नीट परीक्षा रद्द ठरविता येणार नाही

0
70

•सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली
नवी दिल्ली, १४ जुलै 
वैद्यकीय प्रवेशाकरिता यावर्षी घेण्यात आलेली नीट परीक्षा आता रद्द ठरविता येणार नाही. कारण, सहा लाखांवर विद्यार्थ्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली असल्यामुळे असा कोणताही निर्णय या विद्यार्थ्यांचे भवितव्य प्रभावित करेल, असे सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी स्पष्ट केले.
न्या. दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय न्यायासनाने आपल्या आदेशात स्पष्ट केले की, नीट परीक्षेचा निकाल लागला असून, आता कौन्सिलिंगची प्रक्रियाही सुरू झाली आहे. अशा स्थितीत आम्ही कोणताही आदेश जारी करू शकत नाही. प्रवेश प्रक्रिया सुरूच राहील. ती थांबविणे आता कदापि शक्य नाही.
आंध्रप्रदेशातील विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिकेचे तीन संच देण्यात आले होते. त्यामुळे ही परीक्षा रद्दबातल ठरवून नव्याने घेण्यात यावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केली होती. त्याला विरोध करताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल मनिंदरसिंग म्हणाले की, इंग्रजी आणि हिंदीशिवाय आठ प्रादेशिक भाषांमध्ये प्रथमच नीटची परीक्षा घेण्यात आली. कठीण प्रश्‍नांचा स्तर सर्वच भाषांमध्ये एकसारखा होता. (वृत्तसंस्था)