चीनला लक्ष्य करणार्‍या अण्वस्त्राची निर्मिती

0
146

कुरापतखोरांची खुमखुमी जिरवण्याची तयारी•

सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कराला सर्वाधिकार•

बंदोबस्तासाठी मोदी सरकारने उचलली ठोस पावले

नवी दिल्ली, १३ जुलै 

भारताच्या सीमेवरील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पाकिस्तान आणि चीनच्या कुरापतींना प्रत्युत्तर देण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने राजनयिक प्रयत्नांसोबतच सैन्यशक्ती वाढवण्यावर जोर दिला आहे. चीनच्या कोणत्याही भागावर निशाणा साधणार्‍या अण्वस्त्रांच्या निर्मिती तसेच या कुरापतखोर शेजारी देशांना प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कराला सर्वाधिकार बहालीसारख्या उपायांचा यात समावेश आहे.२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत दोन-तृतियांश बहुमताने जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाची धुरा मोदींच्या खांद्यावर आली. पंतप्रधानपदाची सूत्रे सांभाळताच मोदींनी आधी बौद्धधर्मीय देशांना भारताशी जोडण्याचे काम केले. यानंतर त्यांनी जगभरातील अनेक देशांना भेटी देऊन दहशतवादाला खतपाणी घालणार्‍या पाकिस्तानची राजकीय कोंडी केली. त्यामुळे चिडलेला पाक दररोज सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत आहे. शिवाय चीनला हाताशी धरून भारताला खिजवण्याचा प्रकार पाक करीत आहे. या दोन्ही देशांची खुमखुमी मुरवण्यासाठी मोदी सरकारने स्थायी सामरिक उपाय योजण्यास सुरुवात केली आहे. त्या अनुषंगानेच काही दिवसांपूर्वी लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी भारतीय सैन्य एकाचवेळी चीन व पाकिस्तान या दोन बाह्य त्याचसोबत इतर अंतर्गत अशा विविध आघाड्यांवर लढायला समर्थ असल्याचे विधान केले होते. सिक्कीमच्या सीमेवर गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनचे सैनिक आमने-सामने आले आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानकडून वारंवार होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि घुसखोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पृष्ठभूमीवर केंद्र सरकारने लष्कराच्या अधिकारांमध्ये वाढ केली आहे.यात भारतीय सैन्याला अधिक शक्तिशाली करण्यासाठी केंद्र सरकारने शस्त्रसाठा विकत घेण्याचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार लष्कराला दिले आहेत. आवश्यक शस्त्रसाठा लष्कराला त्वरित खरेदी करता यावा आणि सैन्य दल शत्रूशी लढण्यासाठी नेहमी सुसज्ज असावे, असा यामागचा उद्देश आहे. यापूर्वी केंद्र सरकारने तिन्ही दलांना दारूगोळा आणि इतर आवश्यक उपकरणांच्या तत्काळ खरेदीला मंजुरी दिली होती. गतवर्षी सप्टेंबरमध्ये सैन्याच्या तळांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शस्त्र खरेदीच्या मंजुरीचाही निर्णय घेण्यात आला होता. या हल्ल्यानंतर सरकारने रशिया, इस्रायल आणि फ्रान्ससोबत तब्बल २० हजार कोटी रुपयांचा शस्त्रास्त्रे खरेदीचा करार केला आहे.दरम्यान, चीन आणि पाकिस्तान यांच्यावर वचक ठेवण्यासाठी भारताचे हे प्रयत्न सुरू असल्याचे अमेरिकन तज्ज्ञांनी म्हटले आहे. त्यासाठी भारत आपल्या अण्वस्त्रांना अत्याधिक आधुनिक करत आहे. भारत अशा अण्वस्त्रांची निर्मिती करत आहे, ज्यामुळे चीनच्या कोणत्याही भागात क्षणात मारा करता येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. भारताकडे अणुबॉम्ब निर्मितीसाठी लागणारे ६०० किलो प्लुटोनियम असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. एका वृत्तानुसार, भारत २०० अण्वस्त्रे तयार करू शकतो. अमेरिकेतील दोन तज्ज्ञांनी ‘न्यूक्लियर फोर्सेस-२०१७’ हा लेख लिहिला आहे. या लेखाचे लेखक हेंन्स एम ख्रश्टेंसन आणि रॉबर्ट एस नॉरिस आहे. या लेखात म्हटले आहे की, भारताकडे १५०-२०० वॉरहेड्स तयार करण्या इतपत प्लुटोनियम उपलब्ध आहे. मात्र भारत १२० ते १३० एवढेच वॉरहेड्स तयार करेल. अमेरिकन जर्नल ‘आफ्टर मिडनाइट’च्या जुलै-ऑगस्टच्या अंकात हा लेख प्रकाशित झाला आहे. भारत अशा अण्वस्त्राची निर्मिती करत आहे जे चीनच्या कोणत्याही भागाला लक्ष्य करू शकेल. भारताच्या या अण्वस्त्रसज्जतेचा उद्देश त्याचे पारंपरिक विरोधी चीन आणि पाकिस्तान यांच्यावर वचक ठेवण्याचा असल्याचेही लेखात म्हटले आहे.दिवसेंदिवस भारतीय लष्कराची ताकद सातत्याने वाढत असली, तरी पूर्व आणि पश्‍चिम सीमेवर भारताला पाकिस्तान व चीनकडून असणारा धोकाही वाढत आहे. याशिवाय, नक्षलवाद आणि अंतर्गत दहशतवाद या समस्यांशीही भारताला झुंजावे लागते आहे. मात्र, आजच्या घडीला खरेच युद्ध झाल्यास भारतीय लष्कर कितपत सक्षम आहे याचेही विश्‍लेषण करण्यात आले आहे.           (वृत्तसंस्था)

अशी ही सैन्यशक्ती

ग्लोबल फायर पॉवर या संस्थेच्या माहितीनुसार, सध्याच्या घडीला भारतीय लष्करात कार्यरत आणि राखीव दले मिळून ४२ लाख ७ हजार २५० जवान आहेत. लष्कराच्या भूदल, नौदल आणि वायूदल अशा तीन विभागांमध्ये या सैन्याची विभागणी झाली आहे. या तिन्ही विभागांना लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आणि अन्य युद्धसामग्रीही विभागून देण्यात आली आहे.वायुदल : युद्धाचा काळ वगळता एखादा पेचप्रसंग सोडवण्यासाठी, गुप्त माहिती गोळा करण्यासाठी, शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी किंवा एखादी विशेष मोहीम राबवण्यात वायुदलाची भूमिका ही नेहमीच महत्त्वाची असते. भारतीय वायुदलाच्या ताफ्यात सध्या शत्रूवर हल्ला करणारी, लढाऊ, बॉम्बहल्ला, वाहतुकीची विमाने आणि लढाऊ हेलिकॉप्टर्स अशा आयुधांचा समावेश आहे. याशिवाय, राफेलसारखी अनेक क्षमता असणारी लढाऊ विमानेही भारतीय वायुदलाच्या ताफ्यात आहेत. अशी ही सैन्यशक्ती नौदल : भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. युद्धनौका, पाणबुड्या, आण्विक पाणबुड्या, विमानवाहू युद्धनौका, विनाशिका, कार्वेट अशा सामरिक आयुधांनी भारतीय नौदल सुसज्ज आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील १९७१ साली झालेल्या युद्धात भारतीय नौदलाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. याशिवाय, हिंदी महासागर, अरबी महासागर, बंगालचा उपसागर आणि दक्षिण चीन समुद्रात भारताचे वर्चस्व राखण्याच्यादृष्टीने नौदलाची भूमिका महत्त्वाची आहे.भूदल : भूदल हा भारतीय लष्कराचा कणा आहे. भारतीय सीमांचे रक्षण करण्यात आणि दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्याचे महत्त्वपूर्ण काम भूदलाकडून केले जाते. गेल्या काही काळातील भूदलाची कामगिरी पाहता सध्याच्या घडीला भारतीय भूदलाची जगातील वैविध्यपूर्ण सैन्यदलात गणना होते. भूदलातील सैन्याची ३५ डिव्हिजन व १३ कॉर्प्समध्ये विभागणी करण्यात आली आहे. भारतीय भूदल हे जगातील तिसरे सर्वाधिक मोठे लष्कर आहे.आण्विक क्षमता : आर्म्स कंट्रोल असोसिएशनच्या (एसिए) माहितीनुसार, भारताकडे सध्याच्या घडीला १३० आण्विक शस्त्रे आहेत. एसिएच्या जुलै २०१७ पासूनच्या आकडेवारीनुसार आण्विक शस्त्र साठ्याबाबत जगामध्ये भारताचा सातवा क्रमांक लागतो. भारताकडे अणवस्त्रांचा मारा करण्यासाठी क्षेपणास्त्रे, युद्धनौका आणि पाणबुड्या असे विविध पर्याय आहेत. आज सर्वपक्षीय बैठकसिक्कीमवरून भारत-चीनमध्ये पेटलेला वाद आणि जम्मू काश्मिरातील परिस्थितीवर उद्या, शुक्रवारी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सीमेवरील तणावाच्या पृष्ठभूमीवर चीनकडून वारंवार धमक्या मिळत आहेत. काश्मीर खोर्‍यात दगडफेकीच्या घटना सतत सुरू आहेत. राज्यात अलीकडेच अनेक दहशतवादी हल्ले झाले आणि पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. या मुद्यांवर विरोधी पक्षांसोबत चर्चा करण्यासाठी मोदी सरकारने उद्या, शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यात गृहमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज हे सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा करतील. या दोन्ही मुद्यांवर केंद्र सरकारने काय भूमिका घेतली आहे, याबाबत हे मंत्री माहिती देतील. येत्या सोमवारपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह काही नेत्यांनी चीन आणि भूतानच्या राजदूतांची भेट घेतली होती.