गुहांचा शोध

0
68

वेध
प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या दोन कार्यक्रमांची सध्या चर्चा सुरू आहे. पहिला आहे, त्यांच्या पुस्तकाला- ‘इंडिया आफ्टर गांधी’ला झालेल्या १० वर्षांच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम आणि दुसरा आहे, एनडीटीव्हीला त्यांनी दिलेली मुलाखत. या दोन्ही कार्यक्रमांत त्यांनी केलेली वक्तव्ये गाजणारी अशीच आहेत. सध्याच्या घडीला भारतात जे वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे भारताची ओळख हिंदू पाकिस्तान अशी होत चालली आहे, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे, अशी टीका ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संबंधावरही त्यांनी भाष्य केले आहे. मागील तीन वर्षांत संघ आणि मोदी यांच्यात योग्य अंतर ठेवले गेले नाही, त्यामुळे देश कट्‌टर हिंदुत्ववादाकडे झुकला आहे, ही त्यांची चिंता आहे. खरे तर नरेंद्र मोदी हे उत्कृष्ट प्रशासक आहेत. त्यांना कुणाशी, किती आणि कशा प्रकारचे संबंध ठेवायचे याचे चांगले भान आहे. संघ ही राष्ट्रनिर्माण आणि व्यक्तिनिर्माण करणारी सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे. त्यामुळे राष्ट्राचे चरित्र निर्माण करणार्‍या आणि चारित्र्य घडविणार्‍या संघटनेशी संबंध ठेवण्यात काहीच वावगे नाही. आजवरच्या सरकारांनी संघाला चार हात दूर ठेवले, त्या पक्षाची १३१ वर्षांनंतर कशी अवस्था झाली, हे इतिहासकार रामचंद्र गुहा यांना दिसत नाही, असे कसे म्हणता येईल? आज जगातील सर्वात मोठे, युवकांचे संघटन असलेल्या संघाच्या नेत्यांना मग दूर कसेबरे सारता येईल? हा एक इतिहासकार म्हणून तरी त्यांनी विचार करायला हवा. गुहा यांनी या मुलाखतीत, अल्पसंख्यक समाजावर होणारे अत्याचार, कथित गोरक्षकांनी निरपराधांना केलेली मारहाण, त्यांचे मत्यू, पुरस्कार वापसी, असहिष्णुता… असे विरोधी पक्ष नेहमी वापरतात ते घासून सपाट झालेले मुद्देदेखील उपस्थित केले आहेत. त्याबाबत स्पष्टीकरण देण्याचीही गरज नाही. मुळात मोदी संघाच्या मुशीतून तयार झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून देशविरोधी, समाजविरोधी पाऊल कदापि उचलले जाणार नाही, ही काळ्या दगडावरची रेष आहे, हे गुहांनी समजून घेतले पाहिजे! मोदींचे चरित्र, त्यांची कामगिरी, त्यांचे विचार, त्यांचे आचार, त्यांची ऊर्जा, त्यामागची प्रेरणा हे सारे जाणून घेतले की, अनेक बाबी सुकर होतील. पण, झोपण्याचे सोंग घेतले असेल, तर कुणाला जागे करता येणार नाही, हेदेखील तेवढेच खरे!

फुकटचा सल्ला
‘इंडिया आफ्टर गांधी’ या पुस्तकाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात गुहांनी विधायक मते व्यक्त केलीत, पण तरीदेखील त्याकडे केवळ स्वप्नरंजन किंवा नसती उठाठेव म्हणूनच बघता येईल! राजकारणात स्वप्नरंजनाला महत्त्व नसते. ‘जो जिता वो सिकंदर!’ असा राजकारणातला नियम असतो. पण, गुहा एक इतिहासकार आहेत आणि त्यांनी देशाच्या राजकारणाचे सखोल चिंतन केलेले आहे, त्यामुळे त्यांच्या विधानांची उपेक्षा केली जाऊ शकत नाही. त्यांच्या मते, १३१ वर्षांचा कॉंग्रेस पक्ष तारायचा असेल, तर त्याला नेतृत्व देण्याची गरज आहे. आणि तसे नेतृत्व अध्यक्षपदाच्या रूपाने नितीशकुमार देऊ शकतात. सध्याच्या घडीला कॉंग्रेसकडे नेता नाही आणि नितीशकुमार यांच्याकडे समर्थक नाहीत! त्यामुळे हे समीकरण उभयतांना चालू शकते. कॉंग्रेस पक्ष अस्तित्वाची लढाई लढत आहे, हे त्यांचे म्हणणे अगदी बरोबर आहे. गेल्या काही महिन्यांत पार पडलेल्या विभिन्न विधानसभा निवडणुकांच्या काळात तर पक्षाचे जुनेजाणते कार्यकर्ते, नेते, पक्षासोबत नाते तोडून दुसर्‍या पक्षाच्या निवडणूक चिन्हांवर लढलेदेखील! त्यामुळे आजची कॉंग्रेसची स्थिती गुहा म्हणतात तशी निश्‍चितच बिकट आहे.
राहुल गांधींना अजूनही सूर गवसलेला नाही. त्यामुळे त्यांनी राजकारणातून संन्यास घ्यायला हवा, हे म्हणणे आणि प्रत्यक्षात पक्षाने तशी कृती करणे, यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. आजही कॉंग्रेस पक्षातील सारे नेते झाडून गांधी परिवाराच्या म्हणजे सोनिया आणि राहुलच्या शब्दाबाहेर नाहीत. त्यामुळे या पक्षात आजतरी राहुलचे नेतृत्व जाऊन त्याऐवजी कुणी मसीहा येण्याची शक्यता दूरपर्यंत दृष्टिपथात नाही. नितीशकुमार स्वतः कर्तृत्ववान आहेत, निष्कलंक आहेत, संयमी आहेत, सुस्वभावी आहेत, उत्तम प्रशासक आहेत, कनवाळू आहेत… असे सारे असले, तरी त्यांचे नेतृत्व कॉंग्रेसने का म्हणून स्वीकारावे, हा प्रश्‍न उरतोच. आणि इतक्या वर्षांच्या पुण्याईवर कॉंग्रेसची धुरा राहुल म्हणा किंवा सोनिया एकाएकी हातून सोडण्याचीदेखील शक्यता नाही. त्यामुळे गुहांनी तोंडातून शब्द काढला आणि त्याची अंमलबाजवणी झाली, असे होणे नाही. त्यामुळे गुहांचे विचार ऐकायला जरी बरे वाटत असतील, तरी त्यात स्वप्नरंजनच अधिक आहे, ही बाब ध्यानात घ्यायला हवी. गुहा, पक्षाला नेतृत्वपरिवर्तनाची गरज आहे, हे सांगताना कॉंग्रेसला घराणेशाहीचा रोग आहे, हे कसे काय विसरले? वर्षानुवर्षांच्या नेहरू, गांधी परिवाराच्या जोखडातून हा पक्ष आजही मुक्त झालेला नाही. त्यांच्या या विधानावर कॉंग्रेस पक्षाकडून अथवा कुणा राजकीय नेत्याची अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. एवढे मात्र खरे की, गुहांच्या या नसत्या उठाठेवीवरही  कॉंग्रेसला विचार करायला निश्‍चितच बाध्य केले आहे.
– चारुदत्त कहू 
९९२२९४६७७४