पहिल्या फेरीत अकरावीचे १६ हजार ५३६ प्रवेश

0
76

– २० जुलैला दुसरी यादी
नागपूर, १४ जुलै
केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीमार्फत राबविण्यात येत असलेल्या उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. नागपूर शहरात गुणवत्ता यादीनुसार पहिल्या फेरीत २६ हजार ३४४ विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाला होता. मात्र, यातील एकूण १६ हजार ५३६ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले आहेत. त्यापूर्वी हवे असलेले महाविद्यालय व मिळालेले गुण यात तफावत असल्याने १३ हजार ७३७ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत होते. आता उर्वरित सर्वच विद्यार्थ्यांना दुसर्‍या गुणत्ता यादीची प्रतीक्षा आहे.
दुसरी गुणवत्ता यादी २० जुलैला जाहीर होईल. पहिल्या फेरीत शहरातील काही नामवंत महाविद्यालयांचा कटऑफ जवळपास ९७ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. नियमानुसार अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या पहिल्या पसंतिक्रमाचे महाविद्यालय त्यांना गुणवत्ता यादीनुसार मिळाल्यास त्यांना त्याच महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणे बंधनकारक होते. दुसर्‍या व त्यापुढील पसंतिक्रमाचे महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळण्यासाठी पुढील फेर्‍यांची प्रतीक्षा करू शकणार आहेत. नागपुरातून अकरावी प्रवेशासाठी ४० हजार ०८१ विद्यार्थ्यांनी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीकडे अर्ज केले होते. त्यापैकी विद्यार्थ्यांनी विविध कोट्यातून प्रवेश घेतले आहेत. नागपुरातील शंभरावर महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाच्या ५२ हजार ८४० जागा उपलब्ध आहेत. यात २७ हजार २४० अनुदानित तर २५ हजार ६०० विनाअनुदानित महाविद्यालयांचा समावेश आहे.
पुढील वेळापत्रक
१५ ते १८ जुलै- विद्यार्थ्यांनी पसंतिक्रम बदलणे (अर्जाचा पहिला आणि दुसरा भाग संपूर्ण भरला नसल्यास भरून पूर्ण करणे)
२० जुलै- दुसरी गुणवत्ता यादी जाहीर
२१ ते २४ जुलै- दुसर्‍या गुणवत्ता यादीचे प्रवेश
२५ जुलै- रिक्त जागांचा तपशील आणि दुसर्‍या फेरीचे कटऑफ प्रसिद्ध
२६ ते २७ जुलै- विद्यार्थ्यांनी पसंतिक्रम बदलणे (अर्जाचा पहिला आणि दुसरा भाग संपूर्ण भरला नसल्यास भरून पूर्ण करणे)
२९ जुलै- तिसरी गुणवत्ता यादी जाहीर