७३ टक्के नागरिकांचा पंतप्रधान मोदींवर विश्‍वास

0
80

•जगात भारत क्रमांक एकवर
•ओईसीडीच्या अभ्यासातील निष्कर्ष
नवी दिल्ली, १४ जुलै 
केंद्रात सत्तेवर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारवर देशातील सुमारे ७३ टक्के नागरिकांनी आपला विश्‍वास व्यक्त केला आहे. ऑर्गानायझेशन ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट (ओईसीडी) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पाहणीतून हे वास्तव पुढे आले आहे.
देशात एखाद्या सरकारवर इतक्या मोठ्या संख्येत नागरिकांनी विश्‍वास व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ असू शकते. इतकेच नव्हे, तर जगाच्या पाठीवरील कोणत्याही देशातील सरकारवर दाखविण्यात आलेला हा सर्वात मोठा विश्‍वास ठरला आहे. नरेंद्र मोदी यांचे सरकार अतिशय चांगले काम करीत आहे. त्यांचा निर्णय हा सर्वसामान्यांचा विचार करूनच असतो. त्यांच्या धाडसी धोरणांमुळेच जगात भारताला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे, असे मत लोकांनी या अभ्यासात नोंदविले आहे.
या पाहणीत नरेंद्र मोदी यांच्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांनी बाजी मारली आहे. त्रुडो यांच्या सरकारवर कॅनडातील ६२ टक्के नागरिकांनी विश्‍वास व्यक्त केला आहे. यानंतर तुर्कस्तानने तिसरा क्रमांक मिळविला आहे. तुर्कस्तानमध्ये गेल्या वर्षी एर्दोगन यांच्या सरकारविरोधात करण्यात आलेले लष्करी बंड फसले होते. याच अनुषंगाने तुर्कस्तान सरकारवर देशातील ५८ टक्के नागरिकांनी विश्‍वास दर्शविला आहे. यानंतर रशिया (५८ टक्के) व जर्मनी (५५ टक्के) या देशांनी स्थान मिळविले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर देशातील केवळ ३० टक्के नागरिकांनी विश्‍वास व्यक्त केला आहे; तर ब्रेक्झिटच्या मुद्यामुळे सध्या संवेदनशील देशांतर्गत परिस्थिती अनुभवत असलेल्या ब्रिटनमधील थेरेसा मे सरकारवर देशातील ४१ टक्के नागरिकांनी विश्‍वास ठेवला आहे. या यादीच्या तळाशी ग्रीस देशाला स्थान देण्यात आले आहे. या देशातील केवळ १३ टक्के नागरिकांनी येथील सरकारवर विश्‍वास ठेवला आहे.  (वृत्तसंस्था)