महामार्ग प्राधिकरणाला  १.१८ दशलक्ष डॉलर्सची लाच

0
185

कंत्राट मिळविण्यासाठी बोस्टन कंपनीचा घोटाळा  
वॉशिंग्टन, ११ जुलै 
२०११ ते २०१५ या काळात राष्ट्रीय महामार्गांचे कंत्राट आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी अमेरिकेच्या बोस्टन येथील एका कंपनीने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील अधिकार्‍यांना तब्बल १.१८ दशलक्ष डॉलर्सची लाच दिली होती, असा खळबळजनक खुलासा अमेरिकेच्या विधि विभागाने केला आहे. भारत सरकारने  या प्रकरणाच्या  चौकशीचे आदेश दिले आहेत.
हा घोटाळा झाला, तेव्हा केंद्रात कॉंगे्रसप्रणीत संपुआ सरकार सत्तेत होते. विधि विभागाच्या गुन्हेगारी शाखेने २१ जून रोजीच्या पत्रात या घोटाळ्याचा खुलासा केला. या पत्रात म्हटले आहे की, सीडीएम स्मिथ या कंपनीने आपल्या कर्मचारी, दलालांच्या व भारतातील आपल्या संपर्काच्या माध्यमातून भारतातील महामार्ग बांधकाम, देखरेख, प्रारूप तयार करणे आणि जल प्रकल्पांचे कंत्राट प्राप्त करण्याकरिता अनेक अधिकार्‍यांना १.१८ दशलक्ष डॉलर्सची लाच दिली होती. या कंत्राटामुळे या कंपनीला चार दशलक्ष डॉलर्सचा फायदा झाला होता.
२०११ ते २०१५ या काळात सीडीएम स्मिथ कंपनीकडेच भारतातील महामार्गांच्या बांधकाम व देखरेखीची जबाबदारी होती. लाचेची ही रक्कम कंत्राटाच्या एकूण मूल्याच्या दोन ते चार टक्के इतकी होती. लाचेही ही रक्कम दुय्यम कंत्राटदारांच्या माध्यमातून अधिकार्‍यांपर्यंत पोहोचविण्यात आली होती. कंत्राट मिळवून देण्यात भारतीय अधिकार्‍यांनी जे केले, त्याचे बक्षीस म्हणून ही लाच देण्यात आली होती, असेही या पत्रात म्हटले आहे.
सीडीएम स्मिथ इंडियातील बहुतांश कर्मचारी व अधिकार्‍यांनी या कामात बोस्टनच्या कंपनीला सहकार्य केले होते. यात कंपनीचा भारतातील व्यवस्थापकही सहभागी होता, असा उल्लेखही यात आहे.दरम्यान, या पत्राची गंभीर दखल घेत केंद्रीय भूपृष्ठ आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अध्यक्षांना या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. घ (वृत्तसंस्था)