विविध प्रमाणपत्रांसाठी डिजिटल लॉक

0
78

-स्वाधीन क्षत्रिय यांची माहिती
नागपूर, १४ जुलै
काही प्रमाणपत्रे वारंवार काढावी लागतात. तसेच प्रमाणपत्रांच्या बोगसगिरीला आळा घालण्यासाठी डिजिटल लॉक व्यवस्था सुरू करण्यात येईल. एखादे प्रमाणपत्र दिल्यानंतर ते त्यात जमा होईल. पुन्हा अर्जदारांनी त्या प्रमाणपत्रासाठी अर्ज दिल्यास ते देणेही सोपे होईल, अशी माहिती राज्याचे मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयात पत्रकारांशी बोलताना क्षत्रिय म्हणाले, राज्य शासनाच्या आपले सरकार आणि महाऑनलाईन यासारखे सेवा देणारे पोर्टल सहज उपलब्ध आहे. या पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना महसूल, ग्रामविकास, नगरविकास, कामगार आदी विभागांतर्फे देण्यात येणार्‍या सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य शासनाच्या सेवा आपले सरकार या वेबपोर्टलच्या माध्यमातून एका प्लॅटफार्मवर येणार आहे. त्यामुळे कायद्याविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी लागणार आहे. जिल्हाधिकारी आणि शासकीय विभागांनी कायद्यानुसार पुरविण्यात येणार्‍या सेवांबाबत नागरिकांमध्ये अधिक प्रचार आणि प्रसार करावा, या कायद्याच्या अनुषंगाने पुरविण्यात येणार्‍या सेवा, विहित कालमर्यादा, प्राधिकृत अधिकारी, अपिलीय अधिकार्‍यांची माहिती असणारे फलक कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावावे. तसेच येत्या १५ ऑगस्टला ग्रामसभेतील विषयांमध्ये सेवा हक्क कायद्याबाबत माहिती देण्यात यावी, असे आवाहनही क्षत्रिय यांनी यावेळी केले. नागपूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी घरपोच प्रमाणपत्रे देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगून त्यांनी सचिन कुर्वे यांचे कौतुक केले. हा उपक्रम मॉडेल म्हणून राज्यभर राबवायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारल्यास नागरिकांना त्यांच्या अर्जावरील कार्यवाहीची तातडीने माहिती मिळते. यासाठी जिल्हा प्रशासनाने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे. ज्या जिल्ह्यात इंटरनेट कनेक्शनचा प्रश्‍न असेल त्यांनी नागरिकांच्या तक्रारी ऑफलाईन स्वीकाराव्या. अधिकारी किंवा कर्मचार्‍यांनी कोणत्याही प्रकारे माहिती देण्यासाठी विलंब केल्यास कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी विभागीय आयुक्त अनुपकुमार व उपायुक्त अप्पासाहेब धुळाज उपस्थित होते.
१ ऑगस्टपासून ऑनलाईन सातबारा
सर्व सातबारा उतार्‍यांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. १ ऑगस्टपासून सातबारा ऑनलाईन देण्यात येणार आहे. तसेच बोगस प्रमाणपत्र वितरित होऊ नये म्हणून डिजिटल सिग्नेचरची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे स्वाधीन क्षत्रिय यांनी सांगितले.