५० किमी अंतरावर एक पासपोर्ट केंद्र

0
55

•एम. जे. अकबर यांची माहिती
कोलकाता, १५ जुलै
देशभरात प्रत्येक ५० किलोमीटर अंतरावर एक पासपोर्ट केंद्र स्थापन करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने पुढाकार घेतला असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी आज शनिवारी येथे दिली.
पासपोर्ट हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळायलाच हवा. सरकार याच दिशेने काम करीत आहे, असे अकबर यांनी उत्तर कोलकात्यात टपाल खाते पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्‌घाटन केल्यानंतर सांगितले.
देशातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पासपोर्ट सुविधा पोहोचायलाच हव्या, हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांचा उद्देश आहे. याच अनुषंगाने भविष्यात प्रत्येत ५० किलोमीटर अंतरावर किमान एक पासपोर्ट केंद्र सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, असे ते म्हणाले.
आतापर्यंत नागरिकांना पासपोर्ट तयार करण्यासाठी पासपोर्ट कार्यालयांमध्ये लांबचलांब रांगा लावाव्या लागत होत्या. हे चित्र आम्हाला बदलवायचे आहे. पासपोर्ट कार्यालये लोकांच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र आम्हाला पाहायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)