कशासाठी हा विनोद?

0
117

अग्रलेख
‘‘एक वेळ मोदींमध्ये हिटलर संचारला तरी चालेल, पण त्यांनी हाती तलवार घेऊन दहशतवादाचे निर्दालन केलेच पाहिजे…’’ हो! दस्तुरखुद्द ‘साहेब’ म्हणालेत असं! खुद्द बाळासाहेबांचा वारसा चालविणार्‍या साहेबांचे वचन म्हणजे त्रिलोकातील त्रिकालाबाधित सत्य. त्याची अंमलबजावणी न झाली तरच नवल! काय पण तो करारी बाणा अन् कसला म्हणून तो त्वेष. दहशतवाद्याचीही पुरती दाणादाण उडाली असणार परवा त्यांचे ते विधान ऐकून. या देशात गेली निदान चार दशकं दहशतवाद आपले अस्तित्व राखून आहे. पण, त्याच्याशी लढण्याची जी घाई साहेबांना आता झालेली दिसतेय् ना, ती यापूर्वी कधी म्हणून कधी बघायला मिळाली नव्हती. विशेषत:, देशातल्या यंदाच्या सत्ताबदलानंतर साहेबांच्या अंगात संचारलेला जोश… वा. व्वा! काय वर्णन करावे त्याचे. अगदी विरोधकांवर तुटून पडावे एवढ्या त्वेषाने ते मोदींच्या सरकारवर वार करून जाताहेत. हं. हं. असं हसण्यावारी नेऊ नका त्यांचं म्हणणं. अरे, केवढी कसरत करावी लागत असेल त्यांना असं करताना. सोपं आहे का, आपणच सहभागी असलेल्या सरकारविरुद्ध रान पेटवणं? एकीकडे सरकारमध्ये सहभागी व्हायचं, त्याचे सारे लाभ उचलायचे, त्याच्या यशातही सहभागी व्हायचं. पण, जरा कुठे काही विपरीत घडलं की मग कशाचाही मुलाहिजा न बाळगता, नेतृत्व करणार्‍या माणसाच्या डोक्यावर खापर फोडून मोकळं व्हायचं. आपला त्याच्याशी काडीचाही संबंध नसल्याच्या थाटात शिव्याशाप द्यायच्या. खरंच! साहेब, कमाल आहे बरं तुमची! देशात सर्वदूर, केवळ नावालाच शिल्लक राहिलेल्या विरोधी पक्षालाही जे जमलं नाही ना, ते सत्तेत राहूनही अगदी सराईतपणे करताहात तुम्ही. लोकांना वाटतं, हाच खरा मर्द गडी! सत्तेत असूनही सरकारविरुद्ध बोलायला जराही घाबरत नाही. छाती ठोकून नेत्यांविरुद्ध बोलतो. प्रसंगी त्यांना दम देतो. पण सत्ता मात्र सोडत नाही, ही बाब अलहिदा! तर साहेब, सांगायचा मुद्दा असा की, स्वत: सहभागी असलेल्या सरकारविरुद्ध बरळण्याचा एव्हाना तुम्हाला चांगलाच सराव झाला असणार. त्यामुळे अलीकडे तर तुमच्या बोलण्याची धारही तीव्र होऊ लागली आहे. अगदी तलवारीच्या चकाकत्या पातीसारखी! करारी बाण्याची ती नौटंकीही छानच साधली आहे बघा तुम्हाला. अहो, प्रत्यक्षात नसला म्हणून काय झालं, बाळासाहेबांचं नुसतं नाव घेतलं तरी आवेश संचारतो शिवसैनिकांत. तुम्ही तर त्यांचे खरेखुरे वारसदार आहात. त्यांच्या नावाने तुम्हाला स्फुरण चढणे तर स्वाभाविकच. अजून किती दिवस त्यांचं नाव घेऊन राजकारण कराल, असा बोचरा प्रश्‍न विचारतात काही लोक, पण आपण कशाला लक्ष द्यायचं त्यांच्याकडे? असल्या गैरसोयीच्या प्रश्‍नांची उत्तरं थोडीच द्यायची असतात, एवढं का कळत नाही तुम्हाला? पण काही नतद्रष्टे लोक उगाच चिमटे काढतात. म्हणतात, एवढाच विरोध आहे तर मग सरकारमधून बाहेर का पडत नाही. आता त्यांना कोण सांगणार की, ही सगळी नौटंकी राजकीय असते. राजकारणात राहायचं तर करावी लागतात असली नाटकं. कित्येकदा आवाक्याबहेर चाललेल्या स्वकीयांना सांभाळण्यासाठीही करायची असते असली बेताल बडबड. द्यावे लागतात इशारे. पण आपले पंतप्रधान फार समजदार. त्यांना चांगलीच कळते बरं का तुमची अडचण! त्यामुळे, तुम्ही एवढे बरळलात तरी कधी म्हणून चकार शब्द काढत नाहीत ते. उलट मित्रपक्षांच्या बैठकीत तेवढ्याच सन्मानाने भोजनाचे निमंत्रण असते तुम्हाला. पण तुम्ही पडलात स्वाभिमानी. त्या सन्मानापोटी काय, देशहित पणाला लावायचं? छे! मग तिथनं बाहेर पडलं की लागलीच पुन्हा एकदा तो करारी बाणा जागा होतो. हसरा चेहरा पुन्हा गंभीर होतो. सरकारवर वार करायला पुन्हा सज्ज होता तुम्ही. काय पण मस्त अभिनय करता साहेब तुम्ही. व्वा! दिल खुश होतो बघा एकदम. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर बोलताना सरकारला काय हाणायचे तुम्ही. व्वा! बहोतखुब! आता, काश्मीरच्या मुद्यावरच बघाना. केवढे संतापलात तुम्ही परवा. मग काय? अमरनाथला जाणार्‍या यात्रेकरूंवर दहशतवादी हल्ला झालाय् म्हटल्यावर राग नाही का येणार तुम्हाला? हे खरे आहे की, या हल्ल्यामुळे सारा देश संतापला आहे. पेटून उठला आहे. हल्लेखोरांना बखुटं धरून, चौकात उभं करून गोळ्यांनी उडवलं पाहिजे, अशी भावनाही सर्वांचीच आहे. खरं तर, गेल्या काही दिवसांत काश्मिरातील समस्या केंद्र सरकार वेगळ्या पद्धतीने हाताळत आहे. पण करणार काय, तिथली परिस्थितीच विपरीत आहे. राज्य सरकार अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्‍न पडावा असं चित्र आहे. भारतात राहूनही, हातातली घड्याळं पाकिस्तानच्या वेळेशी जुळवून वावरणार्‍यांच्या गर्दीतून दहशतवादी हुडकून काढायचे आहेत. हो! हेच वास्तव आहे. त्यामुळे राजकारण आणि धर्माच्या पलीकडे विचार करूनच ही समस्या हाताळण्याची गरज आहे. हे आव्हान पेलणे फार सोपे आहे, असं वाटणं वेगळं आणि प्रत्यक्षात ते पेलताना, ज्याचा सामना करावा लागतो, ती वस्तुस्थिती वेगळी. पण एवढ्या उच्च पातळीवर सरकारची बाजू समजून घ्यायला तुम्ही कुठे सरकारचा भाग आहात? बाळासाहेबांच्या घरातला जन्म आणि (केवळ त्यामुळेच लाभलेले) एका राजकीय पक्षाचे प्रमुखपद, यामुळे इतरांच्या तुलनेत तुमची राष्ट्रभक्ती नाही म्हणायला काकणभर सरसच असणार! त्यामुळे झाल्या घटनेच्या, तुम्हाला आलेल्या रागाची तीव्रता इतरांपेक्षा अधिक असणंही ओघानंच आलं. काल ते सार्‍या देशानं अनुभवलं. बापरे! कसला तो राग. मानलं बुवा तुम्हाला. वाटलं, बस्स! आत्ताच्या आत्ता तरातरा सरकारमधून बाहेर पडणार आणि दहशतवाद्यांना ठिकाणावर लावूनच दम घेणार तुम्ही! सारा देश चमत्कारिक नजरेनं नुसता बघत राहिला होता तुमच्याकडे. तुमचं पुढचं पाऊल काय असेल हे बघायला. तर काय, पुन्हा एकदा लोकरंजनाचा तोच ‘घिसापीटा’ कार्यक्रम. एव्हाना सरावातून सिद्ध झालेली, सरकारला शिव्या घालण्याची तीच रटाळ परिपाठी. पण एक मात्र खरं हं साहेब! हसायला येत असलं ना तरी उसने आणलेले तुमचे ते अवसान, प्रत्यक्षात नसतानाही जो असल्याचे दाखवण्यासाठी आपण धडपडता, तो करारी बाणा, बघण्याची मजा काही वेगळीच बघा! खरं तर तुम्ही पण सरकारचाच एक भाग आहात (असं काही लोक अजूनही मानतात!) त्यामुळे दहशतवाद्यांशी लढण्याची जबाबदारी मोदींएवढीच तुमचीही आहेच की! पण तुमचं धोरण बघता, जबाबदारीशी तुम्हाला काही घेणंदेणं असल्याचं दिसत नाही कुठे. जबाबदारी बासनात गुंडाळून, आपणही सरकारमध्ये आहोत ही बाब जाणीवपूर्वक विसरून, संतापाचा जो तमाशा आपण मांडता ना… तो तर एकदम लाजवाब! व्वा. क्या बात है! म्हणजे कसं बघा, मंत्रिपद, सरकारी बंगले, त्या आडून मिळणारे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदे, सारं काही शिवसेनेनंही लाटायचं. पण, शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवण्याची जबाबदारी मात्र एकट्या फडणवीसांची! दहशवाद्यांशी दोन हात करायचे ते मोदींनी! अन् तुम्ही? आपल्याच सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरणार? सत्तेतल्या नेत्यांना शिव्यांची लाखोली वाहणार? स्वत:ची जबाबदारी कीक मारून उडवण्याची ही तर्‍हा एकदम खासच आहे बघा साहेब तुमची! अगदी त्या पवारांनाही लाजविणारी. राहिला प्रश्‍न मोदींनी हिटलरी बाणा अंगीकारून दहशतवाद्यांना चारीमुंड्या चीत करावे, या तुमच्या अपेक्षेचा, तर त्यावरून, दहशतवाद्यांच्या जागतिक पातळीवर दिवसागणिक विस्तारत चाललेल्या समस्येचा गाढा अभ्यास आपण केला असल्याचेच निष्पन्न होते! त्यामुळे तो निपटण्याची आपण सुचविलेली तर्‍हाही एकदम लाजवाब! साहेब, यासाठी तर आपल्याला साष्टांग दंडवतच घातला पाहिजे… सत्ता हातून जाऊ न देता, आपल्याच सरकारला विरोधकांप्रमाणे झोडपून काढण्याची, त्यांना शिव्याशाप देण्याची रीत आपण भविष्यातही अशीच कायम ठेवावी ही तमाम देशवासीयांच्या वतीने आपल्याला मन:पूर्वक विनंती. हो! मनोरंजनाचे हे साधन आमच्यापासून हिरावून घेऊ नये, अशी आग्रही मागणी आहे त्यांची…!