कोराडी, सोनेगाव, रामटेक तलावाच्या पर्यटन विकास आराखड्यास तत्त्वत: मान्यता

0
94

– मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर बैठक
नागपूर, १४ जुलै
जिल्ह्यातील प्रसिद्ध कोराडी एकात्मिक पर्यटन विकास आराखडा, सोनेगाव तलावाचा विकास आराखडा आणि रामटेक येथील तीर्थक्षेत्र व विकास आराखड्याला शासनाने तत्त्वत: मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत या तीनही आराखड्यांना मान्यता देण्यात आली.
या बैठकीला राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, प्रवीण दराडे, नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोणत्याही पर्यटनस्थळावर किंवा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पर्यटक आणि भाविकांसाठी पिण्याचे पाणी, शौचालयांची सुविधा या प्राथमिक सोयी देणे महत्त्वाचे आहे. नागपुरातील कोराडी, रामटेक आणि सोनेगाव या तलाव पर्यटनस्थळी प्राथमिक सोयी सुविधांची प्राधान्याने उभारणी करावी. तसेच या क्षेत्रांचे गतवैभव प्राप्त करण्याच्या दृष्टीने त्यांचा विकास करण्यात यावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, तीनही स्थळांचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याच दृष्टीने तीनही तीर्थस्थळे व पर्यटनस्थळांचे विकास आराखडे तयार करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार या स्थळांचा विकास करण्यात येईल, असेही पालकमंत्री बावनकुळे यावेळी म्हणाले.