बिहारमधील राजकारण निर्णायक वळणावर

0
117

दिल्लीचे वार्तापत्र
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनंतर बिहारमध्ये सत्ताधारी महाआघाडीतील जदयु आणि राजद यांच्यात संघर्षाची स्थिती उद्भवण्याची शक्यता बळावली आहे. बिहारमध्ये नैतिकता आणि अनैतिकता यांच्यातील लढाईचा बिगुल वाजण्याची स्थिती निर्माण झाली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना करत असलेले बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर मुख्यमंत्री नितीशकुमार कारवाई करणार का याकडे बिहारच्याच नाही तर देशातील जनतेचे लक्ष लागले आहे.
भ्रष्टाचाराच्या आरोपावर राजकीय नाही तर वस्तुनिष्ठ खुलासा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केले आहे, तर राजदने उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव राजीनामा देणार नाही, अशी आडमुठी भूमिका घेतली आहे. याचाच अर्थ तेजस्वी यादव राजीनामा देणार नसल्यामुळे आता मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासमोर मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे या मुद्यावरून बिहारमधील राजकारण निर्णायक वळणावर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नितीशकुमार यांची जनमानसातील प्रतिमा अतिशय स्वच्छ असून, त्यांच्यावर आतापर्यंतच्या राजकीय कारकीर्दीत भ्रष्टाचाराचा एकही आरोप लागला नाही. त्यामुळेच जदयुच्या बैठकीत मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपण भ्रष्टाचार खपवून घेऊ शकत नाही, आधीही आपण भ्रष्टाचाराच्या विरोधात कारवाई केली आणि भविष्यातही करू, असे ठामपणे सांगितले आहे. आपल्या पक्षातील भ्रष्ट मंत्र्यांवर नितीशकुमार यांनी याआधी वेगवेगळ्या प्रसंगात कारवाई केल्यामुळे दुसर्‍या पक्षातील भ्रष्ट उपमुख्यमंत्र्यावर कारवाई केली नाही, तर नितीशकुमार यांची राजकीय अडचण झाल्याशिवाय राहणार नाही.
लालूप्रसाद आणि राबडी देवी यांच्या १० सर्क्युलर रोड निवासस्थानी झालेल्या बैठकीत तेजस्वी यादव यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय राजदच्या आमदारांनी घेतला आहे. हा निर्णय राजदचे आमदार आपल्या मताने घेण्याची शक्यता फारच कमी आहे. लालूप्रसाद आणि राबडीदेवी यांच्या दबावाखाली राजद आमदारांना हा निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता आहे. आम्ही नेहमीच जनतेत राहतो, पुढेही जनतेत राहू, त्यामुळे आम्हाला जे सांगायचे ते जनतेला सांगू, असा दावा राजदचे नेते रघुवंशप्रसाद सिंह यांनी केला.
तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत, त्यामुळे ते जनतेत जाऊन सांगणार काय हा प्रश्‍न आहे. मी भ्रष्टाचार केला नाही, मला फसवण्यात येत आहे, सूडबुद्धीने माझ्यावर कारवाई केली जात आहे, असा युक्तिवाद तेजस्वी यादव करू शकतात, पण बिहारची जनता त्यावर किती विश्‍वास ठेवेल, याबाबत शंकाच आहे. कारण लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला बिहारची जनता पूर्णपणे ओळखून आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या निवडणुकात बिहारच्या जनतेने लालूप्रसाद यांना आणि त्यांच्या राजदला त्यांची जागा दाखवली आहे.
कोणताही भ्रष्टाचारी नेता वा गुन्हेगार आपला भ्रष्टाचार वा गुन्हा कधीच कबूल करत नाही. चारा घोटाळ्यात शिक्षा झाल्यावरसुद्धा लालूप्रसाद यादव निर्दोष असल्याचा, सीबीआयने मला फसवल्याचा आरोप करतात, यापेक्षा दुसरे काही हास्यास्पद असूच शकत नाही. चारा घोटाळ्याची मला काहीच माहिती नव्हती, मला कोणी याबद्दल सांगितलेही नाही, त्यामुळे मी पैसे घेण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, त्यामुळे मी गुन्हेगार कसा ठरतो, असे लालूप्रसाद म्हणतात तेव्हा हसावे की रडावे ते समजत नाही.
आपल्या बापाच्या पावलावर पाऊल टाकत तेजस्वी यादवही आपण निर्दोष असल्याचा दावा करत आहे. तेजस्वी यादव जर निर्दोष आहेत, त्यांनी काहीच केले नाही तर मग ते नितीशकुमार म्हणतात, त्याप्रमाणे वस्तुनिष्ठ खुलासा का करत नाही. या खुलाशाने ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ होऊन जाईल. पण, तेजस्वी यादव असा खुलासा करायला तयार नाही, त्यामुळे ‘दाल में कुछ काला है’ असा संशय यायला पूर्ण जागा आहे. त्यामुळेच तेजस्वी यादव आणि त्यांचे समर्थक आता गुंडागर्दीवर उतरले आहेत. ज्या वेळी मुद्दे नसतात, त्या वेळी माणसाला गुद्यांचा आधार घ्यावा लागतो. पण, यामुळे तो स्वत:ला निर्दोष सिद्ध करू शकत नाही. उलट बुडत्याचा पाय डोहाकडे अशी त्याची स्थिती होते.
लालूप्रसाद यादव, त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांच्यात कोणत्याही प्रकारची नैतिकता नसली तरी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यात नैतिकता आहे. १९९९ मध्ये रेल्वेमंत्री असताना गैसल येथे झालेल्या रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी घेत नितीशकुमार यांनी राजीनामा दिला होता.
२००५ मध्ये नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. नितीशकुमार यांच्यासोबत पुढे अल्पकाळासाठी मुख्यमंत्री झालेल्या जितनराम मांझी यांनीही शपथ घेतली होती. मांझी यांच्यावर काही घोटाळ्याचे आरोप असल्याचे उघड होताच शपथविधीनंतर काही तासातच मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जितनराम मांझी यांना मंत्रिमंडळातून काढले होते. २०११ मध्ये वॉरंट जारी झाल्यानंतरही न्यायालयात उपस्थित न राहिल्यामुळे नितीशकुमार यांनी सहकारमंत्री रामाधारसिंह यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली होती. एका जुन्या प्रकरणाची चर्चा झाल्यामुळे परिवहनमंत्री असलेल्या आर.एन. सिंह यांनाही नितीशकुमार यांनी काढले होते. त्यामुळे नितीशकुमार तेजस्वी यादव यांना फार काळ आपल्या मंत्रिमंडळात कायम ठेवण्याची शक्यता फार कमी आहे.
मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची वेळ आपल्यावर येण्यापेक्षा उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राजीनामा देत पदाची आणि आपली स्वत:चीही लाज राखावी, अशी भूमिका नितीशकुमार घेऊ शकतात. मुळात लाज आणि लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबाचा दूरदूरचाही संबंध नाही. त्यामुळे तेजस्वी यादव राजीनामा द्यायला तयार नसतील, तर नितीशकुमार यांच्यासमोर त्यांची हकालपट्टी करण्याशिवाय पर्याय राहत नाही. अशा स्थितीत बिहारचे राजकीय वातावरण तापल्याशिवाय राहणार नाही. कारण तेजस्वी यादव यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाली तर राजद सरकारचा पाठिंबा काढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अशा वेळी कॉंग्रेस राजदला पाठिंबा देऊ शकतो. त्यामुळे नितीशकुमार यांचे सरकार अल्पमतात येऊ शकते.
लालूप्रसाद यादव आणि त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर येऊन गुंडागर्दी आणि जाळपोळ करत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित करू शकतात. पण, याला नितीशकुमार भीक घालतील असे वाटत नाही. वेळप्रसंगी आम्ही बलिदान करू, पण भ्रष्टाचाराच्या मुद्यावर कोणतीही तडजोड करणार नाही, असे जदयुने स्पष्ट केले आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्यावर मग ती कोणावरही असो कारवाई केली तर मुख्यमंत्री नितीशकुमार यांची प्रतिमा तर उजळू शकते, पण जनमानसातील त्यांची विश्‍वसनीयताही वाढू शकते.
बिहार प्रदेश भाजपा अध्यक्ष नित्यानंद राय यांनी नितीशकुमार सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे या काळात राजद कोणती भूमिका घेतो, त्यावर बिहारमधील राजकारणाचे वळण अवलंबून आहे. तेजस्वी यादव यांनी राजीनामा देत समजूतदारपणाची भूमिका घेतली तर बिहारमधील महाआघाडीचे सरकार वाचू शकते आणि तेजस्वी यादव यांनी आडमुठी भूमिका घेत राजीनामा देण्यास नकार दिला आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यांची हकालपट्टी केली तर महाआघाडीचे सरकार अडचणीत येऊ शकते. येत्या चार दिवसांत काय घडते, याकडे बिहारचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.
– श्यामकांत जहागीरदार
९८८१७१७८१७