कामात हलगर्जीपणा करणार्‍या कर निरीक्षकांना आयुक्तांनी खडसावले

0
73

– १०० टक्के थकित कर वसुलीचे निर्देश
फोटो.. (एनएमसी कर नावाने सेव्ह आहे….) बैठकीला उपस्थित अश्‍विन मुदगल, संदीप जाधव, संदीप जोशी व अन्य मान्यवर
नागपूर, १४ जुलै
मालमत्ता आणि पाणी कर थकित असणार्‍या ग्राहकांसाठी मनपाने ‘अभय योजना’ आणली आहे. १७ जुलै ते ७ ऑगस्टदरम्यान राबविण्यात येणार्‍या या योजनेचा लाभ घ्या. थकित कर भरा आणि मालमत्तेवरील जप्तीची कारवाई टाळा, असे आवाहन करीत कामात हलगर्जीपणा करणार्‍या कर निरीक्षकांना आयुक्त अश्‍विन मुदगल यांनी कामगिरी दाखवा नाही तर चालते व्हा, अशा स्पष्ट शब्दात खडसावले.
अभय योजनेच्या पार्श्‍वभूमीवर आयुक्त अश्‍विन मुदगल, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्षनेते संदीप जोशी, जलप्रदाय समिती सभापती राजेश घोडपागे व अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम, कार्यकारी अभियंता संजय गायकवाड यांनी शुक्रवार १४ जुलै रोजी लक्ष्मीनगर व धरमपेठ झोन येथे आढावा बैठक घेतली. लक्ष्मीनगर झोन बैठकीत झोन सभापती प्रकाश भोयर, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, नगरसेवक प्रमोद तभाने, झोन सहायक आयुक्त सुवर्णा दखणे आदी उपस्थित होते. धरमपेठ येथे झोन सभापती रूपा राय, नगरसेविका वर्षा ठाकरे, परिणिता फुके, उज्ज्वला शर्मा, रितिका मसराम, नगरसेवक अमर बागडे, सुनील हिरणवार, कमलेश चौधरी, प्रमोद कौरती, झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे उपस्थित होते.
आयुक्त मुदगल यांनी दोन्ही झोनच्या कर वसुलीचा आढावा घेतला. १०० टक्क्यांपेक्षा कमी कर वसुली खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. ७ ऑगस्टनंतर जे थकित करदाते आहेत, त्यांची मालमत्ता लिलावात काढा, ज्या करदात्यांचे चेक अनादरित झाले त्यांच्यावरही कारवाई करा, तसेच ३१ ऑक्टोबरपर्यंत आपली ५० टक्के थकित रक्कम वसूल करण्यात आली पाहिजे, असे आदेश कर निरीक्षकांना दिले. प्रत्येक आठवड्याचा अहवाल सहायक आयुक्तांमार्फत माझ्याकडे पोहोचवा, असे निर्देशही त्यांनी दिले.
स्थायी समिती सभापती संदीप जाधव, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. त्याआधी सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी अभय योजनेची माहिती दिली. १०० टक्के वसुली हे उद्दिष्ट ठेवून ही योजना यशस्वी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.