उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार; भाजपामध्ये जोरदार हालचाली

0
220

नवी दिल्ली, १३ जुलै
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ येत असल्यामुळे रालोआचा उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार ठरवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. उपराष्ट्रपतिपदासाठी ५ ऑगस्टला निवडणूक होणार आहे.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी रालोआने रामनाथ कोविंद यांची उमेदवारी जाहीर करत विरोधी पक्षांवर आघाडी घेतली होती. त्याचा बदला विरोधी पक्षांनी उपराष्ट्रपतिपदासाठी गोपाळकृष्ण गांधी यांची उमेदवारी पहिले जाहीर करून घेतला आहे. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने आपला उमेदवार अद्याप जाहीर केला नाही. येत्या एकदोन दिवसात रालोआचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे.
उमेदवार ठरवण्याच्या दृष्टीने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज रा. स्व. संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. राजधानीतील झेंडेवाला संघ कार्यालयात झालेल्या या भेटीच्या वेळी सहसरकार्यवाह कृष्णगोपाल उपस्थित होते. यावेळी काही उमेदवारांच्या नावावर चर्चा झाल्याचे समजते. मात्र कोणाच्या नावावर चर्चा झाली, त्याचा तपशील मिळू शकला नाही.
भाजपा सांसदीय मंडळाच्या येत्या एकदोन दिवसात होणार्‍या बैठकीत रालोआच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतिपदासाठी भाजपाने उत्तर भारतातील उमेदवार दिल्यामुळे उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपा दक्षिण भारतातील उमेदवार देण्याची शक्यता आहे. ईशान्य भारतातील उमेदवारालाही उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीची लॉटरी लागू शकते. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत आपला उमेदवार जाहीर करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धक्कातंत्राचा अवलंब केल्यामुळे यावेळी भाजपात उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतील संभाव्य उमेदवारांच्या नावाची चर्चाही अतिशय दबक्या आवाजात सुरू आहे. कोणीच या विषयावर बोलायला तयार नाही.  (तभा वृत्तसेवा)