भारत-चीन तणाव मावळणार

0
280

विदेश सचिव जयशंकर यांना आशा
सिंगापूर, १२ जुलै 
भारत आणि चीन सीमेवरील तणाव मावळणार अशी मला आशा वाटते. याआधीही अशा घटना घडलेल्या आहेत आणि आताही ही समस्या न सुटण्यासाठी कुठलेही कारण नाही, असे प्रतिपादन भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी केले आहे. जयशंकर यांच्या मते, दोन्ही देशांत खूप मोठी सीमा आहे. सीमा निश्‍चितीवरून असहमती आहे. त्यामुळेच वेळोवेळी वाद झाले आहेत. येथे एका शाळेत व्याख्यान देताना जयशंकर यांनी हे मत व्यक्त केले. जयशंकर म्हणाले की, दोन मोठे देश जेव्हा शेजारी-शेजारी असतात आणि विकास करत असतात, तेव्हा त्यांचा इतिहास आव्हाने निर्माण करतो. दोन्ही देशांची प्रगती होत असल्याने कोणते धोके आहेत हा चर्चेचा विषय आहे. फक्त एका देशाची बाजू समजून घेतली तर मूळ मुद्यापासून दूर जाऊ शकतो.
सेंटर फॉर चायना ऍनालिसिसचे जयदेव रानडे यांच्या मते, भूतानमध्ये रस्ते बांधणीसाठी चीन जेव्हा १ जूनला समोर आला होता, तेव्हा भारत एवढ्या कठोर पद्धतीने विरोध करेल, असा विचारही त्याने केला नव्हता. भारत भूतानला संरक्षण क्षेत्रात सहकार्य करतो. याउलट चीन आणि भूतान यांच्यात राजनैतिक संबंधच नाहीत. अमेरिकेतील तज्ज्ञ अलीसा एयर्स यांच्या मते, भारत-चीन यांच्यातील तणाव म्हणजे चीनचे वर्चस्व कमी करण्याच्या धोरणाचा भाग असू शकतो. चीन नेहमीच लहान-लहान बदल करून मोठी उद्दिष्टे साध्य करतो. संशोधक प्रा. डॅनियर मार्क यांच्या मते, भारत आणि चीन अनेक दशकांपासून अशा तणावांवर मात करत आहेत आणि ते या वेळीही हिंसाचार न करता हा मुद्दाही सोडवतील. तज्ज्ञांच्या मते, भारताची स्थिती सध्या अत्यंत चांगली आहे आणि भारत चीनसमोर झुकणार नाही.   हिवाळ्यापर्यंत सुरू राहण्याची शक्यता
नवी दिल्ली : सिक्कीम सीमेवर भारत, चीन आणि भूतान या तिहेरी जंक्शनवर चीनशी सुरू असलेला वाद हिवाळ्यापर्यंत सुरू राहू शकतो. भारत आपल्या जागेवरून हलण्याच्या स्थितीत नाही, असे चित्र आहे. भारताच्या मते, २००५ च्या करारानुसार, दोन्ही देश सीमेवर आपल्या स्थितीत बदल करू शकत नाहीत. त्याचबरोबर चीन आणि भूतानलाही १९९८ च्या करारानुसार सीमावाद सुटेपर्यंत ‘जैसे थे’ स्थितीत राहण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही (वृत्तसंस्था)