संपुआचे टार्गेट होते मोहनजी!

0
149

– एनआयएने उधळले दहशतवादी ठरविण्याचे षडयंत्र
– टाईम्स नाऊचा दावा
नवी दिल्ली, १५ जुलै 
रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना हिंदू अतिरेकी ठरवून अटक करण्याचे षडयंत्र संपुआ सरकारने आपल्या शेवटच्या काळात रचले होते. मात्र, एनआयएच्या काही समजूतदार अधिकार्‍यांमुळे सरकारचा हा डाव फसला, असा दावा टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीने केला आहे.
रा. स्व. संघाबद्दल असलेला कॉंग्रेसचा द्वेष कधीच लपून राहिलेला नाही. गांधीहत्येसह वेगवेगळ्या खोट्या प्रकरणात संघाला फसविण्याचा प्रयत्न कॉंग्रेस सरकारने वेळोवेळी केला. पण प्रत्येक वेळी देशातील न्यायालयांनी आणि जनतेने सरकारचा हा प्रयत्न हाणून पाडला आणि संघाला क्लीन चिट दिली. पण यातून कधीच कॉंग्रेस सरकारला शहाणपण आले नाही. रा. स्व. संघाबद्दलच्या आंधळ्‌या द्वेषामुळे संपुआ सरकारने आपल्या दुसर्‍या कार्यकाळाच्या शेवटच्या टप्प्यात सरसंघचालकांना पर्यायाने संघाला अतिरेकी ठरविण्याचा जो घाट घातला होता, त्यामुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. कॉंग्रेसच्या या कृत्याचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे.
अजमेर आणि मालेगाव येथील बॉम्बस्फोटांनंतर संपुआ सरकारने मुस्लिम अतिरेक्यांना चुचकारण्यासाठी हिंदू अतिरेकी ही संकल्पना पुढे आणली. या अंतर्गत हिंदू दहशतवादाचे काही निकषही तयार करण्यात आले. या निकषात सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना बसवून हिंदू अतिरेकी ठरविण्याचा संपुआ सरकारमधील काही मंत्र्यांचा प्रयत्न होता, असा दावा या वृत्तवाहिनीने केला आहे.
हिंदू दहशतवादाच्या आरोपाखाली डॉ. मोहनजी भागवत यांची चौकशी करून नंतर त्यांना अटक करण्याचे षडयंत्रही रचण्यात आले होते. यासाठी एनआयएच्या अधिकार्‍यांवर दबावही टाकण्यात आला होता. सुशीलकुमार शिंदे या काळात देशाचे गृहमंत्री होते. त्यांच्यासह अन्य काही मंत्र्यांचा या षडयंत्रात सहभाग असल्याचा तसेच, याबाबतचे पुरावे आपल्याजवळ असल्याचा दावा या वृत्तवाहिनीने केला आहे.
अजमेर आणि मालेगाव येथील बॉम्बस्फोटात सहभाग असल्याच्या संशयावरून स्वामी असीमानंदांना अटक करण्यात आली होती. या स्वामी असीमानंदांची मुलाखत एका मासिकात छापून आली होती. त्यात डॉ. मोहनजी भागवत यांच्याकडून प्रेरणा घेऊन हे बॉम्बस्फोट आपण घडवल्याचा दावा स्वामी असीमानंदांनी केला होता. असीमानंदांच्या या मुलाखतीचा आधार घेत डॉ. भागवत यांना बॉम्बस्फोटाच्या कटात अडकविण्याचे आणि हिंदू अतिरेकी ठरवण्याचे षडयंत्र संपुआ सरकारमधील काही मंत्र्यांनी रचले होते. त्यादृष्टीने त्यांनी एनआयएच्या अधिकार्‍यांवर दबावही टाकला होता, असा दावा या वृत्तवाहिनीने केला आहे. मात्र, एनआयएच्या अधिकार्‍यांनी या दबावाला बळी पडण्याचे नाकारत हे षडयंत्र हाणून पाडले, याकडे या वृत्तवाहिनीने लक्ष वेधले आहे.
शरद कुमार यांचा नकार
फेब्रुवारी २०१४ मध्ये कारवॉं या मासिकात स्वामी असीमानंद यांची मुलाखत प्रकाशित करण्यात आली होती. याच मुलाखतीच्या आधारावर संपुआ सरकारने एनआयए आणि अन्य तपास संस्थांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली; मात्र एनआयएचे तत्कालीन प्रमुख शरद कुमार यांनी नकार दिला. असीमानंद यांच्या मुलाखतीच्या टेपची ते फॉरेन्सिक तपासणी करणार होते, पण हा मुद्दा नंतर जास्त ताणल्या न गेल्याने एनआयएने हे प्रकरण बंद केले होते. (तभा वृत्तसेवा)