लालूंंच्या हाती बिहारचे भवितव्य

0
169

राजीनाम्याच्या अस्त्राने नितीशकुमार मारणार एका दगडात अनेक पक्षी?
श्यामकांत जहागीरदार
नवी दिल्ली, १४ जुलै
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव राजीनामा देतील की मुख्यमंत्री नितीशकुमार त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करतील याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. उद्या शनिवारी होणार्‍या राजकीय घडामोडींवर बिहारमधील महाआघाडीचेही भवितव्य अवलंबून आहे.
हॉटेलच्या बदल्यात जमीन प्रकरणात सीबीआयने बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काही जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. या प्रकरणी तेजस्वी यादव यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिलेली चार दिवसांची मुदत उद्या शनिवारी संपत आहे, तर कोणत्याही स्थितीत तेजस्वी यादव राजीनामा देणार नाही, अशी भूमिका राजदने घेतली आहे. मी कोणताही भ्रष्टाचार न केल्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. त्यामुळे उद्या मुख्यमंत्री नितीशकुमार कोणती भूमिका घेतात, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
भ्रष्टाचाराच्या मुद्यावर नेहमीच कठोर भूमिका घेणार्‍या नितीशकुमार यांना तेजस्वी यादव यांच्यावर कारवाई करावी लागणार आहे. त्यांनी तेजस्वी यादव यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली नाही, तर त्याचा फटका त्यांच्या स्वत:च्या प्रतिमेला बसेल. त्यामुळे तेजस्वी यादव यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय त्यांच्यासमोर नाही.
नितीशकुमार यांनी कारवाई केली तर राज्यातील सत्ताधारी महाआघाडीत फूट पडू शकते. मात्र यामुळे नितीशकुमार यांचे सरकार अडचणीत येण्याची कोणतीच शक्यता नाही. कारण नितीशकुमार यांचे सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली तर भाजपा या सरकारला बाहेरून पाठिंबा देऊ शकतो. त्यामुळे या सार्‍या प्रकरणात नुकसान जदयूचे नाही, तर राजदचेच होणार आहे.
भ्रष्टाचाराच्या वेगवेगळ्या प्रकरणात लालूप्रसाद यादव आणि त्यांचे कुटुंबीय आकंठ अडकले आहे. त्यामुळे राज्यात सरकारमध्ये राहूनच लालूप्रसाद या परिस्थितीचा मुकाबला करू शकतात. बुडत्याला काडीचा आधार अशी त्यांची आज स्थिती आहे. त्यामुळे राज्यातील सरकार गमावणे लालूप्रसादांना कोणत्याही स्थितीत परवडणारे नाही. राज्यातील सरकारमधील आपला सहभाग कायम ठेवणे त्यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या फायद्याचे आहे.
तेजस्वी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणे लालुप्रसादांसाठी अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे आज जरी तेजस्वी यादव राजीनामा देणार नाही, अशी भूमिका राजद पर्यायाने लालूप्रसाद यांनी घेतली असली, तरी या भूमिकेवर ते फार कायम राहण्याची शक्यता नाही. शेवटच्या क्षणी ते तेजस्वी यादव यांना राजीनामा देण्याची सूचना करतील, असा अंदाज आहे.
तेजस्वी यादवच्या राजीनाम्यानंतर राजदचे सर्व मंत्री राजीनामा देण्याची आणि नितीशकुमार सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र ही स्थितीही लालूप्रसादांना फार सोयीची नाही. त्यामुळे दुसर्‍या पर्यायानुसार तेजस्वी यादव यांनी राजीनामा दिल्यानंतरही तेजप्रताप यादव आणि राजदचे अन्य मंत्री मंत्रिमंडळात कायम राहू शकतात. अशा वेळी लालुप्रसाद यादव तेजप्रताप यादवकडे उपमुख्यमंत्री पद देण्याची मागणी करू शकतात. ही मागणी नितीशकुमार मान्य करतील का, हाच प्रश्‍न आहे.
बिहारमधील महाआघाडी फुटू नये म्हणून कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीही मध्यस्थी करीत आहे. या मुद्यावर त्यांनी नितीशकुमार आणि लालूप्रसाद यांच्याशी चर्चाही केली आहे. मात्र त्यांच्या मध्यस्थीला कितपत यश येईल, हे सांगता येणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नितीशकुमार सोनिया गांधी यांचे कितपत ऐकतील, याबद्दलही शंका आहे.
नितीशकुमार लालूप्रसाद यादव यांच्या दादागिरीला कंटाळले आहे. त्यांना लालूप्रसाद यादव आणि राजदपासूनच सुटका हवी आहे. तेजस्वी यादव यांनी राजीनामा दिला नाही तर मुख्यमंत्री नितीशकुमार स्वत:च्या राजीनाम्याचे ब्रह्मास्त्र वापरू शकतात. यामुळे सर्वाधिक नुकसान लालूप्रसाद आणि त्यांच्या कुटुंबाचे होणार आहे. नितीशकुमार यांनी राजीनामा दिला की आपोआपच बिहारमधील महाआघाडीच्या सरकारचा राजकीय अंत होऊ शकतो.
लालूप्रसाद तेजस्वी यादवला राजीनामा देण्यापासून थांबवू शकतात, पण नितीशकुमार यांना तर राजीनामा देण्यापासून रोखू शकत नाही. या राजीनाम्यातून ते एकाच वेळी अनेक पक्षी मारू शकतात. लालूप्रसादांसोबत युती केल्यामुळे डागाळलेली त्यांची प्रतिमा उजळू शकते. लालूप्रसादांबरोबर युती केल्याचे ते एकप्रकारे प्रायश्‍चित्त राहू शकते. अशा स्थितीत ते भाजपाच्या बाहेरून पाठिंब्यावर वा त्यांना सोबत घेऊनही पुन्हा सरकार स्थापन करू शकतात. त्यामुळे चेंडू आता नितीशकुमार यांच्या नाही, तर लालूप्रसाद यांच्या कोर्टात आहे. महाआघाडीचे भवितव्य नितीशकुमार यांच्या नाही तर लालूप्रसाद यादव यांच्या हातात आहे.