रवी शास्त्रीच!

0
54

वेध
अपेक्षेनुसार रवी शास्त्रीच्याच गळ्यात प्रशिक्षकपदाची माळ पडली. या प्रशिक्षकपदासाठी दहा दावेदारांनी अर्ज सादर केले होते. त्यात काही विदेशी खेळाडू-प्रशिक्षकांचाही समावेश होता. त्यापैकी काही लोकांची आधी निवड करण्यात आली आणि त्यांच्या मुलाखती घेऊन शास्त्रीच्या नावावर काल रात्री अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्याआधी दुपारीच रवी शास्त्रीची प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते, त्यावर बीसीसीआयने सायंकाळी खुलासा करून अजून अंतिम निर्णय झालेला नाही, असे स्पष्टीकरण दिले होते. मात्र, रात्री बीसीसीआयनेच अधिकृत रीत्या रवी शास्त्रीचे नाव जाहीर करून या नाट्यावर अखेर पडदा पाडला. याआधीही रवी शास्त्रीने भारतीय क्रिकेट संघाचे संचालकपद भूषविले होते. कर्णधार विराट कोहलीचे रसायन जुळले नसल्यामुळे अनिल कुंबळेने आपल्या पदाचा त्याग केला होता. या घटनेपासूनच रवी शास्त्रीच्या नावाची चर्चा सुरू होती. रवी शास्त्री आणि विराट कोहली यांचे सूत चांगले जमते म्हणून की काय शास्त्रीचे नाव समोर आले होते. एकूणच परिस्थिती पाहता रवी शास्त्रीच्याच नावावर शिक्कामोर्तब होईल, असे भाकीत याआधीच वर्तविण्यात आले होते, ते कालच्या नियुक्तीने खरे ठरले. २०१९ साली होणार्‍या विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेपर्यंत रवी शास्त्रीकडे आता भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी राहणार आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार असलेल्या शास्त्रीच्या नेतृत्वाखालील चमूत आता गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून माजी वेगवान गोलंदाज झहीर खान तसेच फलंदाजीचा सल्लागार म्हणून माजी कर्णधार राहुल द्रविड याचा समावेश करण्यात आला आहे. माजी कर्णधार सौरव गांगुली, दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर व शैलीदार फलंदाज व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्याकडे प्रशिक्षकपदाच्या नियुक्तीचे अधिकार बहाल करण्यात आले होते. सौरव आणि रवी यांचे जमत नसल्यामुळे शास्त्रीचे काही खरे नाही, असेही बोलले जात होते. मात्र, सौरवनेच बोलता बोलता शास्त्रीच्या नावाचे संकेत दिले होते. विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेचा रवी शास्त्रीचा ऐनकेनप्रकारेण संबंध राहिलेला आहे. कधी खेळाडू म्हणून, तर कधी समालोचक म्हणून. याशिवाय भारताने यश संपादन केलेल्या इतरही काही स्पर्धांचा साक्षीदार होण्याचे भाग्य शास्त्रीला लाभले आहे. अशा या शास्त्रीच्या मार्गदर्शनाखाली भारत २०१९ सालची विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकू शकेल अशी आशा सर्वच जण बाळगून आहेत.
तलावात सराव
आपल्याकडे बहुतांश सर्वच खेळातील खेळाडूंची ओरड असते की, आपल्याकडे खेळाडूंना राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी पाहिजे तेवढ्या सोयी-सुविधा उपलब्ध होत नाहीत. हॉकीसाठी पुरसे ऍस्ट्रो टर्फ नाहीत, ऍथ्लेटिक्ससाठी सिंथेटिक ट्रॅक नाहीत, इनडोअर खेळांसाठी पाहिजे त्या प्रमाणावर वुडन कोर्ट नाहीत तसेच जलतरणपटूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वीमिंग पुल नाहीत, असतीलच तर त्याची देखभाल विशेष करून केली जात नाही किंवा मग खेळाडूंना ते महागड्या दराने उपलब्ध करून दिले जाते. या पार्श्‍वभूमीवर आपल्या येथे खेळाडूंनी आपली कारकीर्द गावातील तलावात पोहणे शिकून सुरू केली, तेथेच सरावही केला आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांपर्यंत झेप घेतली. त्यापैकी एक आहे प्रियंका यादव. प्रियंकाने २००६ साली दोहा येथे झालेल्या आशियन गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. सध्या ती दिल्लीच्या तालकटोरा इनडोअर स्टेडियममध्ये स्वीमिंग कोच म्हणून काम करीत आहे. तिने आपल्या कारकीर्दीत राष्ट्रीय पातळीवर अर्धा डझनपेक्षा जास्त पदके प्राप्त केली आहेत. एक खेळाडू म्हणून तिला अपूर्ण सोयी-सुविधांसाठी संघर्ष करावा लागला आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासून तिने गावातील तलावात पोहणे सुरू केले. दुसरा आहे हरेंद्र. त्याने पाचव्या वर्षीपासूनच गावातील तलावात पोहणे शिकून तेथेच दररोज चार-पाच तास सराव केला. आज त्याने आपल्या कामगिरीने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजविल्या आहेत. संसाधनांचा अभाव आणि उत्कृष्ट प्रशिक्षक नसल्यामुळे अखेर तो सेनादलात सहभागी झाला. त्याने जागतिक सेनादल स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये त्याने सात पदके प्राप्त केली आहेत. हे दोनही जलतरणपटू उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यातील जिल्हास्थानापासून २० किमी दूर असलेल्या देवरिया गावचे राहणारे आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २८ लगत असलेल्या या गावातील लोकसंख्या अवघी दोन हजार आहे. या गावाने आज देशाला ३० पेक्षा जास्त जलतरणपटू तयार करून दिले आहेत. गावातील प्रत्येक घरात एक ना एक जलतरणपटू आहे. १८८५ साली पाण्यासाठी गावातील लोकांनी तलाव खोदला होता. आंघोळ करणे, कपडे धुणे, सिंचन आणि पिण्याचे पाणी यासाठी तलावातील पाण्याचा वापर करणार्‍या गावातील मुले लहानपणापासून येथे जलतरणाचाही आनंद घेतात. उच्च शिक्षणासाठी जेव्हा येथील मुले शहरात जाऊ लागली तेव्हा त्यांना जलतरणाचे महत्त्व कळू लागले आणि ते स्पर्धात्मक स्वीमिंगमध्ये सहभागी होऊन स्पर्धा गाजवू लागले. त्यात मिळणारे यश पाहून आता गावातील युवा पिढीने जलतरणालाच आपले लक्ष्य केले आहे. येथून तयार झालेल्या सुमारे १२ ते १५ जलतरणपटूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये आपल्या कामगिरीची छाप पाडली आहे. येथील जलतरणपटूंची कामगिरी पाहून आता आजूबाजूच्या गावातील मुलेही येथील तलावात जलतरण शिकायला येऊ लागली आहेत.
-महेंद्र आकांत
९८८१७१७८०३