कारागृह अधिकार्‍याला दोन कोटींची लाच; शशिकलावर आरोप

0
94

बंगळुरू, १३ जुलै 
बेहिशेबी संपत्तीप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या अण्णाद्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांना कारागृहात व्हीव्हीआयपी वागणूक मिळत असल्याचे समोर आले आहे. कारागृहाच्या उपमहानिरीक्षक डी. रूपा यांनी अधिकारी कारागृहात बेकायदेशीर गोष्टी करण्यास परवानगी देत असल्याचा आरोप केला आहे. त्यांना विशेष वागणूक मिळण्यासाठी कारागृह अधिकार्‍याला दोन कोटींची लाच दिल्याचा आरोपही डी. रूपा यांनी पोलिस महासंचालक आर. के. दत्ता तसेच कारागृह पोलिस महासंचालक सत्यनारायण राव यांना पत्र लिहून हा खुलासा केला आहे.
शशिकला यांना स्वयंपाकासाठी स्वतंत्र रुम देण्यात आली आहे. तसंच स्टॅम्प पेप घोटाळ्यातील आरोपी अब्दुल करीम तेलगी यालादेखील विशेष सुविधा मिळत असल्याचे डी. रूपा यांनी पत्रातून सांगितले आहे. ‘कारागृहात नियमांचे होणारे उल्लंंघन तुमच्या निदर्शनास आणून देत आहे. इतकंच नाही या सर्वांसाठी दोन कोटींचा लाच दिल्याचेही सांगितले जात आहे. कृपया तुम्ही तात्काळ कारवाई करत, नियम मोडणार्‍यांना शिक्षा करावी’, अशी विनंती रूपा यांनी पत्रातून केली आहे.
याशिवाय रूपा यांनी अन्य गंभीर आरोपही केले आहेत. १० जुलै रोजी कारागृहातील २५ जणांची मादक द्रव्य चाचणी करण्यात आली होती. यावेळी १८ जणांनी मादक द्रव्य घेतल्याचे निष्पन्न झाले होते. रूपा यांनी त्या सर्वांची यादीच पत्रात लिहिली आहे.
‘कारागृहात कोणालाही व्हीआयपी वागणूक दिली जात नाही. जर डीआयजींना काही चुकीचे होताना आढळले होते तर सर्वात आधी त्यांनी ते माझ्या निदर्शनास आणून द्यायला हवे होते. अशाप्रकारे प्रसामाध्यमांकडे जाण्याची गरज नाही. मला अद्यापही त्यांचे पत्र मिळालेले नाही’, असे कारागृह पोलिस महासंचालक सत्यनारायण राव यांनी सांगितले आहे. याआधीही शशिकलांना कारागृहात व्हीव्हीआयपी वागणूक मिळत असल्याचे समोर आले होते.