अग्रलेख

0
143

यथार्थ मोदी!

एखाद्या व्यक्तिमत्त्वाचे कालातित्व हे त्याचा कार्यकाळ संपल्यावरच अधोरेखित होत असते. त्याच्या समकालीन वास्तवाला आणि त्या काळातील आक्षेपक, समीक्षक आणि समर्थकांनाही त्याचे अलौकिकत्व पूर्णपणे आकळतेच असे नाही. त्यामुळे कालपुरुषांना त्यांच्या त्या तसे असण्याचा गौरव त्यांच्या हयातीत मिळतच नाही. आशीर्वाद देणारे हातही थिटे पडत असतात. भारताचे पंतप्रधान मोदी हे सर्वच अशा वास्तवाचे अपवाद आहेत. हे वास्तव परवा दस्तुरखुद्द सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनीच अखारेखित केले! प्रसंग मोदींवरच्या कॉफी टेबल बुकच्या प्रकाशनाचा होता. त्यामुळे मग उपस्थित सर्वच वक्त्यांना मोदींचे गुणगाण करणे क्रमप्राप्त होते. मात्र, सरसंघचालकांचे आजच्या भारतातील स्थान पदातीत आहे. त्यामुळे त्यांना समारंभाच्या आयोजनाच्या चौकटीत व्यक्त होण्याच्या मर्यादा अजीबातच नाहीत. परवा त्यांनी समकालीन वास्तव, राष्ट्राची गरज आणि मोदींचे नेतृत्व यांचा परामर्श घेताना, मोदी हे अशक्य ते शक्य करून दाखविणारे नेतृत्व आहे, असे विधान केले. त्याला संदर्भासह स्पष्टीकरणाची खरेतर गरज नाही. त्यासाठी मोदी हे देशाच्या सर्वोच्च सत्तास्थानावर आहेत, म्हणून त्यांना सर्वच शक्य आहे, हा युक्तिवाद केला जाऊ शकतो. मात्र, ते गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही त्यांनी जे काय करून दाखविले ते त्यावेळच्या देशाच्या सर्वोच्च नेतृत्वालाही करता आलेले नव्हते. राजकारणाच्या दलदलीत स्वत: निष्कलंक राहून आपल्या सहकारी, मदतगार आणि सत्ताकेंद्राच्या भोवती निर्माण होणारे खुशमस्करे यांनाही स्वच्छ ठेवणे फार म्हणजे फारच कठीण असते. मुख्यमंत्रिपद दीर्घकाळ राखत असे निर्मळ असणे, ही तर दैवदुर्लभ बाब आहे आणि मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून जी काय कामे केली त्याहीपलीकडचे हे कर्तृत्व आहे. सरसंघचालकांनी मोदींना केवळ या सत्तेच्या पदांवरच बघितले आहे, असेही नाही. संघाचे स्वयंसेवक, पूर्णवेळ स्वयंसेवक सहकारी म्हणूनही त्यांनी मोदींना पाहिले, जोखले आहे. त्या दीर्घ अधिकारी अनुभवातून हे वक्तव्य आलेले आहे. देशाच्या पंतप्रधानपदावरील मोदींबद्दलचेच हे वक्तव्य नाही. लोकांची कामे करतात म्हणून ते पंतप्रधान आहेत, असे नाही. ते सतत देश आणि देशातील जनतेच्या भल्याचाच विचार करत आले आहेत म्हणून आज ते या स्थानी आहेत. केंद्रस्थानी सत्तेत आल्यापासून त्यांनी निरपेक्षपणे साक्षेपी काम केले आहे. उजव्या विचारसरणीचे, भगव्या नजरेचे अशी संभावना करणार्‍या विरोधकांनाही हे कळते की, देशासाठी जे करणे आवश्यक होते तेही मोदींनी करून दाखविले आहे. मोदींनी आर्थिक प्रगतीचा ध्यास घेतला आहे. ही प्रगतीही निष्कलंक असली पाहिजे, हा कटाक्षही ठेवला आहे. विरोधकांनी आताशा जोरकस आंधळेपणाने राजकारणाला जातीय आणि धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न चालविला आहे. उत्तरप्रदेशात ते करण्यात आले. मुजफ्फरपूरसारख्या दंगली घडविण्यात आल्या. मुस्लिमविरोधी, दलितविरोधी म्हणून मोदींची प्रतिमा उभी करत राजकीय लाभ पदरात पाडून घेण्याचा त्यांचा डाव होता. जनतेनेच डोळसपणे तो उधळून लावला. आता पश्‍चिम बंगालमध्येही नेमके तेच सुरू आहे. मात्र, मोदी अर्थकारणावर काम करत आहेत. त्याला जात, धर्म, पंथ असे काही असूच शकत नाही. काळा पैसा आणि भ्रष्टाचार निखंदून काढण्यासाठी तीन वर्षांत जे काम झाले आहे ते आधीच्या सत्ताधार्‍यांना सलग १५ वर्षांच्या सत्तेतूनही करता आलेले नाही. राजकारण आणि निवडणूक विजयासाठी मतदारांचे लांगूलचालन यापाशीच अडून अनेक महत्त्वाचे निर्णय थोपवून धरण्यात आले होते. मोदींनी अगदी योजनाबद्ध वेळापत्रकानुसार ते निर्णय घेतले आणि यशस्वी करून दाखविले. नोटाबंदी हे अगदी ठळकपणे माहिती असलेले उदारहरण झाले. अलीकडचा जीएसटीचा क्रांतिकारी निर्णयही जनमानसात चर्चेचा आहेच. मात्र, सामान्यांच्या पातळीवर कळणारही नाही असे अनेक निर्णय त्यांनी घेतले. त्यात कामगार कायद्यांत करण्यात आलेले समन्यायी बदलांसारखे निर्णय आहेत. ‘मेक इन इंडिया’सारखी योजना त्यांनी राबविणे सुरू केले. त्यातून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत ही केवळ बाजरपेठ आहे, उपभोक्त्यांचा देश आहे, हा समज त्यांनी घालविला आहे. हा उद्योजकांचा, उत्पादकांचाही देश आहे, हा आत्मविश्‍वास देशात निर्माण केलाच, पण तो संदेश आंतरराष्ट्रीय स्तरावरही नेला. मॅगीवर बंदी येत असताना रामदेवबाबांच्या रूपात एका पूर्ण स्वदेशी नीतीचा उद्योजक निर्माण झाला, हा काही एकव्यक्ती चमत्कार नाही. गेल्या तीन वर्षांत देशांतर्गत उद्योजकांमध्ये वाढ झाली आणि सामान्यांमध्येही उद्यमशीलता वाढली. अगदी साधे निर्णय होते, मोदींना परंपरावादी म्हटले जाते, पण त्यांनी रेल्वेचा अर्थसंकल्प वेगळा मांडण्याची इंग्रजकालीन रीत क्षणात मोडीत काढली. ती जानेवारी ते डिसेंबर अशी केली. आता देशाचा अर्थसंकल्प डिसेंबरात मांडला जातो. कृषिक्षेत्राच्या विपणणाचे काही नियम त्यांनी बदलले. आता देशात कास्तकार आपला माल थेट ग्राहकांना विकू शकतात. जीएसटीमुळे तर करप्रणालीत कमालीचा बदल झालेला आहे. त्याचा फायदा येत्या काळात गरीब, दुबळे, शेतकरी, मजूर यांनाच मिळणार आहे. देशाच्या मूलभूत सोयी-सवलतींमध्येही कमालीची वाढ करण्यात आलेली आहे. रस्तेबांधणीचा वेग आधी १० कि.मी. प्रती दिवसही नव्हता, तो आता ७० कि.मी.च्याही वर गेलेला आहे. वाहतुकीच्या सर्वच उपलब्ध साधनांत वाढ करतानाच अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाहतुकीसाठी आता केला जाऊ लागला आहे. अणुऊर्जेच्या बाबतही काही महत्त्वाचे प्रकल्प सुरू होत आहेत. अशक्यप्राय वाटणारे पूलही पूर्ण करून राष्ट्रार्पण करण्यात आले आहेत. आता वीस हजारापर्यंत देणगी राजकीय पक्षाला द्यायची असेल, तर ती बँकेद्वारेच द्यावी लागणार आहे. बँकिंग प्रणाली त्यांनी सक्षम केली. बँक ही ज्यांना स्वप्नातही शक्य नव्हती अशा सामान्यांची खाती बँकेत सुरू करून त्यांना मिळणारे सरकारी लाभ थेट त्यांच्या खात्यात जमा होऊ लागलेले आहेत. विनारोकड व्यवहारांचे चलन वाढलेले आहे. येत्या काळात ते अधिक जोमाने वाढणार आहे. भारतासारख्या देशात ही अर्थक्रांतीच आहे. आता निवडणूकप्रक्रियेतील सुधारणांचे सूतोवाच झालेले आहे. लोकसभा आणि विधानसभा निडणुका एकाच वेळी कशा घेता येतील, यावर योजनेची आखणी सुरू आहे. काही गोष्टी थेट आर्थिक वाटत नाहीत, पण कुठलीही घडामोड अखेर आर्थिकच असते. अगदी ती बेटी बचाव मोहीम असो, की मग स्वच्छतेची मोहीम. हे सारेच देशाच्या अर्थकारणाशीच जाऊन थांबत असते. सरसंघचालकांच्या परवाच्या भाषणात त्यांनी, मोदी हे लोकांना आपले भले करणारे ठेकेदार वाटतात. त्यांना असा एक ठेकेदार हवाच असतो, असेही विधान केले आहे. ते देशात त्यांचे भाषण ऐकणार्‍या अन् समजून घेणार्‍यांसाठी होते. मोदी म्हणतात, ‘सबका साथ, सबका विकास.’ सरसंघचालक तेच म्हणाले, तुमचे भले करण्यासाठी कुणी मोदीच का गरजेचा असतो? तुम्हीदेखील त्यात सामील व्हायचे असते. आम्ही रसातळाला जायला लागलो की कुणी अवतार येईल आणि आम्हाला वाचवेल, असे का? तुम्हीच तुमचे कृष्ण का होत नाही? तुम्हीच तुमचे मोदी का होत नाहीत? सरसंघचालकांना विचारायचा असलेला हा प्रश्‍न आम्हीच आम्हाला विचारून घेतला पाहिजे. मोदी ही व्यक्ती नाही, देशाची जनता आहे ती. या देशाच्या जनतेच्या मनात आले ना, तर तिला काहीही अशक्य नाही… सरसंघचालकांना हेच सांगायचे आहे!