लंडन पॅरा ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या सुंदरसिंहला सुवर्ण

0
62

लंडन, १५ जुलै 
लंडन येथे सुरू असलेल्या आंतराष्ट्रीय पॅरा ऍथलेटिक्स स्पर्धेत शनिवारी भारताच्या सुंदरसिंह गुर्जरने भालाफेकीत सुवर्णपदक पटकविले आहे. भालाफेक प्रकारात सुंदरने ६०.३६ मीटर लांब भाला फेकत ही अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. श्रीलंकेच्या दिनेश प्रियंथाला मागे टाकत सुरेंद्रसिंहने ही कामगिरी केली आहे.
या स्पर्धेत मिळवलेले सुवर्णपदक हे सुंदरसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत सुंदरसिंहला भारतीय संघात प्रवेश नाकारला होता. त्यामुळे या स्पर्धेत चांगली कामगिरी करत आपल्या टीकाकारांना उत्तर देणे सुंदरसाठी अतिशय आवश्यक बनले होते. त्यानुसार सुरेंद्रने लंडनमध्ये ही अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
स्पर्धेनंतर माध्यमांशी बोलताना सुरेंद्रच्या चेहर्‍यावरचा आनंद लपत नव्हता. स्पर्धा सुरू होताना मैदानातील वातावरण खूप छान होते. प्रेक्षकांचाही आम्हाला भरपूर पाठिंबा मिळाला होता. त्यामुळे भारतासाठी मी पदक मिळवेन अशी मला आशा वाटत होती. यावेळी मी माझ्या प्रतिस्पर्ध्यांचा अजिबात विचार केला नाही. केवळ चांगली कामगिरी करून भारताला पदक मिळवून देणे हे हे एकच उद्दिष्ट आपल्यासमोर होते. इतके होऊनही सुरेंद्र आपल्या कामगिरीवर आनंदी नाही. जर मी थोडा अधिक प्रयत्न केला असता तर यापेक्षाही अधिक चांगली कामगिरी करू शकलो असतो असे सुंदरसिंहने सांगितले.  (वृत्तसंस्था)