मोबाईलद्वारे आर्थिक फसवणूक करणारी टोळी जेरबंद

0
97

– झारखंड येथून अटक
नागपूर, १४ जुलै
मोबाईलच्या साहाय्याने बँकेचा अधिकारी असल्याची बतावणी करून लोकांच्या डेबीट कार्ड, एटीएम कार्ड व अन्य महत्त्वाची माहिती विचारून लोकांची आर्थिक फसवणूक करणार्‍या टोळीला नागपूर सायबर सेलच्या पथकाने झारखंड राज्यातील जामतारा येथून अटक केली. ही माहिती पोलिस उप आयुक्त (आर्थिक) श्‍वेता खेडकर यांनी पत्रपरिषदेत दिली.
श्‍वेता खेडकर यांनी सांगितले की, लाला कालो दास (५०) रा. सीताकाटा, जि. जामतारा, झारखंड, सुधीर बालदेव मंडल (३२) रा. कुरवा, जामतारा, झारखंड अशी आरोपींची नावे असून, यात दोन १७ वर्षीय अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून विविध कंपन्यांच्या सीमकार्डसह ५५ हजार रुपयांचे ११ मोबाईल, १ लाख १३ हजार १६८ रुपयांची रोख असा एकूण १ लाख ६७ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
काही दिवसांपूर्वी सोनेगाव हद्दीतील रहिवासी संगीता प्रकाश धोटे (४५) यांना एका अज्ञात इसमाने मोबाईलवर फोन करून आपण बँकेचा अधिकारी बोलत आहे. तुमचे एटीएम कार्ड बंद झाले आहे, ते पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांनी एटीएम व आधारकार्ड विषयी सर्व माहिती घेऊन धोटे यांच्या खात्यातून ३२ हजार रुपये ऑनलाईन काढून घेतले. याबाबत सोनेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अलिकडेच एटीएमद्वारे आर्थिक फसवणूक झाल्याच्या पोलिसांकडे २०५ तक्रारी आल्या होत्या. याप्रकरणाच्या तपासात सायबर सेलने बँकेचे डिटेल्स, ऑनलाईन व्यवहार तसेच मोबाईल क्रमांकाचे विस्तृत विश्‍लेषण केल्यावर एक तपास पथक जामतारा, झारखंड येथे पाठविले. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींच्या घरी धाड टाकून त्यांना ताब्यात घेतले. या टोळीतील राकेश अंकूरन दास रा. जामतारा हा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला.
जामतारा न्यायालयाची परवानगी घेऊन त्यांना कारवाईसाठी नागपूरला आणले. आरोपींना न्यायालयाने ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या आरोपींनी मागील ६ महिन्यांत देशभरातील १५ हजार ४१८ हून जास्त लोकांना बँकेतून बोलत असल्याचे सांगून कॉल केले. त्यापैकी ९ हजार ५६ कॉल हे महाराष्ट्रातील लोकांना केले आहे. त्यामुळे फसवणूक करण्यात आलेल्या लोकांचा आकडा मोठा असण्याची शक्यता असून त्या दिशेने तपास सुरू असल्याचेही पोलिस उप आयुक्त श्‍वेता खेडकर यांनी सांगितले.
गावातील बहुतांश लोकांचा फसवणुकीचाच व्यवसाय
झारखंड जिल्ह्यातील जामतारा, देवघर या गावातील बहुतांश लोकांचा मोबाईलद्वारे फसवणूक करण्याचाच व्यवसाय असून, २००८ पासून ते या कामात लागले आहे. शॉ-प्लस या मोबाईल ऍपद्वारे ते वेगवेगळ्या राज्यातील लोकांचे विविध कंपनीचे मोबाईल क्रमांक मिळवितात. त्यानंतर लोकांना फोन करून त्यांच्याकडून एटीएम कार्डविषयी संपूर्ण माहिती मिळवून त्यांच्या खात्यातील पैसे ई-वॅलेटमध्ये ट्रान्सफर करतात. अल्पवयीन मुले देखील यात पटाईत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.