व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट!

0
139

चौफेर
अण्णाद्रमुक पक्षाच्या सचिव शशिकला यांना बंगळुरूच्या कारागृहात मिळत असलेल्या व्हीआयपी ट्रीटमेंटची बातमी ऐकून उसळणे अपेक्षित असलेल्या संतापाच्या लाटेपेक्षाही निरर्थक चर्चेचा जो धुराळा उडतोय्, तो बसेलच येत्या काही दिवसांत खाली! ज्या त्वेषाने लोक या प्रकरणी अद्वातद्वा बोलत सुटलेत, त्या शब्दांची धारही बोथट होईलच थोडा काळ मागे पडला की! कारण, आपल्या लोकांना सवय आहे असल्या प्रकरणात तळमळीने बोलण्याची अन् कितीही मोठी घटना असली, तरी काळाच्या ओघात ती विसरून जाण्याची. आणि तसेही, नवे काय घडले या प्रकरणात? राजकारण, चित्रपट, क्रिकेट, उद्योग… या, लोकांनी डोक्यावर घेतलेल्या क्षेत्रातील लोकांना शिक्षा होते कुठे आपल्या देशात? अन् झालीच कधी चुकून, तर ती भोगतो कोण? कायदा पायदळी तुडवण्याइतका पैसा खिशात असताना कारागृहात खितपत पडायचं या नामांकित बड्या लोकांनी? छे! त्यांना स्वत:ला सोडा, आपल्या देशातल्या सामान्य जनतेलाही वाटत नाही तसं. पालन तर सोडाच, पण कायदा त्यांच्यासाठी नसतोच, असे गृहीत धरून चालतात ते आणि इतर लोकही. शिवाय बाजार मांडून व्यवस्थेच्या चिंधड्या उडवायला तर शेकड्यानं माणसं उपलब्ध आहेत इथे. मग कोण कशाला भोगेल कारावास? चार दमड्या फेकून व्यवस्था विकत घेण्याची सोय सहज उपलब्ध असताना? देशद्रोही कारवायांचा आरोप असलेल्या संजय दत्तपासून, तर गुरांचा चारा खाणार्‍या लालूप्रसाद यादवांपर्यंत अन् सहारा कंपनीच्या सुब्रत रॉयपासून तर कॉमनवेल्थ गेमच्या आयोजनातून मलाई खाणार्‍या सुरेश कलमाडींपर्यंत… सांगा, कुणाला झाल्या वेदना कारावासाच्या? केलेला गुन्हा, वर्षानुवर्षांच्या प्रक्रियेनंतर सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा भोगण्यासाठी सुब्रत रॉय यांच्यासाठी वातानुकूलित खोलीची स्वतंत्र व्यवस्था करून त्यांची बडदास्त ठेवली जात असेल अन् दस्तुरखुद्द न्यायालयालाही ते मान्य असेल, तर मग संपलंच सगळं. श्रीमंती अन् प्रसिद्धी लाभलेल्यांना तसेही जगणे सोपे आहेच या देशात. आता शिक्षेच्या नावाखाली होणारा कारागृहातला त्यांचा वावरही सुकर करण्याची निलाजरी धडपड चालली असेल, तर स्पष्टपणे जाहीर करून टाका ना एकदा की, इथे कुण्याही गर्भश्रीमंत-प्रसिद्ध व्यक्तीला शिक्षा दिली जाणार नाही म्हणून. हो! उगाच लोकलाजेस्तव कायदेपालनाची नौटंकी हवी कशाला? टु-जीचा भला मोठा घोटाळा करूनही ए. राजा कारागृहातून बाहेर पडल्यावर तेवढ्याच सन्मानाने, कॉलर टाईट करून संसदेत बसू शकत असेल आणि दारावरचे भालदार, चोपदार, त्याचा गुन्हा, त्याने भोगलेली शिक्षा विसरून एका गुन्हेगाराला सलाम ठोकत असतील, तर मग अर्थ काय उरतो त्या शिक्षेला? तो संजय दत्त तर जणू न्यायव्यवस्थेवर उपकार केल्याच्या थाटात कारागृहात चक्कर मारून येतो अधूनमधून! ज्या सहजतेने तो शिक्षेच्या कालावधीत कारागृहातून बाहेर येऊ शकतो, ते बघितल्यानंतर तो न्यायालयाने सुनावलेली शिक्षा भोगत असल्याचं कोण म्हणेल? लालूप्रसाद यादव कारागृहातून बाहेर पडतानाही हसर्‍या चेहर्‍याने व्हिक्टरीचा ‘व्ही’ मिरवत विजयाच्या उन्मादात कॅमेर्‍यापुढे जात असतील, तर आत जेलमध्ये त्यांनी खरोखरीच ‘शिक्षा’ भोगल्याचा निष्कर्ष कसा अन् का काढायचा सामान्यजनांनी?
इथे खाकी वर्दीतला शिपाई नुसता बघितला तरी जागेवर थबकतात लोक. अगदी चौकात पोलिस दिसले तरी तारांबळ उडते त्यांची. न्यायालयाची तर पायरीही न चढण्याची जणू शपथ घेतलेली असते प्रत्येकाने. त्यामुळे जमेल तेवढे कायद्याच्या चौकटीतच जगण्याचा प्रयत्न करते जनता. पोलिस ठाणे अन् न्यायालयाच्या वाटेने तर जाणेही नको असते कुणाला. अशा, कायद्याच्या धाकात वावरणार्‍यांच्या गर्दीत काही बडी धेंडं मात्र सर्वांदेखत त्याच कायद्याची सहज खिल्ली उडवून जातात. सुब्रत रॉय यांच्यासाठी कारागृहात उभारण्यात आलेली पंचतारांकित अलिशान निवास व्यवस्था असेल किंवा मग कर्तव्याशी बेईमान झालेल्या कुठल्याशा अधिकार्‍याच्या मदतीने बंगळुरूच्या कारागृहात शशिकलांसाठी उपलब्ध झालेली व्हीआयपी सुविधा असेल, यापैकी कशाचेच आश्‍चर्य वाटत नाही आताशा इथे कुणाला. अहो, लोकांना तर बँका कोट्यवधी रुपयांनी लुटून विजय माल्ल्याच्या विदेशात पळून जाण्याचेही फारसे आश्‍चर्य वाटलेले नाही. उलट, हेच घडेल असे वाटत होते सगळ्यांना. आता तो शहाणा, तिकडे विदेशातून स्वत:च्या निर्दोषत्वाची ग्वाही देतोय्. सार्‍या देशाने त्याच्यावर विश्‍वास ठेवावा, अशी अपेक्षाही आहे त्याची. या देशाच्या न्यायव्यवस्थेला वाकुल्या दाखवत तिकडच्या न्यायव्यवस्थेचे दाखले देतोय् तो आता. निर्दोष होता तर मग देश सोडून पळून का गेला, हा प्रश्‍न कुणी विचारायचा? त्यालाही अन् इथल्या व्यवस्थेलाही?
तर सांगायचा मुद्दा असा की, एका राजकीय पक्षाच्या प्रमुख असलेल्या शशिकलांना कारागृहात शिक्षा भोगत असतानाच्या कालावधीत व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याच्या मुद्यावर सुरू झालेला गदारोळ हा मुळातच राजकीय नौटंकीचा एक भाग आहे. त्यांना तशी सुविधा तर जेलमध्ये दाखल झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच मिळत होती. बातमी लीक झाली अन् बिंग आता फुटले एवढेच. पण, जणूकाय या देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असेकाही विपरीत घडले असल्याच्या थाटात त्यावर वादळी चर्चा सुरू आहे. पूर्वी असे कधी घडलेच नव्हते की, कोणत्या गुन्हेगार व्हीआयपीला अशी खास वागणूक मिळालीच नव्हती का कधी, ते तरी सांगा? या देशातील तमाम बड्या असामी या जनतेच्या जिवावर राज्य करण्यासाठीच जन्माला आल्या आहेत. गुन्हे केले तरी त्यांना त्याची शिक्षा ही ‘अशी’च मिळणार- व्हीआयपी दर्जाची. नावापुरती. जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकणारी…!
मंडालेच्या तुरुंगात टिळक अन् अंदमानात सावरकर… अशी नुसती कल्पना केली, तरी त्यांच्यासारख्या देशभक्तांच्या वाट्याला आलेल्या यातनांची कल्पनाही अंगावर शहारे आणणारी ठरते. त्या तुलनेत स्वातंत्र्योत्तर काळात चोरांच्या वाट्याला येत असलेला राजेशाही थाट मग आपसूकच संतापजनक ठरतो. पण, चिडून उपयोग नाही ना राव! इथे गुन्हा करणार्‍या माणसाची पार्श्‍वभूमी अधिक महत्त्वाची असते. मिळणार्‍या शिक्षेच्या धारेची तीव्रता त्यावरून ठरते. गुन्हेगार ठरलेल्या सामान्यजनांसाठी घाणेरड्या अंधारकोठड्या आहेतच- भरपूर मच्छरांचा वावर असलेल्या. पण, जर का समोरचा माणूस सुब्रत रॉय असेल, तर त्याच्यासाठीची पंचतारांकित व्यवस्था उभारण्याची परवानगी मग खुद्द न्यायालयच बहाल करते- अगदी कुठल्याही आडकाठीविना! तो सलमान खान असेल, तर त्याचा कुठलाच कसूर नसल्याचे सिद्ध करायला तर काय वकिलांची फौजच सिद्ध होते. शिकार सलमानने केली नव्हती, तर मग त्याच्या खिशातून काढून त्या काळविटानेच आपल्या कानशिलावर लावून घेतली होती का बंदूक, हा प्रश्‍न तुम्हा-आम्हा बापुड्यांना पडतो, न्यायव्यवस्थेला नाही! बरं, प्रभाव वापरून, पैसा फेकून व्यवस्था पायदळी तुडवणार्‍यांनाच दोष कशाला द्यायचा? दोष तर व्यवस्थेचा बाजार मांडून बसलेल्यांचाही तेवढाच आहे ना! आरोपीच्या पिंजर्‍यात ते कधीच उभे राहात नाहीत. तरीही, न्यायासमोर सगळे समान असल्याची तुतारी वाजवायला मोकळे असतात सारे… कायद्याचा जरब राहिला नसल्याची ओरड होते ती वेगळीच…
राहत इंदोरींच्या शब्दांत सांगायचं तर,
‘गुनाह करनेवाले मुजरीम
इतनेभी बुरे नही होते
लेकीन, सजा ना देकर
अदालत उन्हे बिगाड देती हैं…’
सुनील कुहीकर
९८८१७१७८३३