनाथ यात्रा सुरळीत आणि शांततेत पार पडलेली पाकिस्तानला आणि फुटीरतावाद्यांना नकोच आहे. अमरनाथ यात्रा शांततेत झाली तर हिंदू-मुस्लिम गुण्यागोविंदाने नांदतील आणि त्यामुळे खोर्‍यात अशांतता माजवण्याचा आपला हेतू विफल होईल, अशी भीती पाकिस्तानला वाटते. त्यातूनच पाकिस्तान सातत्याने कुरापती करीत असतो. पाकिस्तानसोबतच काश्मीरमधीलच काही तत्त्वांनाही खोर्‍यात शांतता नांदलेली नको आहे. पाकिस्तान स्वतंत्र झाल्यापासून त्या देशात कायम अस्थिरता आणि अशांतता आहे. तो देश आर्थिकदृष्ट्याही दिवाळखोर आहे. चीन व अमेरिकेने फेकलेल्या तुकड्यांवर पाकिस्तानची मस्ती आणि मुजोरी सुरू आहे. स्वत: अशांत असलेल्या पाकला काश्मीर खोर्‍यातही शांतता नको आहे ही बाब काश्मिरी बांधवांनी ओळखली पाहिजे. अमरनाथ यात्रेवर हल्ला करून हिंदूंच्या मनात मुस्लिम बांधवांबद्दल द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला आहे. ही बाब लक्षात घेत स्वत:च्या हितासाठी काश्मिरी बांधवांनी पाकिस्तानचे षडयंत्र हाणून पाडले पाहिजे. अन्यथा, असले भ्याड हल्ले होतच राहतील आणि खोर्‍यात कधीच शांतता प्रस्थापित होणार नाही, त्याचा आणखी वाईट परिणाम पर्यटन उद्योग ढासळण्यात होईल, हेही लक्षात घेतले पाहिजे.