पाकला धडा शिकवीनच!

0
61

शहीद रणजितसिंह यांच्या मुलीचा निर्धार
श्रीनगर, १५ जुलै 
गेल्या बुधवारी काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात शहीद झालेल्या दोन जवानांपैकी लान्सनायक रणजितसिंह यांच्या मुलीने पाकिस्तानला धडा शिकविण्याचा आणि त्यासाठी पोलिस दलात मोठे अधिकारी होण्याचा निर्धार व्यक्त केला.
रणजितसिंह यांचे तिरंग्यात गुंडाळलेले पार्थिव शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले होते. आपल्या वडिलांचे पार्थिव पाहिल्यानंतर त्यांची आठ वर्षांची मुलगी काजोलला अश्रू अनावर झाले होते. तिचा कंठ दाटून आला होता. पण, संयम आणि धाडस बांधत तिने वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. मला भारतीय पोलिस दलात सहभागी व्हायचे आहे, मोठ्या पदावर जायचे आहे. माझ्या वडिलांचीही हीच इच्छा होती. त्यांचे हे स्वप्न मी नक्कीच पूर्ण करेल आणि भारतात नापाक गोळीबार करणार्‍या पाकिस्तानला धडा शिकविणार. माझ्या वडिलांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असा निर्धार काजोलने व्यक्त केला. काजोलच्या सात वर्षीय भावानेही लष्करात भरती होऊन वडिलांच्या मारेकर्‍यांना कायमची अद्दल घडविण्याचा निर्धार व्यक्त केला.  (वृत्तसंस्था)