नितीशकुमारांची घोडचूक!

0
152

अग्रलेख
आपण मोठ्या आशेने घेतलेला निर्णय, आपल्याच पायावर पाडलेल्या धोंड्याप्रमाणे निघालेला बघून, येणार्‍या तीव्र उद्विग्नतेचे साकार रूप बघायचे असेल, तर आम आदमी पार्टीच्या आशुतोषकडे बघावे. या आशुतोषने, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना सल्ला देणारा एक लेख लिहिला आहे. ‘भाजपाकडे गेल्यास नितीशकुमार यांना काय गमवावे लागेल?’ या शीर्षकाच्या लेखात आशुतोषने, नितीशकुमार यांच्यावर जाळे फेकण्याचा प्रयत्न केला आहे. यात नितीशकुमारांची स्तुती आहे, भारतातील लोकशाहीच्या रक्षणासाठी केलेले भावनिक आवाहनही आहे. नितीशकुमार भाजपाच्या बाजूला गेल्यास ती त्यांची एक ऐतिहासिक घोडचूक (ब्लण्डर) ठरेल, असा या लेखाचा निष्कर्ष आहे. आशुतोष म्हणतो की, ‘ऐतिहासिक घोडचूक’ हा शब्दप्रयोग प्रथम कट्‌टर वामपंथी पत्रकार एम. जे. अकबर यांनी केला होता. बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांना पंतप्रधान बनण्याची संधी आली असता, त्यांच्या पक्षाने त्यांना बनू दिले नाही. ही एक ऐतिहासिक चूक होती, असे अकबर यांनी म्हटले आहे. नितीशकुमार यांनी भाजपाविरोधातच राहणे कसे आवश्यक आहे, त्यामुळे ते भारतीय राजकारणात हिरो कसे बनतील, वगैरे खूप काही आशुतोषने लिहिले आहे. थोडक्यात, नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यांना झिडकारून भाजपाचा हात हातात घेतला, तर ती एक ऐतिहासिक घोडचूक ठरेल, असे आशुतोषचे म्हणणे आहे. खरे तर, नितीशकुमार यांनी असे करणे, हे त्यांनी आधी केलेल्या घोडचुकीचे परिमार्जन केल्यासारखे होणार आहे. या आधी त्यांनी केलेल्या घोडचुकीच्या परिणामांची त्यांना जाणीव झाल्यामुळेच की काय, ते सध्या बिहारच्या अस्थिर राजकारणात मौन झाले आहेत. इतक्या पेचात ते कधी सापडले असतील असे वाटत नाही. कुठली होती ती घोडचूक? आपल्याला थोडे मागे जावे लागेल. राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी यांचा उदय होण्यापूर्वी, नितीशकुमार हे रालोआचे पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार असतील, अशी जोरकस चर्चा होती. तसे त्यांनी नावही कमविले होते. पण, भाजपाने नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी जाहीर केल्यानंतर, नितीशकुमार यांची निराशा होणे स्वाभाविक होते. भाजपातील काही ज्येष्ठ नेत्यांच्या सांत्वनामुळे नितीशकुमार यांचे नैराश्य अधिक गडद झाले असण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान बनणे शक्य नाही. समजा झालेच तरी, त्यांना इतर सहकारी पक्षांच्या मदतीने सरकार बनवावे लागेल आणि राष्ट्रीय स्तरावरील राजकारणाचा अनुभव नसल्याने ते आपल्या कारकीर्दीत अपयशी ठरतील, अशी अटकळ बांधून नितीशकुमार यांनी रालोआशी फारकत घेतली. भविष्यात उलगडत जाणारा घटनांचा पट काय असेल, याची तशी कुणालाच कल्पना नसते. अनुभवांच्या आधारे जो तो आडाखे बांधत आपल्या भविष्याच्या संदर्भात निर्णय घेत असतो. नितीशकुमार यांनीही तसेच केले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये भाजपाला आश्‍चर्यकारक यश मिळाले. नितीशकुमारांचा जदयू व लालूप्रसादांचा राजद यांचा व्यवस्थित पराभव झाला. या धक्क्याने गांगरून नितीशकुमार यांनी बिहार विधानसभेच्या निवडणुकीसाठी लालूप्रसाद यांच्याशी युती केली. महागठबंधन केले. निवडणुकीत या महागठबंधनला यश आणि लालूप्रसादासारख्या भ्रष्ट माणसाला जीवनदान मिळाले. आपण लालूप्रसादला जीवदान मिळवून दिले, ही बोच नितीशकुमारांना सतत असली पाहिजे. मोदी अपयशी ठरतील आणि मग आपण आपले पुढचे डावपेच खेळू, या आशेवर नितीशकुमार असताना, त्यांच्या या मनसुब्यांना उद्ध्वस्त केले ते उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी! दोनतृतीयांश बहुमत मिळवून तिथे भाजपा सत्तेत आली. मोदी अपयशी होणे तर सोडाच, पण २०१९ च्या निवडणुकीतही विजयाचा डंका वाजविणार, अशी चर्चा सुरू झाली. लालूप्रसादसारख्या महाभ्रष्ट माणसाला सोबत घेऊन आपण फार मोठी घोडचूक केली, हे आता सिद्ध झाले होते. स्वच्छ प्रशासक म्हणून आपली प्रतिमा जपण्याची विलक्षण काळजी घेणारे नितीशकुमार, लालूप्रसादांमुळे आपली प्रतिमा धुळीस मिळते की काय, या विवंचनेत असल्याचे दिसून आले. विधानसभेत जदयूपेक्षा राजदचे संख्याबळ जास्त आहे. तरीही लालूप्रसादांनी चतुराई दाखवीत नितीशकुमार यांनाच मुख्यमंत्री होऊ दिले. तोही एक दबाव नितीशकुमारांवर असला पाहिजे. आपली प्रतिमाच नाही, तर आपले भविष्यदेखील संपते की काय, अशी स्थिती बिहारच्या राजकारणाने निर्माण केली होती. त्यातून बाहेर पडण्यासाठी पुन्हा रालोआत जाणे, याशिवाय पर्याय नाही, हे वास्तव त्यांच्या ध्यानात आले असावे. त्यासाठी त्यांनी धूर्त चाली खेळणे सुरू केले. राष्ट्रपतिपदाचा उमेदवार ठरविण्यासाठी कॉंग्रेसने आयोजित बैठकीकडे पाठ फिरवून नितीशकुमार, मॉरिशसच्या पंतप्रधानांना नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या मेजवानीला हजर राहिले. नंतर रालोआच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला जाहीर समर्थनही देऊन टाकले. दैववशात्, लालूप्रसाद, राबडीदेवी, मिसा भारती व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर सीबीआयच्या धाडी पडल्या. आता तर नितीशकुमार यांच्याकडे फारच कमी पर्याय शिल्लक राहिले आहेत. लालूची साथ सोडल्यास, सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचे राज्य भाजपाने जाहीरही करून टाकले आहे. अशा या वळणावर नितीशकुमार आज ना उद्या भाजपाकडेच जातील, असे ठाम मत राजकीय निरीक्षक मांडू लागले आहेत. या सर्व राजकीय परिस्थितीमुळे देशातील सेक्युलर राजकीय नेते, विचारवंत, बुद्धिवंत, विश्‍लेषक हादरून जाणे स्वाभाविकच आहे. आशुतोष यांच्यापैकीच एक. कट्‌टर वामपंथी विचारांचा पत्रकार आशुतोष, गलेलठ्‌ठ पगाराची नोकरी सोडून, चांगल्या भविष्याच्या आशेने आम आदमी पार्टीत सामील झाला. अरविंद केजरीवाल पंतप्रधान बनणारच, ही आशा केजरीवालने स्वकर्तृत्वानेच धुळीस मिळविल्यावर, नितीशकुमारांनी तरी भाजपाकडे जाऊ नये, म्हणून हात पसरविण्याची दयनीय पाळी आशुतोषवर आली आहे. एवढे मोठे यश मिळाले असताना आणि अजूनही मिळत असताना, भाजपा जमिनीवरच आहे. पंतप्रधान मोदी तर आपल्या कर्तृत्वाने शिखरावर आहेतच; पण राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहदेखील स्वस्थ बसलेले नाहीत. सत्तारूढ पक्षाचा हा राष्ट्रीय अध्यक्ष घरोघरी जाऊन भाजपाचा प्रचार करतो आहे. जे क्षेत्र भाजपासाठी खडकाळ मानले जाते तिथे जाऊन प्रत्येक घरावर भाजपाचे स्टिकर लावत आहे. भारतीय राजकारणाला हा प्रकार नवीनच आहे. संपूर्ण देशात भाजपाचे २० हजार पूर्णवेळ कार्यकर्ते खेडोपाडी प्रचाराला आजपासूनच लागले आहेत. उत्तरप्रदेशात प्रचंड बहुमत मिळवून तीन महिने झाले असतील; पण तिथेही दोन हजार पूर्णवेळ कार्यकर्ते, बसपा व सपाचा तळागाळातला पाया खिळखिळा करीत आहेत. भाजपाचे भविष्य उज्ज्वल असल्याचेच हे द्योतक आहे. चाणाक्ष नितीशकुमार या सर्वांपासून अनभिज्ञ थोडेच असणार! त्यामुळे योग्य वेळी नितीशकुमार भाजपाचा हात हातात घेतील, यात शंका नाही. त्यांचा हा निर्णय म्हणजे, आधी केलेल्या घोडचुकीचे परिमार्जन असेल. तिकडे वामपंथी इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी तर नितीशकुमार यांनी कॉंग्रेसचे नेतृत्व करावे, असे सुचविले आहे. त्यासाठी कॉंग्रेसने राहुल गांधी यांना बाजूला सारले पाहिजे, असा आग्रह धरला आहे. आतापर्यंत ‘जातीयवादी’ म्हणून हिणविलेला पक्ष सत्तेत आल्याबरोबर, तमाम सेक्युलर पक्ष व त्यांचे नेते कागदावरचे वाघ सिद्ध होत आहेत. अशा स्थितीत नितीशकुमार आपल्या आधीच्या घोडचुकीचे परिमार्जन करतात की, दुसरी एक घोडचूक करतात, हे लवकरच स्पष्ट होईल…