नोकरांसाठी घेतला २६५ कोटींचा बंगला

0
251

न्यूयॉर्क, १२ जुलै 
कतारच्या शाही परिवाराने नोकरांसाठी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये पाच मजली बंगला खरेदी केला आहे. या बंगल्याची किंमत अंदाजे ४१ मिलियन डॉलर म्हणजेच २६५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या पाच मजली बंगल्यात त्यांचे विश्‍वासू नोकर राहणार आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार कतारच्या शाही परिवारने हा बंगला रियल स्टेट मर्चंट बँक आयलॅण्ड कॅपिटल ग्रुपचे संस्थापक अरबपती ऍण्ड्ऱ्यूफार्क्ससे यांच्याकडून खरेदी केला आहे. हा पाच मजली बंगला सर्व सोई सुविधायुक्त आहे. यामध्ये मोठमोठे डायनिंग हॉल, बार, क्लब, लाइब्ररी, जिम, मसाज आणि प्लेरूमसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. न्यूयॉर्क शहरामध्ये मॅनहटन येथे कतारच्या शाही परिवाराने हा बंगला घेतला आहे.
शाही परिवाराची न्यूयॉर्कमधील ही तिसरी संपत्ती आहे. गेल्या वर्षी २०१६ मध्ये १०,४०० चौरस फूटमध्ये असलेल्या या बंगल्याची किंमत २७५ कोटी रुपये होती. २००७ मध्ये ऍण्ड्ऱ्यू यांनी १५० कोटी रुपयांचा हा बंगला खरेदी केला होता. हा टुमदार आणि आलिशान बंगला खरेदी करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, मात्र कतारच्या शाही परिवारापुढे कोणाचाही निभाव लागला नाही. त्यांनी २६५ कोटी रुपये मोजून हा बंगला खरेदी केला. कतारच्या शाही परिवाराने हा बंगला सरळ खरेदी केला. यामध्ये कोणत्याही ब्रोकरने हस्तक्षेप केला नाही.
खरेदी केलेल्या या बंगल्याजवळील आणखी दोन घरेही त्यांचीच आहेत. २००२ मध्ये कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी १८० कोटींमध्ये त्यांनी यांची खरेदी केली होती. (वृत्तसंस्था)