काश्मिरातील हिंसाचारात चीनचाही हात

0
82

•मेहबुबा मुफ्ती यांचा आरोप
नवी दिल्ली, १५ जुलै 
जम्मू-काश्मीरमध्ये आम्ही फक्त कायदा आणि सुव्यवस्थेची लढाई लढत नाही, तर देशाच्या एकता आणि अखंडतेची लढाई लढत आहोत. त्यामुळे देशातील जनता आणि सर्व राजकीय पक्ष आमच्या पाठीशी उभे राहणार नाही, तोपर्यत ही लढाई आम्ही जिंकू शकणार नाही, असे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आज शनिवारी स्पष्ट केले. काश्मिरातील हिंसाचार आणि फुटीरतावादी कारवायांमध्ये केवळ पाकिस्तानचाच नव्हे, तर चीनचाही हात असल्याचा स्पष्ट आरोप त्यांनी यावेळी प्रथमच केला.
अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ७ भाविकांचा मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आज प्रथमच केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची राजधानी दिल्लीत येऊन भेट घेतली. या भेटीत त्यांनी अमरनाथ यात्रेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर अमरनाथ यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी तसेच राज्याच्या अन्य भागातील विशेषत: खोर्‍यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती राजनाथसिंह यांना दिली.
जम्मू-काश्मीरमध्ये ज्या घटना घडत आहे, त्यात परकीय हात आहे, असा आरोप करीत मुफ्ती म्हणाल्या की, काश्मीरला अस्थिर करण्यात चीनचाही सहभाग असल्याचे दिसून येत आहे. मेहबुबा मुफ्ती यांनी पाकिस्तानचे नाव घेतले नसले तरी त्यांचा संपूर्ण रोख गुलाम काश्मिरातील चीनच्या वाढत्या हस्तक्षेपाबद्दलच होता. त्यामुळे केंद्र सरकारच्या संपूर्ण पाठिंब्याशिवाय काश्मीर खोर्‍यातील परिस्थिती राज्य सरकारला पूर्ववत करता येणार नाही, असा मुफ्ती यांच्या म्हणण्याचा रोख होता.
मेहबुबा मुफ्ती यांनी अर्ध्या तासाच्या भेटीत जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीबाबत गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याशी सविस्तर चर्चा केली. काश्मीरमधील परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारच्या सोबत असल्याची ग्वाही राजनाथसिंह यांनी यावेळी दिली. राज्य सरकारला आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे ते म्हणाले. अमरनाथ यात्रेकरूंवरील दहशतवादी हल्ल्यानंतर पीडीपी तसेच भाजपा यांच्यातील युतीबाबतही तणाव निर्माण झाला, तो या भेटीमुळे कमी होण्याची शक्यता आहे.
अमरनाथ यात्रेकरूंवरील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आणि पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. जितेंद्रसिंह यांना जम्मू-काश्मीरला पाठवले होते, त्यांनी राज्यातील स्थितीबाबतचा आपला अहवाल नुकताच गृहमंत्री राजनाथसिंह यांना सादर केला आहे. त्या पृष्ठभूमीवर या भेटीला महत्त्व आले आहे. (तभा वृत्तसेवा)