राज्यात मान्सून सक्रिय

0
142

सर्वच भागात दमदार पाऊस, नाशिक परिसरात मुसळधार, शेतकरी सुखावला
मुंबई, १४ जुलै 
नैर्ऋत्य मान्सूने संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या कवेत घेतले असून, राज्याच्या सर्वच भागांमध्ये दमदार पाऊस कोसळत आहे. यामुळे शेतकरी वर्गही सुखावला आहे. भारतीय वेधशाळेने आज शुक्रवारी ही माहिती दिली.
जुलै महिन्यात मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसे पाहिले तर, राज्यात १ जुलैपासूनच मान्सूनच्या सरी कोसळत आहेत. पण, राज्याचा सर्वच भाग मान्सूनच्या कवेत नव्हता. तथापि, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्राचा प्रत्येक भाग मान्सूनच्या कक्षेत आला आहे, असे वेधशाळेतील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.
मध्य व उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चांगला पाऊस पडत आहे. या भागांमध्ये दुबार पेरणीची वेळ आलेल्या शेतकर्‍यांसाठी हा पाऊस फायद्याचा आहे, असे अधिकारी म्हणाला.
दरम्यान, राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या मते, सध्या सुरू असलेल्या खरीप हंगामाच्या काळात राज्यात सुमारे ६६ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
गोदावरीला पूर
नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून, गोदावरी नदीला पूर आला आहे. पुराची ओळख असलेला दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आले आहे. गुरुवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरूआहे. गेल्या वर्षीही अशाचप्रकारे पुराने नाशिकला वेढा दिला होता.
हवामान खात्याविरुद्ध शेतकर्‍यांची पोलिसांत तक्रार
मराठवाड्याच्या माजलगाव तालुक्यातील काही शेतकर्‍यांनी आज शुक्रवारी थेट भारतीय हवामान खात्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. बियाणे व कीटकनाशक उत्पादकांना फायदा करून देण्यासाठीच हवामान खाते पावसाविषयी सातत्याने चुकीचा अंदाज वर्तवित असते, असे या शेतकर्‍यांनी तक्रारीत म्हटले आहे. विशेष म्हणजे, हवामान खात्याविरोधात तक्रार दाखल होण्याची देशातील ही पहिलीच घटना आहे.
विशेषत: पुणे आणि कुलाबा वेधशाळेने पावसाबद्दल खोटे अंदाज व्यक्त करून आमचे व राज्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान केले आहे. हा फसवणुकीचा प्रकार आहे. कारण, हवामान खात्याच्या अंदाजावर विश्‍वास ठेवूनच आम्ही शेतकरी पेरणी करीत असतो. पण, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊसच पडत नाही, असे गंगाभूषण थावरे या शेतकर्‍याने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. कायदेशीर बाबी तपासून या अर्जावर निर्णय घेणार असल्याचे पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले.
हवामान खात्याने एप्रिल व मे महिन्यात पावसाचा अंदाज व्यक्त करताना, यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावर विसंबून देशातील शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या होत्या. प्रत्यक्षात अपेक्षित पाऊस झालाच नाही. त्यानंतरही येत्या ४८ तासात पाऊस येणार, ७२ तासात येणार असे सांगत हवामान खाते शेतकर्‍यांना फसवत राहिले, यामागे बियाणे, खत आणि कीटकनाशक कंपन्यांचे आणि हवामान खात्याचे आर्थिक हितसंबंध असावे, असे तक्रारीत म्हटले आहे.