मानवी हक्क लढवय्ये लियू शियाओबो यांचे निधन

0
160

शेनयांग (चीन), १४ जुलै
चिनी नागरिकांना मूलभूत मानवी व लोकशाही हक्क मिळावेत यासाठी लढवय्ये ठरलेले नोबेल शांतता पुरस्कारविजेते लियू शियाओबो (६१) यांचे गुरुवारी तुरुंगातच निधन झाले. अखेरच्या दिवसांत तरी त्यांना देशाबाहेर उपचार घेऊ द्यावेत, अशी मागणीही चीन सरकारने झुगारली होती. दरम्यान, लियू शियाओबो यांच्या अकाली मृत्यूसाठी चीन सरकार पूर्णपणे जबाबदार आहे, असा आरोप नोबेल पुरस्कार समितीने केला आहे.
चीनची एकपक्षीय राजकीय व्यवस्था अधिक खुली व लोकाभिमुख करावी यासाठी ‘चार्टर ०८’ नावाची स्वाक्षरी मोहीम चालविल्याबद्दल त्यांना चीन सरकारने २००८ मध्ये राष्ट्रद्रोही ठरवून ११ वर्षांचा तुरुंगवास दिला होता. २०१० मध्ये जाहीर झालेला नोबेल शांतता पुरस्कार स्वीकारण्यासही चीन सरकारने लियू यांना देशाबाहेर जाऊ न दिल्याने त्यांच्या रिकाम्या खुर्चीला प्रतिकात्मक पुरस्कार बहाल करण्यात आला होता. महिनाभरापूर्वी यकृताच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर सरकारने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. परंतु बराच उशीर झाला होता.
दरम्यान, जगभर गौरव झालेले आणि स्वदेशातीलच छळामुळे तुरुंगातच अखेरचा श्‍वास घ्यावा लागलेले लियो हे दुसरे नोबेल शांतता पुरस्कारविजेते ठरले आहेत. याआधी जर्मनीचे शांततावादी कार्ल व्हॉन ओस्सिएत्सी यांचे जुलमी नाझी राजवटीच्या तुरुंगात १९३८ मध्ये निधन झाले होते. (वृत्तसंस्था)