राजकीय रंगमंचावरील खलनायक!

0
96

प्रासंगिक
लोकशाहीत समाजकारण, राजकारण, अर्थकारण यांचा बेमालूम समन्वय साधून, देशविकास व जनकल्याणाच्या कार्यक्रमांना चालना देण्याचे दायित्व सरकारबरोबरच विरोधकांचे देखील आहे. दुर्दैवाने विद्यमान राजकीय व्यवस्थेत याचा विसर पडल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. आजचे राजकारण लोकतांत्रिक नसून ते दबावतंत्रावर आधारित विद्वेषपूर्ण आहे. सरकारला कसे कोंडीत पकडावे, कसे नामोहरम करावे, याचाच विचार विपक्ष सातत्याने करीत आहेत. देशविकास व जनकल्याणाशी त्यांना काही देणेघेणे नाही. लोकशाहीच्या रंगमंचावर राजकारणाच्या विविध नाट्यप्रयोगात सत्तापक्ष हा प्रमुख नायक आहे, तर विपक्ष हा खलनायकाच्या भूमिकेत वावरताना दिसत आहे.
सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख भूमिकेत भाजपाचा ‘सबका साथ सबका विकास’, ‘अच्छे दिन’ हा नाट्यप्रयोग यशस्वी रीत्या सर्वत्र गाजत आहे. मोदींची प्रभावी प्रमुख भूमिका जनता जनार्दनाला इतकी लुभावणारी आहे की, विपक्षातील खलनायक एकत्रित येऊनही निष्प्रभ झाले आहेत, हतबल झाले आहेत! भाजपाला शह देण्यात आणि भाजपाच्या नाट्यप्रयोगांची लौकिकता कमी करण्यात अथवा मोदींचा करिष्मा अधोरेखित करण्यात ते विफल ठरले आहेत. कॉंग्रेसचे बालिश उपाध्यक्ष राहुल गांधी ‘मोदी मोदी’ नामजप करता करता इतके दमले, निकामे झाले की, नैराश्येपोटी देश सोडून त्यांनी मामाच्या गावाचा आसरा घेतला आहे! तेथून मोदींवर शरसंधान साधण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपल्या कुकर्माने राजकीय रंगमंचावरून अस्तंगत झाले आहेत. मायावती, अखिलेश यादव यांचा भाजपाच्या नाटकाला होत असलेला उपद्रव/विरोध प्रेक्षकांनी म्हणजे जनता जनार्दनाने युपी विधानसभा निवडणुकीत मोडीत काढला आहे. पश्‍चिम बंगालची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मोदी विरोधात स्वतःच्या जिवाचा त्रागा करून एकाकी पडली आहे.
भ्रष्टाचाराच्या अनेकविध प्रकरणांत गुरफटलेले चारा घोटाळेबाज लालूप्रसाद यादव यांची विश्‍वासार्हता पणाला लागली आहे. त्यांना साथ द्यायला विपक्ष घाबरत आहे. जेडीयूने फारकत घेतली आहे. थोडक्यात, केंद्रात भाजपासमोर या तथाकथित खलनायकाचं पूर्णपणे पानिपत झालं आहे. आव्हान संपुष्टात आलं आहे. भाजपाचा नाट्यप्रयोग देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाचे उत्तुंग शिखर गाठीत आहे. महाराष्ट्रात मात्र भाजपाला फार मोठे आव्हान आहे. ते जनतेने नाकारलेल्या विपक्षाकडून नव्हे, तर सत्ता सहनायकाच्या भूमिकेत वावरणार्‍या शिवसेना पक्षाकडून! शिवसेना सत्तेत व सत्तेबाहेर सहकाराची भूमिका सोडून खलनायकाची भूमिका प्रभावीपणे वठविण्याचा, भाजपाच्या यशस्वी प्रमुख भूमिकेला अधोरेखित करण्याचा, भाजपाचे लोकाभिमुख, संवेदनशील प्रमुख कलाकार देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा, प्रतिमा धूसर करण्याचा केविलवाणा प्रयत्न पूर्ण शक्तीने करीत आहे. भाजपाने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला विरोध ही त्याची खलनायकाला लाजवेल अशी भूमिका आहे.
अगदी अलीकडचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सर्वत्र गाजत असलेले कर्जमाफीचे वगनाट्य. कर्जमाफी व शेतकर्‍यांच्या आत्महत्या या काही भाजपा सरकारच्या काळातील नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडी सरकारच्या सत्ताकाळापासून अस्तित्वात आहेत नव्हे, तो आघाडी सरकारचा शेतकर्‍यांना कायमस्वरूपी अभिशाप आहे. आघाडी सरकारने त्यांच्या सत्ताकाळात यावर कधीही निर्णय घेतला नाही किंवा शिवसेनेने हा प्रश्‍न नेटाने लावून धरला नाही. आज मात्र विपक्ष आणि शिवसेना कर्जमाफी हेच शेतकर्‍यांच्या आत्महत्येवरील ठोस उत्तर असल्याचे रेटून सांगत आहे. त्यासाठी आंदोलने, बंद करीत आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी शेतकर्‍यांना देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कर्जबाजारी शेतकर्‍यांना काहीअंशी दिलासा दिला आहे. त्याचा लाभ राज्यातील ८९ लाख शेतकर्‍यांना होणार असल्याचा दावा सरकारने केला आहे. हा कर्जमाफीचा निर्णय भाजपा सरकारने सर्वसहमतीने घेतला आहे. कर्जमाफी योजना जाहीर करण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी- शेतकर्‍यांचे कनवाळू, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, पण आघाडी सरकारच्या काळात अपयशी ठरलेले खलनायकांचे महागुरू शरद पवार, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सुकाणू समिती प्रतिनिधी आदी सर्वच पक्षाच्या प्रमुखांशी संपर्क, सुसंवाद साधत त्यात राजकारण येणार नाही, याची दक्षता घेतली होती, तरीपण कर्जमाफीचे किळसवाणे राजकारण होत आहे. या कर्जमाफीचे श्रेय घेण्याचा पुरेपूर प्रयत्न शिवसेना करीत आहे. ही कर्जमाफी शिवसेनेमुळेच झाली. सत्तेत राहून आम्हीच शेतकर्‍यांचं भल केलं. आमच्या दबावामुळे भाजपा सरकार नमले, अशा वल्गना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचारसभांतून करीत आहेत. कर्जमाफीने आम्ही समाधानी नाही, हे सांगायला मात्र ते विसरत नाहीत! इतकेच नव्हे, तर शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी देत आहे. खरे म्हणाल तर आधीच्या आघाडी सरकारला जे जमले नाही ते देवेंद्र फडणवीसांनी शेतकर्‍यांसाठी अवघ्या तीन वर्षांत करून दाखविले आहे. कधी नव्हे तो राज्याचा कृषिदर ८ टक्क्यांवरून २० टक्क्यांनी वाढण्याची अधिकृत आकडेवारी आहे.
सरकार ३४ हजार कोटी शेतकर्‍यांना वाटणार आहे. त्याचा लाभ/आधार बहुसंख्य गोरगरीब शेतकर्‍यांना निश्‍चितच होणार आहे. यात धनदांडग्या, बागाईतदार, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, कर्जफेड करण्यास जे समर्थ आहेत त्यांना कदाचित जास्त फायदा होणार नाही. खरे म्हणाल तर अन्य राज्यांनी दिलेल्या कर्जमाफीपेक्षा महाराष्ट्राची कर्जमाफी कितीतरी पटीने अधिक आहे, तरीपण यात समाधान न मानता या कर्जमाफीचा अनेकप्रकारे कीस पाडण्याचा एककलमी कार्यक्रम खलनायक शिवसेना व विपक्ष राबवीत आहे. शेतकर्‍यांत संभ्रम निर्माण करून, भाजपा सरकारला कर्जमाफीच्या श्रेयापासून वंचित ठेवण्याची कुटिल राजकीय खेळी खेळत आहे.
महाराष्ट्र राज्य चार लाख कोटी कर्जाच्या ओझ्याखाली आधीच आकंठ बुडालेले आहे. शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देणे आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही. याचा विचार शिवसेना विपक्ष/विरोधक सदसद्विवेकबुद्धीने करीत नाही, ही खेदाची बाब आहे. कर्जमाफी हा शेतकर्‍यांना कर्जमुक्त करण्याचा कायमस्वरूपी उपाय नाही. एकदा कर्जमाफी झाली होती, पण त्याने आत्महत्या थांबल्या नाहीत. शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफीची आस लावून केवळ भावनात्मक, अगदी खालच्या प्रतीचे राजकारण महाराष्ट्रातील खलनायक करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपा-सेना युती नाट्यप्रयोग असफल ठरला आहे.
सर्वसामान्यांना या अभद्र युतीचा उबग आला आहे. शेतकर्‍यांचा प्रश्‍न हा केवळ महाराष्ट्रापुरता सीमित नसून, ती देशव्यापी गंभीर समस्या आहे. शेतकर्‍यांच्या पायाभूत समस्यांचा सर्वांगीण एकात्मिक विचार करून त्यावर कायमस्वरूपी स्थायी उपाय करणे, हा ऐरणीवरचा प्रश्‍न आहे. कर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्‌टी आहे. दुष्काळ, बियाण्यांचा अपुरा साठा, सिंचन योजनातील भ्रष्टाचार, सिंचनाची असुविधा, शेतीमालाचे घसरते भाव, बाजारातील दलालांचा सुळसुळाट व शेतकर्‍यांचे आर्थिक शोषण या प्रश्‍नांवर- समस्यांवर सरकार व विपक्षांनी एकत्र येऊन चिंतन व विचारमंथन करून समन्वयाने तोडगा काढायला हवा. तेव्हाच शेतकरी आत्मनिर्भर होऊन कर्जाच्या पाशातून मुक्त होऊ शकेल. शेतकर्‍यांना पुन्हा कर्जमाफी मागण्याची वेळ येणार नाही, अशी शेतीपूरक व पोषक परिस्थिती निर्माण करणे ही आजची प्राथमिकता आहे. लोकशाहीत राजकीय पक्षांनी सकारात्मक, विधायक, जबाबदार राजकारण करणे अभिप्रेत आहे; अराजकता निर्माण होईल अशा पदयात्रा, मोर्चा, आंदोलने नव्हे!
– दिगंबर शं. पांडे
९४०३३४३२३९